Search This Blog

Monday, 7 October 2019

रांगोळी स्पर्धेद्वारे करण्यात आली मतदान जनजागृती स्वीप अभियानांतर्गत स्पर्धेचे आयोजन


चंद्रपूर, दि. 5 ऑक्टोबर: महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून मतदान संदर्भात जिल्ह्यातील महिलांमधे जागृती घडवून आणण्यासाठी स्वीप अंतर्गत सरकार नगर येथे महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्वीप’ अंतर्गत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा प्रयत्न प्रशासन व निवडणूक आयोगातर्फे करण्यात येत आहे.
             मतदार जागृतीसाठी चंद्रपूर शहरात व जिल्ह्यात आयोजित करण्यात येत असलेल्या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अनुषंगाने सरकार नगर परिसरात महिलांसाठी  रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेवून मतदार जागृतीसंबंधीच्या संदेशाचे विविध आकर्षक रांगोळींद्वारे रेखाटन केले.
विधानसभा निवडणुकीच्या मतदारांना मार्गदर्शन करण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत शनिवारला चंद्रपूर शहरातील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मतदार जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला स्वीप मोहिमेचे नोडल अधिकारी ( शहर ) युधिष्ठीर रैच यांनी उपस्थित महिलांना  मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले. भारतीय संस्कृतीत घरातील महिला कुटुंबाच्या उज्वल भविष्यासाठी अविरत कार्यरत असते. ज्याप्रमाणे कुटुंबातील महिला त्या घराचा कणा असतो त्याचप्रमाणे भारतातील महिला भारतीय लोकशाहीचा कणा आहेत. त्यांच्या पुढाकाराने मतदान जनजागृती मोहिमेस बळ मिळणार आहे. महिलांनी स्वतः मतदान तर करावेच त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबातील तसेच आपल्या परिसरातील प्रत्येक मतदाराचे मतदान होईल याची काळजी घ्यावी. तसेच चंद्रपूर शहरातील मतदानाची टक्केवारी उर्वरित मतदारसंघापेक्षा कमी असून ही टक्केवारी वाढवण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात स्वीप मोहिमेचे नोडल अधिकारी ( शहर ) युधिष्ठीर रैच तसेच स्वीप टिमचे अधिकारी विशाल देशमुख, सूर्यकांत भडके, श्री. भोयर, परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
0000000

Saturday, 5 October 2019

जिल्ह्यात आणखी चार निवडणूक निरीक्षक दाखल

सकाळी 11 ते 12 दरम्यान नागरिकांना भेटता येणार
चंद्रपूर, दि. 4 ऑक्टोबर: 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी भारतीय निवडणूक आयोगामार्फत नियुक्त केलेले 3 मुख्य निवडणूक निरीक्षक व 1 पोलिस निवडणूक निरीक्षक दाखल झाले आहे. निवडणुकी संदर्भात काही तक्रारी असल्यास नागरिकांना सकाळी 11 ते 12 दरम्यान भेटता येणार आहे. जिल्ह्यात एकूण सहा निवडणूक निरीक्षक दाखल झाले आहेत.
राजुरा व चंद्रपूर  विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक राघवेंद्र कुमार सिंह यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा संपर्क क्रमांक 9423936892 व 8821030521 आहे.
बल्लारपूर व ब्रह्मपुरी मतदार संघाकरिता गंगाधर पात्रा यांची निवडणूक निरिक्षक म्हणून निवडणूक आयोगामार्फत नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा संपर्क क्रमांक 9423938597 व 7821068983 आहे.
चिमूर व वरोरा मतदार संघाकरिता यु. डी. खान यांची निवडणूक निरिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली असून त्यांचा संपर्क क्रमांक 9423938642 व 7821012610 आहे.
सोबतच पोलीस निवडणूक निरिक्षक म्हणून अमित चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा संपर्क क्रमांक 9423953127 व 7821077282 आहे.
यापूर्वी 28 सप्टेंबर 2000 19 रोजी राजूरा, चंद्रपूर, बल्लारपूर या विधानसभा मतदारसंघाकरिता धृबाज्योती रे दाखल झाले होते. त्यांचा संपर्क क्रमांक 9423938642 व 7820885887 आहे. तसेच    ब्रह्मपुरी, चिमूर, वरोरा विधानसभा मतदारसंघासाठी के. विनोदकुमार यांची निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा संपर्क क्रमांक 9423938729 व 7820888992 आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीकरिता एकूण सहा निवडणूक निरीक्षक दाखल झाले असून या सर्वांचे रामबाग येथील वन विभागाच्या विश्रामगृहात वास्तव्य आहे. जिल्ह्यातील नागरिकांना निवडणुकीसंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास प्रत्यक्ष संपर्क करून किंवा वन विभागाच्या विश्रामगृहात प्रत्यक्ष भेट घेऊन तक्रार करता येणार आहे. प्रत्यक्ष भेट घेण्याची वेळ सकाळी 11 ते 12 दरम्यान निश्चित करण्यात आली आहे.
000

