Search This Blog

Thursday 23 April 2020

24 एप्रिलपासून केशरी शिधापत्रिकाधारकांनाही होणार धान्य वाटप


प्रतिव्यक्ती 8 रुपये दराने 3 किलो गहू व
प्रतिव्यक्ती 12 रुपये दराने 2 किलो तांदूळ मिळणार
चंद्रपूरदि.23 एप्रिल: जिल्ह्यातील एपीएल अर्थात केशरी शिधापत्रिकाधारकांना गहू रु.8 प्रतिकिलो व तांदूळ रु.12 प्रतिकिलो या दराने प्रतिमाह प्रतिव्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ याप्रमाणे 5 किलो अन्नधान्य माहे मे व जून2020 या 2 महिन्यांच्या कालावधीकरीता वितरीत करण्यात येईल. अशी माहिती एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्किन यांनी दिली आहे.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट होवू न शकलेल्या व एपीएल (केशरी) शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना माहे मे व जून2020 या 2 महिन्यांच्या कालावधीकरीता सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्याबाबतचा विषय शासनाचे विचाराधीन होता. राष्ट्रीय अनसुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना सद्यस्थितीत शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येत नसल्याने दिनांक 9 एप्रिल2020 चे शासन निर्णयानुसार देशातील  कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर त्यांना मे व जून2020 या 2 महिन्याच्या कालावधीकरीता सवलतीच्या दराने अन्नधान्य देण्याबाबत शासन स्तरावरून निर्णय घेण्यात आलेला आहे.
अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे दिनांक 9 एप्रिल2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार ज्यांचेकडे केशरी शिधापत्रिका आहे व सद्यस्थितीत सवलतीचे दराचे धान्य मिळत नाही व ज्यांचे शिधापत्रिकेवर संगणकीकृत क्रमांक किंवा कोणत्याही योजनेचा शिक्का नसेल अशा चंद्रपूर जिल्हयातील सर्व पिवळे व केशरी शिधापत्रिकाधारकांना उपरोक्त दराप्रमाणे व परिमाणात अन्नधान्य दिनांक 24 एप्रिल 2020 पासून त्यांची शिधापत्रिका ज्या रास्तभाव दुकानात नोंदविली असेल त्याच दुकानातून उपलब्ध करुन देण्यात येत आहे.केशरी शिधापत्रिकाधारकांनी धान्य घेण्यासाठी रास्तभाव दुकानात जातांना आपली शिधापत्रिका व आधारकार्ड सोबत ठेवावे व दुकानात त्याचा क्रमांक नोंदवून घ्यावा.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत नियमित धान्य मिळणाऱ्या अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थींना सूचीत करण्यात येते कीत्यांचे मे महिन्याचे नियमित धान्यवाटप हे मे महिन्याच्या 2-3 तारखेपासून सुरु होईल व मोफतचे धान्यवाटप हे 8 मे पासून सुरु होईल.
सर्व शिधापत्रिकाधारकांनी वर दिलेल्या तारखेपासून जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांनी जीवनावश्यक वस्तूंचे विक्रीसाठी ठरवून दिलेल्या सकाळी 7 ते दुपारी 2 या  वेळेतच रास्तभाव दुकानात जावे. दुकानात सामाजिक अंतर हे कटाक्षाने पाळावे व मास्क घालूनच जावे.
ज्यांचेकडे स्वतःची शिधापत्रिका नाही अशा लोकांनी  रास्तभाव दुकानात गर्दी करुन रास्तभाव दुकानदारास त्रास देवू नयेअन्यथा त्यांचेविरुध्द रोग प्रतिबंधक कायदा 1897 व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल. असे जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन यांनी स्पष्ट केले आहे.
00000

No comments:

Post a Comment