Search This Blog

Thursday 30 April 2020

कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांनी प्रयत्न करावे : डॉ.उदय पाटील


चंद्रपूर,दि.30 एप्रिल: जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये गुलाबी बोंड अळी व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रयत्न करावे,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील यांनी केले आहे.
गतवर्षी लांबलेल्या पावसामुळे अधिक उत्पादनासाठी शेतक-यांनी कापूस पीक जानेवारीच्या पुढे तसेच शेतात ठेवलेले होते. वाढीव पावसामुळे लावलेला कापूस हंगाम त्याचबरोबर सिंचनाची सोय असलेल्या काही ठिकाणी अद्यापही कापूस पीक शेतात तसेच राहिल्याने किडीस नियमित खादय पुरवठा होऊन किडीचा जीवनक्रम अखंडीत पुढे चालू राहील. परीणामतः पुढील हंगामात या किडीचा पुन्हा मोठा प्रादुर्भाव होऊ शकतो. सतर्कतेच्या दृष्टीने वरील बाबींकडे दुर्लक्ष न करता आगामी कापूस हंगाम सुरू होण्यापूर्वीपासूनच शेतकऱ्यांमध्ये प्रभावीपणे जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने येणाऱ्या खरीप हंगामामध्ये गुलाबी बोडअळी व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रमुख मुद्यांबाबत ग्रामस्तरावरून विविध प्रसार माध्यमांव्दारे प्रचार व प्रसिद्दी करून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती घडवून आणावी.
असे करावे गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन:
शेवटच्या वेचनी नंतर शेतातील पऱ्हाट्यांचे श्रेडररोटाव्हेटर सारख्या यंत्राद्वारे लहान तुकडे करून शेतात गाडणे किंवा त्यांचा वापर शेताबाहेर कंपोस्ट तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना उद्युक्त करणे.उन्हाळयामध्ये (एप्रिल-मे महिन्यात) जमिनीची खोल नांगरट करणे.कापूस पिकाची पुर्वहंगामी (मे-मधील) लागवड टाळणे.गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध संकरीत वाणांची लागवड न करता गावनिहाय एकच वाणाची व एकाच वेळी लागवड करणे.
शिफारस केलेल्या कमी कालावधीत पक्व होणाऱ्या बीटी कापूस अथवा सरळ वाणांची वेळेतच म्हणजे जून महिन्यात जमिनीत पुरेसा ओलावा आल्यानंतर पेरणी करणे.किडीच्या जीवनक्रमात अडथळा निर्माण करण्यासाठी पिकांची फेरपालट करणे.
कपाशीच्या सभोवती नॉन बीटी (रेफ्युजी) कपाशीची लागवड करणे.नत्र खताचा वापर जास्त झाल्यास पिकाची कायिक वाढ होऊन गुलाबी बोंड अळोचा प्रादुर्भाव वाढतो.म्हणून जास्तीच्या नत्र खताचा वापर न करता मृद परिक्षण करून त्याच्या आधारावर खतांच्या मात्रेचा अवलंब करणे.
आपल्या जिल्हयातील जिनींग मिल्समध्ये फेरोमन सापळे लावून मास ट्रॅपिंग करणे.असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ.उदय पाटील यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment