Search This Blog

Saturday, 30 November 2019

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घ्यावा : डॉ. कुणाल खेमनार


चित्ररथांच्या माध्यमातून होत आहे शेतीविषयी योजनांची जनजागृती
चंद्रपूर, दि. 30 नोव्हेंबर : जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय चंद्रपूर मार्फत योजना शेतकऱ्यांच्या दारी या अभियानाची सुरुवात 26 नोव्हेंबरला झाली या अभियानाच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनामार्फत शेतीच्या संदर्भात विविध योजना थेट शेतकऱ्यांच्या दारी पोहोचता यावे व या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी चित्ररथ  चंद्रपूर जिल्ह्यातील तालुक्यामधील गावांमध्ये जाऊन जनजागृती करीत आहे.
या चित्ररथाच्या माध्यमातून शेतीच्या विकासाच्या संदर्भातील विविध योजनेचा लाभ घेता यावा यासाठी प्रसिद्धी होत आहे तसेच शेतकऱ्यांना शेती संदर्भातील योजनांची नोंदणी तालुका कृषी अधिकारी कार्यालय व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय येथे करावी यासाठी मार्गदर्शनात्मक ठरत आहे.
असे असणार चित्ररथाचे मार्ग
आज दिनांक 1 डिसेंबर रोजी राजुरा तालुक्यातील राजुरा आठवडी बाजार येथे चित्ररथ येणार आहे. चंद्रपुर तालुक्यातील देवाडा, शिवणीचोर,हिंगनाळा,मार्डा या गावांमध्ये तर भद्रावती तालुक्यातील पानवडाळा, नंदोरी, बल्लारपूर तालुक्यातील कोर्टीमक्ता, कोर्टीतुकुम, मूल तालुक्यातील जानाळा,कांतापेठ,टोलेवाही,चिरोली (बाजार), सावली तालुक्यामधील केरोडा,पेटगाव,घोडेवाही, नागभीड मधील कोदेपार,वासाळा मेंढा,वासाळामक्ता,किटाळी मेंढा,मिंडाळा, चिमूर तालुक्यातील ब्राह्मणगाव, तळोधी,मासळ, जिवती तालुक्यातील पाटण, कोरपना तालुक्यातील तामसी,कुर्ला, तांबडी, ब्रह्मपुरी तालुक्यांमधील तोरगांव, देऊळगाव कोलारी, पोंभूर्णा तालुक्यातील डोंगरहळदी, वरोरा मधील वरोरा, सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही (आठवडी बाजार), कारघाटा, गोंडपिंपरी तालुक्यांमधील गोंडपिंपरी, विठ्ठलवाडा या तालुक्यातील गावांमध्ये चित्ररथ येणार असून या माध्यमातून शेतीच्या विकासासंदर्भातील अनेक योजनांची माहिती मिळणार आहे. या शेतीच्या विकासासंदर्भातील अनेक योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ .कुणाल खेमनार यांनी केले आहे
00000

सैनिकी शाळेमध्ये मुलींना प्रथमच प्रवेश 6 डिसेंबरपूर्वी ऑनलाईन नोंदणीचे आवाहन


चंद्रपूर, दि. 30 नोव्हेंबर: चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या सैनिकी शाळा चंद्रपूर येथे मुलींना वर्ग सहावी करिता प्रवेश देण्यात येणार असून त्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलींनी 6 डिसेंबर 2019 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन प्राचार्य स्क्वार्डन लीडर नरेशकुमार यांनी केले आहे. केंद्र सरकारने मुलींसाठी प्रथमच सैनिकी शाळेत प्रवेश सुरू केला आहे. पश्चिम दक्षिण भारतात चंद्रपूरसैनिकी शाळेपासून हि सुरुवात होत आहे.
शैक्षणिक वर्ष 2020 करिता मुलींना सैनिकी शाळेचे शिक्षण मिळवण्याची दारे खुली झाली असून चंद्रपूर जिल्ह्यात नव्यानेच उभारण्यात आलेल्या सैनिकी शाळेमध्ये मुलींना प्रवेश देण्यात येणार आहे. या शाळेत प्रवेश घेण्याकरिता प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असून त्याची ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. 26 नोव्हेंबर 2019 पासून ऑनलाईन नोंदणी सुरू झाली असून मुलींना वर्ग 6 वी करिता प्रवेश घेण्याकरिता साठी 6 डिसेंबर 2019 पर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलींनी सैनिकी शाळेमध्ये प्रवेश घेण्याकरिता ऑनलाईन नोंदणी करावी, असे सैनिकी शाळेमार्फत आव्हान करण्यात आले आहे.
00000

Wednesday, 27 November 2019

शासनाकडून घरी येणाऱ्या प्रगणकाला योग्य माहिती द्या : उपजिल्हाधिकारी खलाटे


केंद्र शासनाच्या ७ व्या आर्थिक गणनेला सुरुवात
चंद्रपूर दि. २६ नोव्हेंबर : जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय व सेवा यांची गणना करण्यासाठी जिल्ह्यात आजपासून सातव्या आर्थिक गणनेला सुरुवात झाली आहे. केंद्र शासनामार्फत राष्ट्रव्यापी ही मोहीम असून यासाठी आपल्या घरापर्यंत येणाऱ्या प्रगणकाला योग्य माहिती द्या, असे आवाहन उपजिल्हाधिकारी एस. पी. खलाटे यांनी आज येथे केले.
            जिल्हा सांख्यिकी अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित या पत्रकार परिषदेला ते संबोधित करीत होते. यावेळी जिल्हा सांख्यिकी अधिकारी अमित सुतार, वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी दीपक मेश्राम, समन्वय अधिकारी शेख आदी उपस्थित होते.
            कृषी,खानकाम, वस्तू निर्माण, पाणी पुरवठा, बांधकाम, घाऊक व्यापार, किरकोळ व्यापार, वाहतूक ,साठवण, उपाहारगृहे, हॉटेल माहिती व दळणवळण संदर्भातील सेवा ,वित्तीय व विमा सेवा , स्थावर मालमत्तेसंबंधीचे कार्य, व्यावसायिक, वैज्ञानिक व तांत्रिक कार्य, प्रशासकीय व आधार सेवा कार्य शैक्षणिक मानवी आरोग्य व सामाजिक कार्य, कला, करमणूक, क्रीडा, मनोरंजन व अन्य कार्यात सहभागी असणाऱ्या आस्थापनाची व नियमित काम करणाऱ्या व्यक्तींची माहिती यामार्फत घेण्यात येते.
           कॉमन सर्विस सेंटर अर्थात सीएससी या यंत्रणेमार्फत आर्थिक गणनेचे काम करण्यात येत असून त्यांच्या मार्फतच प्रगणकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे प्रगणक आपले ओळखपत्र दाखवून जिल्हाभरातून घराघरातून माहिती गोळा करणार आहे. या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन खलाटे यांनी यावेळी केले. केंद्र शासनाकडे ही माहिती गोळा केली जाणार असून त्याआधारे देशाच्या समृद्धतेचा योजना तयार केल्या जातात. देशामध्ये जनगणना, पशुगणना ज्या पद्धतीने केली जाते तशीच ही आर्थिक गणना आहे.
            देशाच्या आर्थिक आघाडीवर वेगवेगळे धोरण व योजना ठरवताना हि माहिती कामी येते. जनतेने या माहितीचा कुठलाही गैरवापर होणार नाही, याबाबत आश्वस्त असावे. तसेच जनतेला कुठलाही त्रास होत नाही, किंवा लक्ष्य केले जात नाही हे लक्षात घ्यावे. प्रगणक . अर्थात माहिती घ्यायला येणाऱ्याला सौजन्य दाखवावे, माहिती योग्य पद्धतीने द्यावी असे देखील खलाटे यांनी स्पष्ट केले.
            या गणनेसाठी जिल्हास्तरावर एक समिती गठीत करण्यात आली असून त्या समितीमार्फत या गणनेवर लक्ष ठेवले जाते. पुढील 90 दिवसाच्या आत ही गणना पूर्ण करण्यात येणार आहे. यापूर्वी 2013 मध्ये देखील ही गणना करण्यात आली होती. जनतेने या कामी सहकार्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
00000

संविधानाने निर्भयमुक्त समाज निर्माण केला : विमलताई गाडेकर



जिल्हा माहिती कार्यालयात संविधान दिन
चंद्रपूर, दि. 26 नोव्हेंबर: स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये  भारतीय समाजामध्ये प्रचंड असमानता होती. त्या काळात फक्त श्रीमंतांना मतदान करण्याचा अधिकार होता. परंतु संविधानामुळे  भारतात समानता प्रस्थापित  होऊन सर्वांना समान अधिकार प्राप्त झाले. तसेच समाजातील प्रत्येक घटकाला समान न्याय  मिळाले. त्यामुळे  संपूर्ण समाज भयमुक्त झाला, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ साहित्यिक, समाजसेविका विमलताई गाडेकर यांनी व्यक्त केली. जिल्हा माहिती कार्यालय चंद्रपूर मार्फत आयोजित संविधान दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना महिलांना अनेक अधिकार संविधानामुळे प्राप्त झाले असून  समाजातील प्रत्येक मागासवर्गीय वंचित घटकाला  समानतेचा अधिकार  प्राप्त झाला.  मानवतेची जाण असणारा  समाज निर्माण व्हावा. याकरिता व्यवहार कसे असावे. प्रत्येक व्यक्तीने स्वतःचे हित जोपासत असताना दुसऱ्याचे अहित होणार नाही याची काळजी काळजी घेण्याची जाणीव संविधान आपल्याला करून देते. प्रत्येकाला जगण्याचा, वावरण्याचा व आनंदमय जीवन जगण्याचा अधिकार असून त्याला तो प्राप्त करण्यासाठी संविधानाने  प्रत्येक गोष्टीची  नोंद केलेली आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी सहाय्यक प्रकल्प अधिकारी निलय राठोड यांनी मार्गदर्शन करताना देशातील जनतेला खरे स्वातंत्र्य संविधानाला मान्यता मिळाल्यानंतरच मिळाले,  असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी विजय गराटे यांनी  संविधानाबद्दल माहिती सांगितली. सोबतच जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी संविधानाची उद्देशिका उपस्थितांना समजावून सांगितली. या कार्यक्रमाला जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन सचिन दळवी तर आभार सुरज साळुंके यांनी मानले.
00000

शेतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवा : देवराव भोंगळे



संविधान दिनाला जिल्हा माहिती कार्यालयामार्फत माहिती आपल्या दारी अभियानाला सुरुवात

चंद्रपूर, दि. 26 नोव्हेंबर: शेतकरी बांधवांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र शासन तसेच राज्य शासनामार्फत अनेक योजना शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या आहे. शेतीच्या उपयोगी असलेले तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर पोचण्यासाठी प्रशासनाने कार्य करावे. आज संविधान दिवसासारख्या पवित्र दिवसाला जिल्हा माहिती कार्यालयाने शेतकऱ्यांच्या योजना शेतकऱ्यांच्या दारी या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. याचा चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निश्चित फायदा होईल असा आशावाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी व्यक्त केला. दिनांक 26 नोव्हेंबर 2019 रोजी कृषी भवन येथे चित्ररथ अनावरण सोहळ्यात बोलत होते. 
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती अर्चनाताई जीवतोडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अविनाश सोमनाथे, कृषी विकास अधिकारी एस. किरवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल काळभोर, कृषी उपसंचालक रवींद्र मनोहरे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके तसेच प्रगतिशील शेतकरी पांडुरंग कोकोडे, सिद्धार्थ फुलझेले, रोशन रामटेके, मौर्यकांत गोहने, विठ्ठल कोठे, पर्वतराव कुळमेथे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त प्रयत्नातून शेतकऱ्यांच्या योजना शेतकऱ्यांच्या दारी या अभियानाला सुरुवात झाली आहे. जिल्हा माहिती कार्यालयामार्फत प्रसिद्धी व प्रत्येक तालुका कृषी अधिकाऱ्याकडून योजनेची अंमलबजावणी असे या अभियानाचे स्वरूप आहे. या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या संपूर्ण योजनांची व्यापक स्वरूपात प्रसिद्धी करण्यात येणार आहे. याद्वारे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता प्रोत्साहित केले जाणार आहे. यासाठी जिल्हा माहिती कार्यालय अंतर्गत 70 टक्के निधी शेतकरी योजनांच्या प्रसिद्धीसाठी वापरण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये 15 चित्ररथ गावोगावी फिरणार आहे. प्रत्येक तालुक्यात एक चित्ररथ बहुतेक गावात जाऊन शेती संदर्भातील योजनांची प्रसिद्धी करणार आहे. या चित्ररथाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून त्यांना गावोगावी फिरण्यासाठी रवाना करण्यात आले. तसेच आठवडी बाजाराच्या ठिकाणी आणि आणि जास्तीत जास्त लोकसंख्येच्या गावांमध्ये हे पथनाट्याच्या माध्यमातून योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. शेतकऱ्यांना योजना संदर्भात संपूर्ण माहिती देता यावी. या दृष्टिकोनातून 3 लाख पत्रकांचे जिल्हाभरातील प्रत्येक शेतकऱ्याला वितरण करण्यात येणार आहे. तसेच या आठवडाभर स्थानिक वृत्तपत्राच्या साह्याने प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. सोबतच जिल्हाभरात योजनांचे फलक लावण्यात आले आहे.

शेतकऱ्याच्या उन्नतीकरिता जिल्हा प्रशासनाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी उपयोगी असणाऱ्या विविध योजनांची प्रसिद्धी करण्यात येत आहे. याद्वारे शेतीसंदर्भात संदर्भातील योजनांची माहिती घेऊन शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याकरिता तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा. तसेच योजनेचा लाभ घेण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची जिथे आवश्यकता आहे. तिथे डब्लूडब्लूडब्लू डॉट आपले सरकार डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाइन अर्ज सादर करावा. चंद्रपूर जिल्ह्यात सिंचनाचे क्षेत्र कमी असून जिल्ह्याला सिंचनक्षम जिल्हा बनवण्यासाठी कृषी विभागाच्या सिंचनासंदर्भातील योजनांचा लाभ घ्यावा. यात काही प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु केलेल्या हॅलो चांदा या हेल्पलाईनचा उपयोग करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.


000