मतदान करणे हा युवांचा हक्क व जबाबदारीही - डॉ. खेमनार


स्वीप अंतर्गत सरदार पटेल महाविद्यालयात मतदार जनजागृती कार्यक्रम
चंद्रपूर 4 ऑक्टोबर - अठरा वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीला मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे. यामुळे प्रत्येकाने आपल्या नावाची नोंद मतदार यादीत करावी व  मतदानाचा हक्क बजावणे हा युवांचा हक्क व जबाबदारीही असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी ४ ऑक्टोबर रोजी सरदार पटेल महाविद्यालयात आयोजित केलेल्या जनजागृती कार्यक्रमा प्रसंगी केले. 
            विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  युवावर्ग व भावी मतदारांना मार्गदर्शन करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत गुरुवारी सरदार पटेल महाविद्यालयात जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. मतदानाचा हक्क बजावण्यापासून महाविद्यालयीन विद्यार्थी लांब असतात. यामुळे स्विप योजनेंतर्गत मतदानाच्या हक्काबाबत मार्गदर्शन करण्यात आले. काही नवमतदार असल्याने मतदान कसे करावे आणि मतदान करणे का आवश्यक आहे याची त्यांना पुरेशी कल्पना नाही. यामुळे युवा मतदारांना मतदानाचा अधिकार व मतदान कसे करावे याची माहिती देण्यात आली.
            निवडणूक आयोगाने मतदानातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी निवडणूक ओळखपत्र तयार करण्याची विशेष मोहीम राबविली. मात्र अशा मोहिमेत ‘शासनाचे काम’ अशा पद्धतीने याकडे लक्ष न देता देशाप्रतीचे महत्त्वाचे कर्तव्य म्हणून या मोहिमेस आपला सहभाग नोंदविणे गरजेचे आहे. केवळ आपले ओळखपत्र करून न थांबता समाजातील इतरही घटकांना याविषयीची माहिती देण्यात सुजाण नागरिकांचा पुढाकार अपेक्षित आहे. महाविद्यालयातील युवक राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अशा स्वरूपाचा जनजागृती उपक्रम प्रभावीपणे राबवू शकतात. यात मतदार जनजागृतीपर रॅली, प्रभात फेरी, विविध स्वरूपाच्या स्पर्धा यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा सहभाग घेण्यात येतो. मतदार म्हणून आपल्याला असलेल्या अधिकारांबाबत जागरूक राहिल्यास देशातील लोकशाही व्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होऊ शकेल. अशा स्वरूपाची जागृती घडवून आणण्यासाठीच निवडणूक आयोगातर्फे दरवर्षी २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.मतदारजागृतीच्या प्रयत्नात युवांनी सहभागी व्हावे आणि मतदार नोंदणी प्रक्रियेत सहभागी होऊन मतदानासाठी सज्ज व्हायला हवे.
            या कार्यक्रमासाठी नोडल अधिकारी निवडणूक जनजागृती कार्यक्रम स्वीप तथा शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद दिपेंद्र लोखंडे, सरदार पटेल कॉलेजचे प्राचार्य श्री. इंगोले चंद्रपूर, श्री. देशमुख तसेच मोठ्या प्रमाणावर शिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.  
0000

स्वयंसेवी संस्था व्यापारी मंडळांचा लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग

स्वयंसेवी संस्था व्यापारी मंडळांचा लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग
मतदान केलेल्या नागरिकांना आकर्षक सूट देण्याचे व्यावसायिकांनी केले जाहीर
चंद्रपूर, दि. 3 ऑक्टोंबर: येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध माध्यमातून प्रयत्न करणे सुरू आहे या अभियानाचा भाग म्हणून नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात चंद्रपूर शहरातील व्यापारी संस्था तसेच व्यापारी मंडळाचे सोबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीमध्ये शहरातील नागरिकांनी मतदान केल्यास त्यांना आकर्षक सूट दिल्या जाणार आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपक्रम सुरू केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील यासंदर्भात जिल्हा प्रशासनामार्फत प्रत्येक मतदाराला आपला हक्क वापरता यावा, यासाठी आवाहन करण्यात येत आहे. तसेच विविध उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायिक, किराणा व्यवसायिक, मॉल, रेस्टोरंट, फूड सेंटर तसेच विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी यांच्या सोबत जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींना आवाहन करताना त्यांनी सांगितले की, या लोकशाहीच्या उत्सवांमध्ये मतदान करणार्‍या मतदात्याला लोकशाही बळकट करण्याच्या प्रक्रियेत सहभाग नोंदवल्या बद्दल त्यांना सन्मानित करण्याची परंपरा रुजवावी, असे आवाहन त्यांनी केले.
यामध्ये व्यवसायिकांनी विविध मुद्दे उपस्थित केले. तसेच मतदान करून आलेल्या मतदाराला त्याच्या बोटावरील शाही बघून मोठ्या प्रमाणात सूट देण्याबाबत इच्छा व्यक्त केली. यासंदर्भात अधिकृत निवेदन व्यापारी संघटनांकडून जिल्हाधिकारी यांना दिले जाणार आहे. तसेच या उपक्रमाला चंद्रपूर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने प्रतिसाद देऊन मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सहकार्य करतील, अशी आशा या बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आली.
0000
2014 विधानसभा व  2019 लोकसभेच्या मतदानाच्या टक्केवारीचा आढावा
चंद्रपूर: दि, 3 सप्टेंबर: महाराष्ट्र राज्याच्या 14 विधानसभा निवडणूक येत्या 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारतीय निवडणूक आयोग तसेच जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता अनेक उपक्रम सुरु केले आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण मतदारांची संख्या  17 लाख 59 हजार  134  होती. त्यापैकी  11 लक्ष  65 हजार 706  मतदारांनी  मतदानाचा हक्क बजावला.  यामध्ये 6 लाख 15 हजार 630 पुरुष मतदार तर 5 लाख 49 हजार 976 महिला मतदारांनी सहभाग नोंदवला. चंद्रपूर जिल्ह्याची एकूण मतदानाची टक्केवारी 66.72 टक्के होती. यामध्ये सर्वाधिक ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघात 74.83 टक्के मतदान झाले. त्यापाठोपाठ चिमूर मतदारसंघ 74. 55 टक्के, राजुरा मतदारसंघ 70. 83 टक्के, वरोरा मतदार संघ 64.81 टक्के, बल्लारपूर 63. 18 तर सर्वात कमी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ 54.07 टक्के मतदान झाले होते.
आता 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 18 लाख 72 हजार 787 मतदारांची नोंदणी झालेली आहे. म्हणजे  1 लाख 13 हजार मतदारांची वाढ झालेली आहे. विशेष म्हणजे  या मतदारांच्या झालेल्या वाढीमध्ये 22 मतदार तृतीयपंथी आहेत. एकूण मतदारांमध्ये 9 लाख 60 हजार 727 पुरुष मतदार तर 9 लाख 18 हजार 938 महिला मतदारांचा समावेश आहे. यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील सहा मतदार संघात एकूण 66.50 टक्के मतदान झाले होते. त्यामध्ये राजुरा मतदारसंघात 69.61 टक्के, बल्लारपूर 64.16 टक्के, वरोरा 63.35  टक्के, चंद्रपूर 53.10  टक्के, चिमूर 73.52 टक्के, ब्रह्मपुरी 75.27 टक्के मतदान झाले होते.
आकडेवारी बघितल्यास चंद्रपूर मतदारसंघात मतदानाची टक्केवारी इतर मतदारसंघाच्या तुलनेत 10 टक्केनी कमी आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाचे या मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केले असून विविध उपक्रम व अभियानाच्या माध्यमातून चंद्रपूर शहरातील मतदानाची टक्केवारी वाढावी, याकरिता अनेक उपक्रम राबवले जात आहे.
00000

मतदानाची टक्केवारी वाढविण्यास फिरणार चित्ररथ


चंद्रपूर 3 ऑक्टोबर - स्वीप ( सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन ) अंतर्गत मतदान जनजागृती अभियान चंद्रपूर जिल्ह्यात लोककलेच्या माध्यमातून जनजागृती पथनाट्य व फिरते चित्र रथ माध्यमातून मतदान जनजागृती मोहिमेला 3 ऑक्टोबर रोजी सुरवात करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या हस्ते  हिरवी झेडीं दाखवून या उपक्रमाला सुरवात करण्यात आली.
भारत सरकार, सूचना व प्रसारण मंत्रालय, क्षेत्रीय आउटरीच ब्यूरो, फील्ड ऑडिट ब्यूरो वर्धा, निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, तसेच  जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपुर यांच्या संयुक्त विद्यमाने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या स्वीप मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत  चंद्रपूर शहरातील रहदारीची ठिकाणे व गेल्या  निवडणुकीत जिथे मतदानाची टक्केवारी कमी होती अश्या १६ ठिकाणांची निवड करून मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
            आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून २१ ऑक्टोबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून मतमोजणी २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या राष्ट्रीय महोत्सवात १८ वर्षावरील सर्व मतदार मतदान करण्यासाठी सज्ज असणार आहेत.  १८ वर्षावरील सर्व युवक, महिला व वृद्ध तसेच दिव्यांग मतदारांनी मतदान करावे याकरिता जिल्हा निवडणूक विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मतदान जनजागृतीसाठी चंद्रपूर शहर व  जिल्ह्यात विविध ठिकाण चित्ररथ व माहिती फलके लावून जनजागृती केली जात आहे.
             यंदाच्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे म्हणून निवडणूक आयोगातर्फे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यातील अनेक जागी  लोककलेच्या माध्यमातून मतदार जनजागृती केली जात आहे. प्रलोभनांना नागरिकांनी बळी पडू नये त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाद्वारा मतदार जनजागृतीकरिता विशिष्ट पद्धतीने चित्ररथ तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या ठिकाणांची निवड करून त्याजागी चित्ररथ सर्वत्र फिरवून त्याद्वारे मतदानाचा संदेश दिला जात आहे.
            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संपत खलाटे, स्वीप नोडल अधिकारी ( जिल्हा ) दीपेंद्र लोखंडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके स्वीप नोडल अधिकारी ( शहर ) श्री. युधिष्ठीर रैच उपस्थित होते. 
00000