Search This Blog

Thursday, 30 April 2020

कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांनी प्रयत्न करावे : डॉ.उदय पाटील


चंद्रपूर,दि.30 एप्रिल: जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये गुलाबी बोंड अळी व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रयत्न करावे,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील यांनी केले आहे.
गतवर्षी लांबलेल्या पावसामुळे अधिक उत्पादनासाठी शेतक-यांनी कापूस पीक जानेवारीच्या पुढे तसेच शेतात ठेवलेले होते. वाढीव पावसामुळे लावलेला कापूस हंगाम त्याचबरोबर सिंचनाची सोय असलेल्या काही ठिकाणी अद्यापही कापूस पीक शेतात तसेच राहिल्याने किडीस नियमित खादय पुरवठा होऊन किडीचा जीवनक्रम अखंडीत पुढे चालू राहील. परीणामतः पुढील हंगामात या किडीचा पुन्हा मोठा प्रादुर्भाव होऊ शकतो. सतर्कतेच्या दृष्टीने वरील बाबींकडे दुर्लक्ष न करता आगामी कापूस हंगाम सुरू होण्यापूर्वीपासूनच शेतकऱ्यांमध्ये प्रभावीपणे जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने येणाऱ्या खरीप हंगामामध्ये गुलाबी बोडअळी व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रमुख मुद्यांबाबत ग्रामस्तरावरून विविध प्रसार माध्यमांव्दारे प्रचार व प्रसिद्दी करून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती घडवून आणावी.
असे करावे गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन:
शेवटच्या वेचनी नंतर शेतातील पऱ्हाट्यांचे श्रेडर, रोटाव्हेटर सारख्या यंत्राद्वारे लहान तुकडे करून शेतात गाडणे किंवा त्यांचा वापर शेताबाहेर कंपोस्ट तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना उद्युक्त करणे.उन्हाळयामध्ये (एप्रिल-मे महिन्यात) जमिनीची खोल नांगरट करणे.कापूस पिकाची पुर्वहंगामी (मे-मधील) लागवड टाळणे.गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध संकरीत वाणांची लागवड न करता गावनिहाय एकच वाणाची व एकाच वेळी लागवड करणे.
शिफारस केलेल्या कमी कालावधीत पक्व होणाऱ्या बीटी कापूस अथवा सरळ वाणांची वेळेतच म्हणजे जून महिन्यात जमिनीत पुरेसा ओलावा आल्यानंतर पेरणी करणे.किडीच्या जीवनक्रमात अडथळा निर्माण करण्यासाठी पिकांची फेरपालट करणे.
कपाशीच्या सभोवती नॉन बीटी (रेफ्युजी) कपाशीची लागवड करणे.नत्र खताचा वापर जास्त झाल्यास पिकाची कायिक वाढ होऊन गुलाबी बोंड अळोचा प्रादुर्भाव वाढतो.म्हणून जास्तीच्या नत्र खताचा वापर न करता मृद परिक्षण करून त्याच्या आधारावर खतांच्या मात्रेचा अवलंब करणे.
आपल्या जिल्हयातील जिनींग मिल्समध्ये फेरोमन सापळे लावून मास ट्रॅपिंग करणे.असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ.उदय पाटील यांनी केले आहे.
00000

शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घ्यावा: डॉ.उदय पाटील


चंद्रपूर,दि.30 एप्रिल: उन्नत शेती-समृध्द शेतकरी मोहिम अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण योजना सन 2020-21 या आर्थिक वर्षाकरीता इच्छुक शेतकऱ्यांकडून बी.बी.एफ यंत्र, पेरणी यंत्र सीड ड्रील) व धान रोवणी यंत्र (पॅडी ट्रान्सप्लांन्टर) अनुदानावर खरेदी करण्यासाठी विहीत नमुण्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्जाचा नमुना संबंधित तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयात व या विभागाचे अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सदर अर्जात यथायोग्य परिपुर्ण माहिती भरून, अर्ज आपले गाव स्तरावरील कृषि सहाय्यक किंवा कृषि पर्यवेक्षक किंवा मंडळ कृषि अधिकारी किंवा तालुका कृषि अधिकारी यांचेकडे सादर करावेत.
अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in संकेतस्थळावरून याबाबत माहिती घ्यावी. शेतकऱ्यांनी सदर यंत्रांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले आहे.
00000

Wednesday, 29 April 2020

महिनाभरात जिल्ह्यात पोहचलेल्या नागरिकांवर प्रशासनाची करडी नजर


एका महिन्यात 33 हजार नागरिक स्वगृही दाखल
Ø  जिल्ह्यात एकही पॉझिटिव नागरिक नाही
Ø  आजारी असेल तर तपासणी करा ; धोका पत्करू नका
Ø  प्रशासनाच्या आरोग्य तपासणी व चौकशीला प्रतिसाद देण्याचे आवाहन
Ø  101 पैकी 88 नमुने निगेटिव्ह; 13 प्रतिक्षेत
Ø  132 नागरिक तपासणीसाठी इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाइनमध्ये
Ø  जिल्हाभरात सारी व आयएलआयची तपासणी
Ø  मुख्यालया बाहेरील कर्मचाऱ्यांनी तातडीने रुजू व्हावे
Ø  कोटा शहरातील 39 विद्यार्थी परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू
Ø  यवतमाळ, नागपूर, भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर गस्त वाढवली
Ø  महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रमाला अल्प उपस्थिती ठेवा
Ø  पोलीसांचे रुट मार्च
चंद्रपूर,दि. 29 एप्रिल : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्याभरात बाहेर राज्यात, अन्य जिल्ह्यांमध्ये शिक्षण नोकरी व रोजगारासाठी बाहेर असणाऱ्या जवळपास 33 हजारावर नागरिकांची नोंद गेल्या महिन्याभरात झाली आहे. लॉकडाउननंतर परवानगी घेऊन नागरिक आले आहेत. यापैकी 31 हजार 138 नागरिकांनी 14 दिवसांचा विलगीकरनाचा अर्थात होम कॉरेन्टाइनचा कालावधी पूर्ण केलाय. 2550 नागरिक सध्या हा कालावधी पूर्ण करीत आहे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांकडूनच धोका असल्याने माहिती लपवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
बाहेरून येणाऱ्या नागरिकांबाबत पोलीस प्रशासन अतिशय सक्त असून प्रत्येकाची तपासणी केली जात आहे ही तपासणी आपल्या स्वतःसाठी व कुटुंबासाठी आवश्यक आहे त्यामुळे सगळ्याच यंत्रणेला चुकवून जरी कोणीही जिल्ह्याच्या कोणत्याही भागात वा शहरात पोहोचले असेल तर सामाजिक दायित्व म्हणून स्वतःची माहिती आरोग्य विभागाला देण्याबाबतचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या 07172-270669 या क्रमांकावर किंवा हॅलोचांदाच्या टोल फ्री क्रमांक 155-398 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लॉकडाऊन लागल्यापासून अनेक कर्मचारी कार्यालयात पोहोचले नाही.अशा कर्मचाऱ्यांनी तातडीने आपापल्या कार्यालयात रुजू होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश काढले आहेत. या काळात नियमित कामकाज सुरू करण्यात यावे संबंधित पोलिस विभागाची परवानगी घेऊन कर्तव्य स्थळी रुजू व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
 दरम्यान, कोटा येथे विविध परीक्षांची तयारी करण्यासाठी गेलेले जिल्ह्यातील 39 विद्यार्थी अडकून पडले आहे. या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी राज्य शासनाने तयारी सुरू केली असून त्याचा लाभ चंद्रपूर येथील विद्यार्थ्यांनाही मिळेल अशी अपेक्षा आहे.
 नागपूर यवतमाळ हे 2 जिल्हे रेड झोन मध्ये असून भंडारा जिल्ह्यांमध्ये देखील रुग्ण आढळले आहे. त्यामुळे या जिल्ह्याच्या श्रीमान वरून प्रवेश करताना विनापरवाना कोणालाही आत प्रवेश केल्या जात नाही. नाकाबंदी आणखी कडक करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने पोलिसांना दिले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे यासाठी पोलीसांचा रुट मार्च काढण्यात आला.
जिल्हाभरात सारी व आयएलआयची तपासणी:
कोरोना सोबतच आयएलआय आणि सारी यांचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासनातर्फे युद्धस्तरावर ॲक्शन प्लॅन राबविली जात आहे. प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली वस्ती,डेपो, टेकडी, झोनमध्ये नगरपरिषद कर्मचारी, शिक्षक,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर,आरोग्यसेविका तथा विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची शहराचे सर्वेक्षण करण्यासाठी नेमणूक करून वार्डनिहाय पथकाचे गठन करण्यात आले आहे. बल्लारपूर शहरामध्ये आज घरोघरी जाऊन सर्दी, खोकला,ताप,घसा दुखी, असणाऱ्या तसेच बाहेर देशातून बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांचा सर्वे करून नोंदी घेण्यात आले. प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची फॉर्म नंबर 8 मध्ये माहिती भरून आरोग्य विभागाकडे पाठवून त्यांची तपासणी करण्यात येत असून त्यांना क्वॉरेन्टाईन करण्यात येत आहे. तसेच व्यापारी, दुकानदार, ठोक तसेच चिल्लर भाजी विक्रेते यांची थर्मल स्कॅनरद्वारे टेंपरेचर तपासणी मोहीम सुद्धा राबविण्यात येत आहे. बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी विपिन मुद्धा यांच्या मार्गदर्शनाखाली हि सर्वे मोहीम चालू आहे.
केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप सुरू:
जिल्ह्यामध्ये एपीएल अर्थात केशरी शिधापत्रिकांची संख्या 47 हजार 373 आहे. जिल्ह्यात 24 एप्रिल पासून केशरी शिधापत्रिकाधारकांना प्रतिव्यक्ती 8 रुपये दराने 3 किलो गहू व प्रतिव्यक्ती 12 रुपये दराने 2 किलो तांदूळ वाटप सुरू आहे. आतापर्यंत 748.23 क्विंटल गहू तर 498.07 क्विंटल तांदूळ वाटप झाले आहे. गहू व तांदूळाचे एकूण 1246.30 क्विंटल वाटप झाले आहे. केशरी शिधापत्रिकाधारकांनी आपल्या धान्याची उचल करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्किन यांनी केले आहे.
मुख्यालया बाहेरील कर्मचाऱ्यांनी तातडीने रुजू व्हावे:
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कार्यालयात गर्दी होऊ नये यासाठी अधिकारी-कर्मचारी  यांना आळीपाळीने (रोटेशन) पद्धतीने कार्यालयात बोलवावे. या शासन निर्णयाप्रमाणे केवळ कार्यालयातील एकूण अधिकारी,कर्मचारी यांना उपस्थित राहण्यापासून सूट अनुज्ञेय होती. जिल्हादंडाधिकारी यांनी काढलेल्या आदेशान्वये कोविड-19चा प्रभाव रोखण्याकरिता संचारबंदीचे आदेश पारित केले असल्याने अधिकारी, कर्मचारी यांना मुख्यालय न सोडता मुख्यालयात हजर राहणे अगत्याचे आहे.
जे अधिकारी, कर्मचारी कार्यालय प्रमुखाची किंवा  कार्यालयाची परवानगी न घेता संचारबंदी आदेशाचे व शासन निर्णयाचे उल्लंघन करून मुख्यालय सोडून बाहेरगावी गेलेले आहेत. त्यांनी कलम 188 व 271 भा.दं.वि.व कलम 37 (3) व 135 महाराष्ट्र पोलीस कायदा तसेच कलम 2,3,4 साथीचे रोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केले आहे व त्याद्वारे ते शिक्षेस पात्र असून अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून सदर कायदेशीर तरतुदींच्या अनुषंगाने खुलासा प्राप्त करावा व त्यांचेवर  नियमानुसार कार्यवाही करावी. असे एका परिपत्रकाद्वारे जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात 29 एप्रिल रोजी कोरोना संसर्ग संशयित म्हणून 109 नागरिकांची नोंद करण्यात आली असुन यातील  101 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 88 नमुने निगेटिव्ह निघाले आहेत तर 13 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या 33 हजार 688 आहे. यापैकी 2 हजार 550 नागरिक निगराणीखाली आहेत. तर 14 दिवसांच्या होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 31 हजार 138 आहे. जिल्ह्यामध्ये इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 132 आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांनी दिली आहे.
नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांविरुध्द जिल्हा प्रशासनाने कारवाई करत जिल्ह्यातील 292 प्रकरणात एकूण 15 लाख 70 हजार 870 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये नियमांचे पालन न करणाऱ्या  58 नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तर 1 हजार 35 वाहने जप्त केली आहेत.प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेले नियम व सुचनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द आणखी कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
00000

