Search This Blog

Sunday, 6 January 2019

मुद्रा, स्वयंरोजगार, कौशल्य विकास व आवास योजनांवर लक्ष वेधा: ना.हंसराज अहीर


दिशा समितीमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या योजनाचा आढावा
11 ते 15 कृषी मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 5 जानेवारी - केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनांची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यामध्ये करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना ,प्रधानमंत्री आवास योजना, कौशल विकास योजना, उज्वला गॅस योजना, दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योति योजना,राष्ट्रीय कृषी विकास योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आदी योजनांनी गती देण्याचे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज येथे केले.
बचत साफल्य भवनमध्ये आयोजित जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या बैठकीमध्ये त्यांनी आज केंद्रातील वेगवेगळ्या योजनांचा आढावा घेतला. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुद्रा योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, दीनदयाल अंत्योदय योजना, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री आवास योजना, नॅशनल सोशल असिस्टंस प्रोग्राम, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, स्वच्छ भारत मिशन, ड्रिंकिंग वॉटर प्रोग्राम,प्रधानमंत्री कृषी योजना, डिजिटल इंडिया, सर्व शिक्षा अभियान एकात्मिक बाल विकास योजना, मध्यान्ह भोजन योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री कौशल विकास योजना आदी योजनांचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला.
आढावा बैठकीला  आमदार नानाभाऊ शामकुळे, महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, महानगरपालिका आयुक्त संजय काकडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, कृषी सभापती अर्चनाताई जीवतोडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आदींची उपस्थिती होती.
या बैठकीमध्ये सर्वप्रथम जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यात आला. यामध्ये सिकलसेल आजाराबद्दल चर्चा झाली. या आजाराच्या वाढत्या प्रभावाला लक्षात घेता या आजारातील रुग्णाला अपंगाचा दर्जा देण्याबाबतही चर्चा झाली. त्यानंतर पाणीपुरवठा योजनांवर चर्चा झाली. जिवती व दुर्गम भागामध्ये मोठ्या प्रमाणात अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असून या भागामध्ये आरो मशीन देण्याबाबत मागणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी केली. जिल्ह्याच्या सर्वदूर भागात आरो मशीनचे जाळे तयार व्हावे व ज्या भागांमध्ये दूषित पाणी आहे, त्याठिकाणी ग्रामस्थांना आरो मशीन लावून मिळावी, अशी मागणीही यावेळी प्रामुख्याने करण्यात आली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना असणाऱ्या मुद्रा योजनेवर आजच्या सभेमध्ये चर्चा झाली. स्थानिक स्वराज्य संस्थेचे सभापती व पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागांमध्ये बँकांकडून या योजनेसाठी योग्य प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार केली. यावर बोलतांना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी बँकेत येणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यांची नोंद झाली पाहिजे. या योजनेतून मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप होत आहे. मात्र बँकांची जी अडचण आहे ती देखील लाभार्थ्यांनी समजून घ्यावी. योजनेमधील लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी नियमित कर्ज फेड केल्यास अन्य लोकांना लाभ देण्याची व्याप्ती निश्चितच वाढेल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
मनरेगा योजनेतील कामावर असणाऱ्या कामगारांना 90 दिवसाचे जॉब कार्ड देण्याबाबत नियमितता असावी. या सर्व कामगारांना बांधकाम कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा देणे शक्य आहे. याबाबतही सहानुभूतीपुर्वक विचार व्हावा, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 
जिल्ह्यातील कौशल्य विकास विभागाचा आढावा देखील यावेळी घेण्यात आला. दीनदयाल उपाध्याय कौशल विकास योजनेतून किती लोकांची नोंद करण्यात आली व प्रशिक्षण देण्यात आले. यासंदर्भातही पदाधिकाऱ्यांनी माहिती जाणून घेतली. तसेच प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण सुरू असून यामध्ये 1200 उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आले.  680 लोकांना नोकरी मिळाल्याचे माहिती कौशल्य विकास विभागाकडून देण्यात आली. आतापर्यंत 488 बेरोजगारांनी स्वयंरोजगाराची कास धरल्याचे ही यावेळी सांगितले. प्रधानमंत्री आवास योजनेबाबतचा आढावाही या ठिकाणी घेण्यात आला. प्रधानमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांनी या योजनेच्या बाबत अतिशय सकारात्मक दृष्टिकोन अवलंबला आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आवास योजनेचा लाभ सर्व बेघरांना मिळावा, असे निर्देश यावेळी अहिर यांनी दिले.
आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी ग्रामपंचायत स्तरावर केंद्र व राज्य शासनाच्या योजना बाबतचे माहिती फलक लावण्यात यावे. या मागणीचा पुनरुच्चार केला. ग्रामीण भागातील जनतेला केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची अद्यापही माहिती नाही. त्यामुळे जिल्ह्यामध्ये प्रमुख योजनांमध्ये लाभार्थी दिसून येत नाही. त्यामुळे या योजनांची प्रसिद्धी करण्याबाबतही त्यांनी यावेळी संबंधित यंत्रणांना सुचविले.         
 शहरी व ग्रामीण प्रधानमंत्री आवास योजनेचाही आढावा यावेळी घेण्यात आला. यावेळी बोलताना अहीर यांनी येत्या 20 जानेवारीपर्यंत पंधराशे लाभार्थ्यांना पट्टे मिळतील, असे स्पष्ट केले. महानगरपालिकेतर्फेही यावेळी शहरी आवास योजने मध्ये प्राप्त झालेले अर्ज व देण्यात आलेले गृहकर्ज याबाबतची माहिती देण्यात आली.
यावेळी उज्वला गॅस योजनेचा आढावा देखील घेण्यात आला. जिल्ह्यामध्ये सध्या 87 हजार 744 जोडण्या असून जिल्ह्यातून मोठया संख्येने जनतेकडून मागणी होत असल्याचेही यावेळी संबंधितांनी स्पष्ट केले. दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योति योजनेअंतर्गत जिल्ह्यातील विद्युतीकरण व अन्य पायाभूत सुविधा मजबूत करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
                                                  0000

पोंभुर्णा येथे उभारण्‍यात येणारे अगरबत्‍ती उत्‍पादन युनिट रोजगार निर्मीतीचे प्रशस्‍त दालन ठरणार – सुधीर मुनगंटीवार


चंद्रपूर, दि.5 जानेवारी- आयटीसी अगरबत्‍ती प्रकल्‍प, महाराष्‍ट्र बांबु विकास मंडळ आणि बांबु संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने पोंभुर्णा येथे उभारण्‍यात येणारे अगरबत्‍ती युनिट या परिसरात रोजगार निर्मीतीचे प्रशस्‍त दालन ठरेल व त्‍या माध्‍यमातुन परिसराच्‍या विकासात भर घातली जाईल अशी अपेक्षा अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली.
दिनांक 4 जानेवारी रोजी नागपूर येथे आयटीसी अगरबत्‍ती प्रकल्‍प, महाराष्‍ट्र बांबु विकास मंडळ आणि बांबु संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र यांच्‍यात पोंभुर्णा येथे अगरबत्‍ती उत्‍पादन युनिट उभारण्‍याच्‍या दृष्‍टीने सामंजस्‍य करार करण्‍यात आला. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान मुख्‍य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख उमेश अग्रवाल, नागपूरच्‍या महापौर नंदा जिचकार, जैवविविधता मंडळाचे अध्‍यक्ष विलास बर्डेकर, महाराष्‍ट्र बांबु विकास मंडळाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक टी.एस.के. रेड्डी, बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहूल पाटील, जैवविविधता मंडळाचे सदस्‍य तथा आयटीसी कंपनीचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. रवी रायवरम तसेच ऑपरेशन विभागाचे प्रमुख श्री. एम. मुर्लीधर यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
पोंभुर्णा येथे उभारण्‍यात येणारे अगरबत्‍ती उत्‍पादन युनिट ची क्षमता 100 मेट्रीक टन असून चांदा ते बांदा विकास योजनेच्‍या माध्‍यमातुन हा प्रकल्‍प मंजूर झाला आहे. या प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन पोंभुर्णा तालुक्‍यातील 200 हून अधिक आदिवासी महिलांना रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध होणार आहे. या प्रकल्‍पासाठी 4.85 कोटी रू. निधी मंजूर झाला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या उपस्थितीत या अगरबत्‍ती उत्‍पादन युनिटसाठी सामंजस्‍य करार करण्‍यात आला. आता आयटीसी च्‍या मंगलदीप ब्रँन्‍ड ची अगरबत्‍ती पोंभुर्णा येथे तयार होणार आहे.
                                                0000

चंद्रपूर जिल्ह्यातील 14 कोटी रुपयांच्या 32 पाणीपुरवठा योजनांचे मुख्यमंत्र्यांच्याहस्ते ई - भूमिपूजन



* चंद्रपूर जिल्ह्यातील पांढरकवडा या स्मार्ट ग्रामपंचायतचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
* ना. हंसराज अहीर, आ. शामकुळे, अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी शुद्ध पाणीपुरवठयाची मागणी
* खनीज विकास निधीतून जिल्हयामध्ये आरो मशीन लावण्याचे निर्देश
* देवराव भोंगळे यांच्याकडून जिल्हयातील प्रत्येक गावात आरो मशीनची मागणी

चंद्रपूर,  दि. 5 जानेवारी - चंद्रपूर जिल्ह्यातील 32 ग्रामपंचायतीच्या सरपंच्याशी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला. तर जिल्ह्यातील पांढरकवडा या ग्रामपंचायतीच्या कार्यालयांमध्ये बसलेल्या महिला सरपंच रंजनाताई डवरे यांचे सोबतही त्यांनी संवाद साधला. गावांच्या पाणीपुरवठा योजना सौर उर्जेवर लवकरच कार्यान्वित करीत असल्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. तथापि, ज्या ठिकाणी या योजना सुरू होत आहेत. त्या गावांनी पाणीपट्टी वसुली करण्यातही सक्रिय राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नागपूर येथील आयुक्त कार्यालयामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अतिरिक्त मुख्य सचिव पाणीपुरवठा शामलाल गोयल आदींच्या उपस्थितीत हा संपर्क नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांशी करण्यात आला. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 32 गावांमध्ये या पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेची किंमत 13 कोटी 80 लाख 84 हजार आहे. या 32 गावच्या सरपंचांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आले होते. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयातून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार नानाभाऊ शामकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर पिपरे व पांढरकवडा वगळता अन्य 31 गावांचे सरपंच व सदस्य याठिकाणी उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील पेयजल संदर्भात सुरू असलेल्या प्रयत्नांचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. त्यांनी सर्वप्रथम पांढरकवडा येथील सरपंच रंजनाताई डवरे यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा जिल्हा परिषदेचे सभापती ब्रिजभुषण पाझारे, पंचायत समिती सदस्या सविता कोल्हे, उपसरपंच सुरज तोतडे व ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते. पांढरकवडा ही ग्रामपंचायत 100% पाणीपट्टी वसुली करणारी तसेच स्मार्ट ग्रामपंचायत आहे. या स्मार्ट ग्रामपंचायतीच्या निर्मितीसाठी त्यांनी सरपंच यांचे अभिनंदन केले. गावांमधून शंभर टक्के पाणीपट्टी वसुली झाली पाहिजे. तरच या योजना टिकतील, असे यावेळी त्यांनी सांगितले. सोबतच तुमची ही प्रमुख अडचण असून या योजना सोलरवर आणण्याचा आपण प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असणारे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्याशी संवाद साधला. हंसराज अहिर यांनी मुख्यमंत्र्यांनी आज जिल्ह्यातील 32 पाणीपुरवठा योजनांची भूमिपूजन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आभार मानले. जिल्ह्यातील पाणी पुरवठ्याच्या बाबतीत आपण लक्ष देत असल्याबद्दल आपण आभारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी देखील यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारासाठी आभार मानले. तसेच या जिल्ह्यांमध्ये ज्या गावांमध्ये अशुद्ध पाणी आहे.  त्यांचे स्वतंत्र सर्वेक्षण करण्यात यावे अशी विनंती केली. मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात तातडीने जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल पाठवावा, असे सूचित केले.
            जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी यावेळी 150 गावामध्ये मुख्यमंत्र्यांनी आरो मशीन दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. सोबतच जिल्ह्याच्या प्रत्येक गावांमध्ये आरो मशीन देऊन चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला शुद्ध पेयजल मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खनिज विकास निधीची उपलब्धता असून या निधीची उपयोग करताना आरो मशीन बसवण्यासाठी प्राथम्याने विचार करावा, असे आवाहन केले. लवकरच सोलरवर आधारित योजना कार्यान्वित करण्यात येईल,असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
 आजच्या बैठकीला गदगावच्या सरपंच पुष्पा शंकर गायकवाड, पांझुणीचे सरपंच भारती गजानन काळे,कातलाबोडीचे सरपंच सविता ढेंगळे, जेवराचे सरपंच  सुवर्णा वासेकर, उसेगावच्या सरपंच वैशाली गेडाम, बेलगावचे सरपंच अंबादास पाल, निफद्राच्या सरपंच ममता खंडारे, मांगलीचे सरपंच नानाजी मुंडरे, निमगावचे सरपंच रूपाली ठाकरे, कळमगावचे सरपंच संतोष डांगे, बेलसनीचे सरपंच मंजुषा वाढई, पुनागुडाचे सरपंच कौशल्या कुळसंगे,शेंबडेचे सरपंच विजूमाला जिवतोडे, चांदगावचे सरपंच विद्या नागपुरे, कळमनाचे सरपंच निलेश वाडी साखरीचे सरपंच राजू घरोटे, वर गावचे उपसरपंच शंकर मोहितकर, चांदगावच्या उपसरपंच मनीषा बनसोड, मंगलीचे उपसरपंच गोकुलदास पंढरीकार, गदगावचे उपसरपंच धनराज डवले यांचा समावेश होता.
                                                            0000

Thursday, 3 January 2019

2018-19 च्या बाल महोत्सवाचे थाटात उदघाटन संपन्न


चंद्रपूर, दि.3 जानेवारी - महिला व बाल विकास विभागामार्फत शासकीय व स्वयंसीत संस्थेमध्ये 0 ते 18 वयोगटातील अनाथ, निराधार तसेच कायदा हातात घेतलेले विधी संघर्षग्रस्त मुलांचे, शासकिय व स्वयंसेवी संस्था यांच्याद्वारे पुर्नवसन केले जाते. या मुलांमधील न्युनगंड दूर करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांचा सर्वांगीण विकास करण्याकरीता शासन विविध उपक्रमाद्वारे प्रयत्न करीत आहे. सदर मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी, एकमेकांत बंधुभाव व सांघिक भावना निर्माण होण्याकरीता, त्यांच्यातला आत्मविश्वास, स्वाभिमान व स्पर्धात्मक जगात वावरतांना त्यांच्यातील विविध गुणांना वाव देण्यासाठी प्रथमच महिला व बाल विभागाद्वारे संस्थेतील लाभार्थी व विभागाच्या इतर शाळांमधून शिक्षण घेणारे बालके यांचा एकत्रित तीन दिवसाचा चाचा नेहरू बालमहोत्सव दरवर्षी घेण्यात येत आहे. त्यानुसार यावर्षी क्रीडा महोत्सव 2, 3 व 4 जानेवारी रोजी चंद्रपूर येथील जिल्हा क्रिडा संकुनाच्या पटांगणावर आयोजित करण्यात आले आहे. 
              सदर महोत्सवात मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाचा उदघाटन सोहळा आज सकाळी 11 वाजतापार पडला. याप्रसंगी मंचावर जिल्ह्याचे अप्पर ‍जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे हे अध्यक्षस्थानी आणि प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे व जिल्हा परिवीक्षा रमेश दडमल यांची उपस्थिती होती.
              या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे यांनी केले. यामध्ये बाल महोत्सव जिल्हास्तरावर आयोजित करण्यामागचा उद्देश, शासकीय संस्थांमध्ये वास्तव करणाऱ्या बालकांना बाहेरील दुसऱ्या शाळेच्या बालकांशी स्पर्धात्मक जाणीव निर्माण होणे व त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होण्याकरिता सांगितले.
             यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी बालगृहातील बालकांना इतर शाळेतील बालकांसोबत स्पर्धात्मक खेळामध्ये भाग घेऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि जिंकणे हरणे याबाबत विचार न करता त्यांच्यामध्ये़ खेळाडूवृत्ती निर्माण व्हावी.तसेच पुढील वेळी नव्या उमेदीने स्पर्धेत सहभागी व्हावे, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी बालकांना विविध पैलुवर वेगवेगळे कौशल्य आत्मसात करणे तसेच सर्वच बालकांना अशा स्पर्धात्मक कार्यक्रमांची आवश्यकता आहे. बालकांनी जिद्द ठेवल्यास सर्वकाही साध्य करता येईल, असे सांगितले. या बाल  महोत्सवामध्ये सहभागी संस्थेतील बालकांनी या स्पर्धात्मक युगात शासनाकडून मिळणाऱ्या सोईसुविधांचा योग्य तो उपयोग करावा आणि स्वत:स तयार करावे, असे मार्गदर्शन केले.  त्यानंतर मशाल पेटवून थोड्या थोड्या अंतरावरून वेगवेगळ्या बालकांनी संपूर्ण मैदानामध्ये मशाल फिरविली आणि पाहुण्यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.
            या कार्यक्रमात जिल्ह्यातील बालगृहातील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांनी, विविध शाळांमधील बालकांनी आणि बालसंगोपन अंतर्गत 500 बालकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे संचालन उज्वला पोईनकर आणि आभार प्रदर्शन छोटु बोरीकर यांनी केले.
                                                                000

