Search This Blog

Tuesday 27 March 2018

2515 योजनेअंतर्गत जिल्हयातील सर्व गावातील अंतर्गत रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार




पायली येथील सामाजिक सभागृहाचे लोकापर्ण व क्रांकीट रस्त्याचे भूमीपूजन

       चंद्रपूर, दि.25 मार्च- ग्राम विकास निधीमधील 2515 योजनेअंतर्गत जिल्हयात प्रत्येक गावातील अंतर्गत रस्त्यांची पूर्ण कामे करण्यात येणार असून एकाही गावातील रस्त्याचे काम अपूर्ण राहणार नाहीत, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पायली-भटाळी येथील सामाजिक सभागृहाचे लोकार्पण, क्रांकीट रस्त्याचे व पिण्याच्या शुध्द पाणी आरो मशीनच्या भूमीपूजन कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले.
            या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा परिषद सदस्य वनिता आसुटकर, रोशनी अनवर खान, गौतम निमडे, सरपंच मनिषा थेरे, उपसंरपच राजकुमार रायपूरे, पंचायत समिती सभापती वंदना पिंपळशेंडे, उपसभापती चंद्रकांत धोडरे, नगरसेवक रामपाल सिंग आदी पदाधिकारी उपस्थित होते.
            वित्त, नियोजन व वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार म्हणाले, गावांचा विकास करतांना सर्व नागरिकांना समान पायाभूत सुविधा निर्माण करुन देण्याचा आमचा माणस आहे. त्यामध्ये कसलाही भेदभाव केला जाणार नाही, अशी मी ग्वाही देतो. या सामाजिक सभागृहाचा उपयोग गावातील सर्व समाजाच्या नागरिकांनी करावा. तसेच या सभागृहाचा वापर व्यायाम शाळेसाठी करण्यात यावा, असेही ते म्हणाले. सदर भूमीपूजन करण्यात आलेली आरो मशीन येत्या तीन महिन्यात सुरु करण्यात येणार असून पिण्याचे शुध्द पाणी या आरो मशीनव्दारे सर्व नागरिकांना मिळणार आहे. जिल्हयातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे या दृष्टीने जिल्हयातील  100 गावांना आरो मशीन उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
            जिल्हयात मोठया प्रमाणात रोजगार निर्मितीचे काम सुरु असून यामध्ये चिंचपल्ली बांबू प्रशिक्षण केंद्राव्दारे महिला बचत गटांना रोजगार देण्यात आला असून पोंभूर्णा येथील कुक्कुटपालन  केंद्रातर्फे 1 हजार महिलांना काम देण्यात आले आहे. तसेच 1 हजार महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात येत असून या महिलांनी तयार केलेल्या कपडयांची विक्री करण्यासाठी मोठी बाजार पेठ उपलब्ध करुन देण्याकरीता आम्ही प्रयत्न करणार आहे. तसेच बल्लारपूर येथे 3 हजार युवकांना डायमंड कटिंगचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. अशा प्रकारचे विविध रोजगार युक्त कामे जिल्हयात सुरु असून यामधून नागरिकांना रोजगार निर्माण करुन देण्याचे आमचे अनेक प्रयत्न सुरु आहेत.  पायली व भटाळी या गावाला डब्ल्युसिएलपासून होणा-या समस्याचे निराकरण करण्यासाठी लवकरच डब्ल्युसिएलची बैठक घेऊन त्यावर चर्चा करण्यात येईल आणि त्यामध्ये सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येईल, असे  त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
            या लोकार्पण कार्यक्रमाच्या अनुषंगाने रक्तदान शिबीर, संकल्प आयपीएस बहुउद्देशीय संस्थेने जनप्रबोधन कार्यक्रम आयोजित केला होता. तसेच टाटा ट्रस्टचे जिल्हा समन्वयक संदीप सुखदेवे यांनी युवकांची जबाबदारी व गाव विकासाच्या विविध योजना यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  या कार्यक्रमाचे संचालन शुध्दोधन मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन संदेश गणवीर यांनी मानले. यावेळी मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.
                                                            0000

No comments:

Post a Comment