ऑटोरिक्षा चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याच्या
घोषणेबद्दल ना. मुनगंटीवार यांचा सत्कार
चंद्रपूर, दि.12 मार्च- ऑटो रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांच्या निराकरणाची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी ऑटोरिक्षा चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची प्रलंबित मागणी मी पूर्ण करू शकलो याचा मला मनापासून आनंद आहे. आजवर ऑटो रिक्षा चालकांच्या अनेक मागण्यांच्या पूर्ततेसाठी मी प्रयत्नांची शर्थ केली. ऑटोरिक्षा चालकांना अतिशय कमी दरात म्हाडाच्या माध्यमातून घरे देण्याच्या मागणीचा शासन गंभीरपणे विचार करत असून ही मागणीसुध्दा लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करू अशी, ग्वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
दिनांक 11 मार्च रोजी चंद्रपूर येथे ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे आयोजित सत्कार समारंभात राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार बोलत होते. ऑटो रिक्षा चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची घोषणा अर्थसंकल्प सादर करताना केल्याबद्दल संघटनेतर्फे सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेचे राजेंद्र खांडेकर, हरिष पवार, भारत लहामगे, राजू पडगेलवार,अब्बास भाई, बाळू उपलेंचीवार, बंटी मालेकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, ऑटो रिक्षा चालकांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आपण नेहमीच संघटनेसोबत राहिले आहोत. पूर्वीच्या सरकारने ऑटो रिक्षा चालकांच्या वाहन करात मोठी वाढ केली होती. विधानसभेच्या माध्यमातून संघर्ष करून ही वाढ कमी करत पुढील दहा वर्षे वाहन करात कोणतीही वाढ होणार नाही असे, आश्वासन आपण सरकारकडून घेतले. ऑटो रिक्षा चालकांवर लादण्यात आलेला व्यवसाय कर रद्द करण्यासाठी विधानसभेत विविध संसदीय आयुधांचा वापर करून हा व्यवसाय कर मागे घेण्यास आपण शासनाला भाग पाडले. यापुढील काळातही ऑटो रिक्षा चालकांच्या न्याय्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी आपण सदैव त्यांच्यासोबत राहू असे, आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र खांडेकर यांनी केले. संचालन बळीराम शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन राजू मोहूर्ले यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हयातील ऑटो रिक्षा चालक मालकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment