Search This Blog

Tuesday, 27 March 2018

पिसीपिएनडीटी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी


चंद्रपूर, दि.23 मार्च- चंद्रपूर शहर महानगरपालिका व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने पी.सी.पी.एन.डी.टी कायद्याअंतर्गत जिल्हयातील सर्व समुचीत प्राधिकारी, सर्व सोनोग्राफी केंद्र धारक, सल्लागार समिती सदस्य व वैद्यकीय अधिकारी यांच्याकरीता 22 मार्च 2018 रोजी महानगरपालिकेच्या सभागृहात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे उदघाटक म्हणून जिल्हाधिकारी आशुतोष सलिल तर अध्यक्षस्थानी मनपाच्या महापौर अंजलीताई घोटेकर होत्या. यावेळी उपमहापौर अनिल फुलझेले, मनपा आयुक्त संजय काकडे, अतिरीक्त आयुक्त भालचंद्र बेहेरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.उमेश नावाडे, मनपा वैद्यकीय अधिकारी अंजली आंबटकर उपस्थित होत्या. सदर कार्यशाळेस चंद्रपूर महानगरपालिका व जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांच्या कार्यक्षेत्रातील दोनशे सभासदांनी भाग घेतला होता. त्यामध्ये पदाधिकारी, अधिकारी, सोनोग्राफी केंद्र धारक, वैद्यकीय अधिकारी, सल्लागार समिती सदस्य व इतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा समुचीत प्राधिकारी यांनी मुलींच्या जन्माच्या बाबतीत समाजाच्या उदासीनतेवर खेद व्यक्त करुन सदर कायद्याची अंमलबजावणी करणे आपले सर्वांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.  तसेच या कायद्यातील तरतूदीचे आपण योग्य पालन केल्यास गर्भलिंग निदान व स्त्रिभृण हत्येला आळा घालता येईल अशीही आशा त्यांनी व्यक्त करुन मुळात स्त्रीभृण हत्या विरोधात आपल्या देशात हा कायदा करण्याची गरज पडली ही दुर्देवी बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाश्चात देशात असा कुठलाही कायदा नाही कारण तेथे स्त्री व पुरुष यांच्यात भेदभाव नाही. आपल्या देशातील समाजामध्ये स्त्री-पुरुष समानतेची भावना जागृत होणे आवश्यक आहे. यामध्ये हळु हळु हा बदल निश्चित होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. परंतु तोवर या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे अत्यंत आवश्यक असून या कायद्याचे उल्लंघन करणा-या कोणासही संरक्षण दिल्या जावू नये, हा अक्षम्य गुन्हा आहे. तेव्हा सर्वांनी जबाबदारीने या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी सर्वांना केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात महापौर अंजली घोटेकर यांनी आज स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात अग्रसेर असून देशाचे पंतप्रधान यांनी सुध्दा मुली विषयी बेटी बजाव बेटी पढाओ याची घोषणा केली असून स्त्रीला कमी लेखण्यात येऊ नये. असे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेस उपस्थित असलेल्या अनेक डॉक्टर महिला आहेत. तेव्हा आपल्या लक्षात येते की, आज महिला किती पुढे गेलया आहेत. जर स्त्रीभृण हत्या टाळली तर अजून स्त्री प्रगती करेल असे त्यानी आपल्या मनोगत सांगितले.
मनपा आयुक्त तथा समुचीत प्राधिकारी संजय काकडे यांनी गर्भलिंग निदान व स्त्रीभृण हत्या हा घृणास्पद कृत्य करणा-या डॉक्टर्सनी विचार करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. तेव्हा डॉक्टर्सनी असे कृत्य करु नये, त्यांनी मनात आणले तर हे कृत्य शत प्रतिशत थांबू शकते. तेव्हा समुचित प्राधिकारी आणि सोनोग्राफी केंद्र धारक यांनी आपआपली जबाबदारी व्यवस्तित पारपाडली तर या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकेल असे त्यांनी सांगितले. अतिरीक्त आयुक्त भालचंद्र बेहेरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे संचालन वैद्यकिय अधिकारी डॉ.नयना उत्तरवार यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.अंजली आंबटकर यांनी केले. या कायद्याबद्दलची माहिती मनपा विधी अधिकारी ॲड.अनिल घुले व जिल्हा विधी समुपदेशक ॲड.मंगला बोरीकर यांनी पावर पॉईट प्रसेंटेशनव्दारे सादर केली. चंद्रपूर येथील सर्वसाधारण सभागृह येथे झालेल्या पिसीपिएनडीटी कार्यशाळेस मनपा आरोग्य विभाग व जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांच्या कार्यक्षेत्रातील पदाधिकारी, अधिकारी, डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी मोठया संख्येने उपस्तित होते.

000

No comments:

Post a Comment