जिल्ह्यात कोरोना संकटात सहाय्यता निधीला मदत करण्याचे आवाहन


आतापर्यंत जिल्ह्यात 68 लाख जमा
चंद्रपूर दि. 29 एप्रिल : देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूच्या या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्यापरिने गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करीत असून या संकटावर मात करण्यासाठी आवश्यक निधी कोविड-19 या माध्यमातून जमा केला जात आहे.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मदत निधीचे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनास  उत्तम प्रतिसाद मिळत असून या आवाहनास  प्रतिसाद देत अनेक संस्था, व्यक्ती यांनी जिल्हा सहायता निधीच्या खात्यात देणग्या देणे सुरू केले आहे.
आज प्रामुख्याने डी.आर.लिखार चंद्रपूर यांच्याकडून रु.51 हजार, दि लिटल फ्लॉवर कॉन्व्हेंट, नगीनबाग, चंद्रपूर यांच्यावतीने रु.11 हजार, इनरव्हील क्लब ऑफ चांदाफोर्ट चंद्रपूर यांच्याकडून रु.15 हजार ,दिपाली चिंतावार यांच्याकडून रु.5 हजार, कर्मवीर कर्मचारी सह.पतसंस्था नागभीडच्या वतीने रु.11 हजार तर सेवा सह. संस्था सास्ती, विश्वशांती विद्यालय कर्मचारी सह. पतसंस्था सावली व शेतकरी सहकारी भातगिरणी संस्था, सावलीच्या वतीने प्रत्येकी रु.5 हजाराचा धनादेश जिल्हा सहायता निधीस देण्यात आला.
मदतीसाठी  बँक खात्यात पैसे जमा करा !
      कलेक्टर चंद्रपूर कोव्हिड-19 या नावाने जिल्ह्यातील अग्रणी बँक ऑफ इंडियामध्ये ‍ स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून खाते क्रमांक  960310210000048  असून यासाठी आयएफएससी कोड  BKIDOOO9603  असा आहे. जिल्ह्यातील उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी सढळ हाताने मदतीची रक्कम जमा  करावी  असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
0000

शारीरिक अंतर राखण्यासाठी शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते गटांमार्फत खरेदी करावीत


कोरोनाच्या संकटात कृषी निविष्ठा पुरवठ्यासाठी विभागाचा सल्ला
चंद्रपूर,दि.29 एप्रिल: कृषि विभागातील अधिकारी,कर्मचाऱ्यांनी ग्राम पातळीवर समन्वयक म्हणून काम केल्यास कृषि सेवा केंद्र आणि शेतकरी गट यांचे माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांचे शेतावर बी-बियाणे, खते, अवजारे, औषधे (कृषी निविष्ठा) पुरवठा करणे शक्य आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी दिली आहे.
खरीप हंगाम 2020 सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि किटकनाशके यांचा पुरवठा वेळेमध्ये होणे अत्यंत आवश्यक आहे. राज्यामध्ये कोरोना विषाणूच्या पाश्वभुमीवर सर्व जिल्ह्यामध्ये  संचारबंदी जाहीर करण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कृषि सेवा केंद्रावर येऊन बियाणे, खते व किटकनाशकांची खरेदी केल्यास जास्त गर्दी होऊ शकते आणि फिजीकल डिस्टन्सिंग न पाळले गेल्यामुळे कोरोना विषाणूंचा  फैलाव मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. त्यामुळे जसे शेतकरी गटांमार्फत भाजीपाल्याचा पुरवठा शहरांमध्ये कृषि विभागाच्या समन्वयाने करण्यात आला त्याच धर्तीवर कृषि निविष्ठांचा पुरवठा कृषि सेवा केंद्र आणि शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपणी यांचा समन्वय करावयाचा आहे. ग्रामपातळीवर शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांचा पुरवठा करण्याकरिता शेतकऱ्यांनी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी.असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.
शेतक-यांनी त्यांच्या भागात असलेल्या आणि त्यांना सोयीच्या गटांकडे त्यांची नोंदणी करून घ्यावी. नोंदणी करून घेतांना आत्मा अंतर्गत ज्या गटांची नोंदणी झालेली आहे.त्याच गटांकडे नोंदणी होईल असे पाहावे.त्यानिमित्ताने 100 टक्के शेतकऱ्यांची नोंदणी कोणत्या ना कोणत्या गटाकडे करणे शक्य होईल.
शेतकऱ्यांनी त्यांचे नाव, पत्ता, सर्वे नंबर/गट नंबर, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, त्यांना ज्या कृषि सेवा केंद्रामधुन निविष्ठा खरेदी करावयाच्या आहेत. त्यांच्या नावासह, त्यांना खरीप हंगामामध्ये आवश्यक असणारे विविध पिकांचे बियाणे, खते, किटकनाशके यांची मागणी गटाकडे करावी.
क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी, कर्मचारी यांनी उत्पादक शेतकऱ्यांचे गट पिकनिहाय तयार करून शेतकऱ्यांना गटाव्दारे आवश्यक बियाणे नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे. ही सर्व कार्यवाही क्षेत्रीय स्तरावरील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी समन्वयक म्हणून करावी.
निविष्ठांची नोंदणी गटांकडे झाल्यानंतर गटप्रमुखानेच बियाणे/खते/किटकनाशके खरेदी करावी. जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना विक्री केंद्रावर जावे लागणार नाही.
ज्या विक्रेत्यांना शक्य आहे. अशा विक्रेत्यांनी मोबाईल अॅप तयार करून शेतकऱ्यांची मागणी नोंदवून घ्यावी आणि मोठी मागणी असल्यास मागणीप्रमाणे बियाणे, खते व किटकनाशके शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पोहच करावेत.
कृषि सेवा केंद्र ते शेतकरी गट या वाहतूकी करीता कृषि व आत्मा विभागाच्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांनी समन्वयक म्हणून काम करावे. या वाहतुकीकरीता आवश्यक असणारे परवाने संबंधित तालुका कृषि अधिकारी यांनी गटांकरीता उपलब्ध करून दयावेत.
मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक किंवा कृषि सहाय्यक व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) यांचे मार्फत व्हिडीओ कॉलव्दारे शेतकरी आणि कृषि निविष्ठा विक्रेता यांचा समन्वय घडवुन आणावा जेणेकरून सदर निविष्ठा  खरेदी व्यवहारामध्ये पारदर्शकता राहुन शेतकऱ्यांची फसवणुक होणार नाही. शेतकऱ्यांनी त्यांना हव्या असलेल्या आणि वाजवी दरामध्ये निविष्ठांचा पुरवठा करणाऱ्या निविष्ठा विक्रेत्याकडुन निविष्ठा खरेदी करण्यासाठी नोंदणी करावी.
शेतकरी व निविष्ठा विक्रेता यामधील आर्थिक बाबी शेतकरी गटामार्फत पारदर्शक पध्दतीने हाताळण्यात याव्यात. या करीता कृषि विभागाच्या अधिकाऱ्याने मार्गदर्शन करावे.
निविष्ठा पुरवठ्याबाबत तालुका स्तरावर कालबध्द कार्यक्रम आखण्यात येत आहे. दिनांक 31  मे 2020 पुर्वी अथवा पेरणी हंगाम सुरू होण्यापुर्वी शेतकऱ्यांना सर्व निविष्ठांचा पुरवठा होईल असे नियोजन करण्यात येत आहे.
00000