Search This Blog

Wednesday 8 April 2020

ग्राहकांची फसवणूक केल्यास रास्तभाव दुकानदारांवर होणार कारवाई : राजेंद्र मिस्कीन


चंद्रपूर, दि .8 एप्रिल : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रोग प्रतिबंधक कायदा 1897 दिनांक जिल्ह्यात लागू केलेला आहे. त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये मनाई आदेश काढण्यात आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये एप्रिलमे व जून -2020 या 3 महिन्याकरिता त्या- त्या महिन्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्नयोजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना (ज्यांच्याकडे अंत्योदय किंवा प्राधान्य कुटुंब योजनेची शिधापत्रिका (रेशन कार्ड) आहे असे) प्रति मानसी 5 किलो तांदूळ मोफत वाटप केले जाणार आहे. जे लाभार्थी विकतचे धान्य घेतील अशाच शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य वाटप केल्या जाईल. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्नयोजनेअंतर्गत वाटप करण्यात येणाऱ्या तांदुळाचा काळाबाजार होणार नाही. याबाबत तपासणी करण्यासाठी पथक नेमण्यात आलेले आहे.
7 एप्रिल रोजी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी चंद्रपूर शहरातील काही दुकानांना भेटी देऊन तपासणी केली असता विठ्ठल मंदिर वार्ड येथील  पटकोटवार यांचे स्वस्त धान्य दुकान बंद असल्याचे आढळून आल्याने सदर दुकानाचा पंचनामा करून दुकान जवळच्या दुकानास जोडण्याचे आदेश दिले असून सदर दुकान निलंबित करण्यात आले आहे.
तसेच बंगाली कॅम्प येथील मदन शहा यांच्या दुकानाची जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी तपासणी केली असता अंत्योदय कार्डधारकांना अंत्योदय योजनेचे धान्य वाटप न करता प्राधान्य कुटुंब योजनेचे धान्य देऊन ग्राहकांची फसवणूक करीत धान्याचा काळाबाजार करीत असल्याचे दिसून आले. याबाबत त्यांच्या दुकानास जोडलेल्या सर्व अंत्योदय कार्डधारकांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिले असून कार्डधारकांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित दुकान धारकावर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन यांनी कळविले आहे.
माहे एप्रिल-2020 मध्ये 1 तारखेपासून चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत रास्त भाव दुकानदार विरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच दुकाने निलंबित करण्यात आली आहे. सदर मोहीम यापुढेही अशीच सुरू राहणार असून तपासणीअंती दोषी आढळून आल्यास रास्तभाव दुकानदारा विरुद्ध वेळीच कारवाई करण्यात येईल अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन यांनी दिली आहे.
00000

No comments:

Post a Comment