गावागावांत वित्तीय समावेशन संतृप्तता शिबिरांचे आयोजन
चंद्रपूर, दि. 21 : जिल्ह्यातील प्रत्येक पात्र नागरिकाला बँकिंग व वित्तीय सेवांचा लाभ मिळवून देण्यासाठी भारत सरकारच्या वित्तीय समावेशन अभियानांतर्गत दिनांक 1 नोव्हेंबर 2026 ते ते 12 जानेवारी 2027 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये विविध बँकांमार्फत वित्तीय समावेशन संतृप्तता शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
शिबिरामध्ये उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधा : 1) प्रधानमंत्री जनधन योजना (अंतर्गत पात्र नागरिकांची बँक खाती उघडणे, 2) प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना यांसारख्या सामाजिक सुरक्षा विमा योजनांची माहिती व पात्रतेनुसार नोंदणी, 3) बँक खात्यांचे ई-केवायसी व केवायसी अद्ययावतीकरण करणे, 4) केंद्र सरकारच्या विविध वित्तीय समावेशन योजनांची माहिती देणे, 5) बँकिंग सेवा, आर्थिक साक्षरता व सामाजिक सुरक्षा योजनांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करणे.
नागरिकांना आवाहन : चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या गावात आयोजित करण्यात येणाऱ्या या शिबिरामध्ये सहभागी होऊन उपलब्ध बँकिंग सुविधा व शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिरात उपस्थित राहून बँक खाते उघडणे, विमा योजनांमध्ये नोंदणी करणे तसेच आपल्या बँक खात्याचे केवायसी अद्ययावत करून घ्यावे.
००००००
No comments:
Post a Comment