मुख्यमंत्र्यांसोबत चंद्रपूर जिल्ह्यातील 21 लाभार्थ्यांचा संवाद




चंद्रपूर, दि. 2 जानेवारी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी 2 जानेवारी रोजी प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांशी मंत्रालयातील स्टुडिओ मधून संपर्क साधला. चंद्रपूर जिल्ह्यातील 21 लाभार्थ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.  स्वतःच्या हक्काचे घर मिळाल्याबद्दल जनतेमध्ये या योजनेबद्दल प्रचंड आपुलकी दिसून आली असून त्यांनी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.
          चंद्रपूर जिल्ह्यातील महानगर क्षेत्रातील महानगरपालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना शहरी तसेच राजुरा व वरोरा नगरपालिकेच्या क्षेत्रातील लाभार्थ्यांचा सहभाग करण्यात आला होता. तसेच योजनेमध्ये जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, तसेच शबरी आवास योजना व रमाई आवास योजना यालाही उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. या सर्व लाभार्थ्यांनी महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यांमध्ये या योजनेला मिळालेल्या लाभाच्या यशकथा ऐकता आल्या. मुख्यमंत्र्यांनी दोन तासाचा अवधी मध्ये 10 जिल्ह्यांच्या लाभार्थ्यांसोबत यावेळी चर्चा केली. वेळेच्या कमतरतेमुळे अनेक जिल्हयांसोबत त्यांची चर्चा होऊ शकली नाही.
          तथापि, या योजनेमध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांनी सर्व लाभार्थ्यांचे आभार मानले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेबद्दल घेतलेल्या पुढाकाराने अनेकांना आपल्या हक्काचे घर मिळविण्याचे स्वप्न पूर्ण करता आले असल्याचे यावेळी लाभार्थ्यांस सोबतचा चर्चेत पुढे आले.  प्रत्येकाच्या घर मिळण्याची स्वतंत्र कहाणी होती. चंद्रपूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी काही भेट वस्तूसुद्धा आणल्या होत्या. तत्पूर्वी आज सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी लाभार्थ्यासोबत संवाद साधला. लाभार्थ्यांना या योजनेसंदर्भात कुठलीही अडचण असल्याबाबत विचारणा केली. लाभार्थ्यांच्या संवाद कार्यक्रमानंतर त्यांना सहभागी झाल्याबद्दलचे प्रमाणपत्र अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे आणि निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर यांच्या हस्ते  वितरण करण्यात आले.
     या लोकसंवादमध्ये सहभागी झालेल्या लाभार्थ्यांची नावे सुशीला रामभाऊ झाडे, ताई गुलाब कार्लेकर, करिमाबी अब्दुल जलील कुरेशी, रजनी संजय बारस्कर, नंदा शंकर जुमडे, गजानन आकनुरवार, चक्रधर उपासे, भिमराव माटे, नामदेव शेंडे, अनील सतीमेश्राम, सरीता जतीन आकनुरवार, शितल कोंडू नरड, संगीता अनिल भटारकर, जमुना जीवनदास उपरे, कवीता कवडू पचारे, किशोर निमगडे, छाया श्रीनिवास निमगडे, प्रशांत सुखदेवे, मनोहर मेश्राम, चरित्र चौधरी व अरविंद परचाके यांनी सहभाग घेतला होता. लाभार्थ्यांनी यावेळी मुख्यमंत्री महोदयासोबत प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी उपलब्ध केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.
0000