Search This Blog

Friday, 29 June 2018

मिशन मोडवर 13 कोटी वृक्ष लागवड पूर्ण करा -- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार



Ø  वृक्षारोपण जनजागृती दिंडीचा शुभारंभ
Ø  असेल वन तर टिकेल जीवन
गोंदिया, दि. 28 जून - मानवी जीवनात वनांचे अनन्य साधारण महत्व आहे. वृक्ष मानवाला प्राणवायू देतात आणि मानवच वनांचा व पर्यावरणाचा ऱ्हास करतो. याचाच परिणाम म्हणून   पाऊस कमी झाला 56 दिवसाचा पाऊस 18 दिवसांवर आला. हे दृष्ट चक्र थांबवायचे असेल वृक्ष लागवड व संवर्धन हाच एकमेव पर्याय असून 13 कोटी वृक्ष मिशन मोडवर पूर्ण करा, असे आवाहन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन द्वारे चिचगड येथे आयोजित वृक्षारोपण जनजागृती दिंडीच्या शुभारंभ समारंभात ते बोलत होते.

महाराष्ट्र शासनाच्या वृक्षारोपनाविषयी जनजागृती करण्यासाठी ही वृक्ष दिंडी काढण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातील चिचगड येथे आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. ही दिंडी नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यातील गाव आणि शहरांमध्ये जनजागृती करणार आहे.
  पालकमंत्री ना. राजकुमार बडोले हे कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमास आमदार प्रा. अनिल सोले, आ. संजय पुराम, आ. विजय रहांगडाले, आ. रामदास आंबटकर, जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे,  जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अल्ताफ हमीद, उपवनसंरक्षक  युवराज, चिचगडचे सरपंच कल्पना गोस्वामी, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रामरतन राऊत  हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. श्रीराम मंदिर देवस्थान चित्रकूट वांढरा चिचगड येथे  वृक्ष लावून दिंडीला सुरुवात करण्यात आली.
यावेळी बोलताना वनमंत्री म्हणाले की, वनासाठी मनापासून अनमोल क्षण देणाऱ्या लोकांनी वृक्ष लागवडीचे व्रत घेतले आहे. वन संवर्धन हे सर्वांचे काम आहे. हे काम ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन स्वयंस्फुर्तपणे करीत असल्याने त्यांनी आ. अनिल सोले यांचे अभिनंदन केले. वृक्ष लागवड हे मिशन आहे. अनेक उत्सवात वृक्षाचे महत्त्व विषद आहे असे सांगून ना. मुनगंटीवार म्हणाले की, महात्मा जोतिबा फुले यांचे विद्य विना मती गेली हे आपण ऐकत आलो. आज ज्योतिबा असते तर वृक्षा विना जल गेले, जल विना शेती गेली, शेती विना धन गेले, आणि एवढे अनर्थ एका वनाने केले,  असे ते म्हणाले असते.
लोकांमध्ये मनापासून वन लावण्याची इच्छा निर्माण करा असे ते म्हणाले. पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या सामान्य माणसालाच  पर्यावरणाच्या ऱ्हासाचा अधिक त्रास  सहन करावा लागतो. हा त्रास कमी करण्यासाठी मोठया प्रमाणात झाडे लावण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.   गोंदिया जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नक्की मदत केली जाईल,असे त्यांनी यावेळी सांगितले. मासेमारी करणाऱ्या भोई समाज बांधवांना मासेमारीची लीज कमी करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे श्रीराम मंदिर विकासासाठी जिल्हा नियोजन मधून निधी दिला जाणार आहे.
पालकमंत्री राजकुमार बडोले यावेळी बोलताना पालकमंत्री राजकुमार बडोले म्हणाले की, वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे. वसुंधरा जगवायची असेल तर वृक्ष लागवड व संवर्धन हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. गोंदिया जिल्ह्याने गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणात वृक्ष लावले आहेत. यावर्षी 31.64 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करू अशी खात्री त्यांनी दिली. नाविन्यपूर्ण योजनेत गेल्या वर्षी दोनशे सेंटीमीटरच्या वरील उंचीच्या वृक्ष संवर्धनासाठी शेतकऱ्यांना पाच हजार रुपये अनुदान दिले होते. ही योजना यावर्षी सुद्धा सुरू ठेवली जाणार असून दीडशे सेंटीमीटर उंचीच्या वृक्ष संवर्धनासाठी निधी दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या विकासासाठी शासनाने 75 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असे म्हणाले. मामा तलावाच्या बळकटी करणासाठी सुद्धा निधी दिला आहे. पन्नास टक्के बळकटीकरण झाले आहे, मात्र अजून निधीची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. व्याघ्र प्रकल्प व इतर विकास कामे मार्गी लावण्यासाठी पावसाळी अधिवेशनात बैठक लावण्याची विनंती त्यांनी यावेळी केली. नागझिरा मधील मुरदोली गेट सुरू करावे, मागील वर्षी पेरणी न झालेल्या  तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत करावी, मत्स्यव्यवसाय करणाऱ्या भोई बांधवांची लीज कमी करावी आशा मागण्या ना. बडोले यांनी यावेळी केल्या.
आ. संजय पुराम 68 गावातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा मोबदला मिळावा अशी मागणी करून आमदार संजय पुराम म्हणाले की, जिल्ह्यातील मध्यम सिंचन प्रकल्प वन विभागाच्या अडचणी मुळे रखडले आहेत ते पूर्ण करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. शासनाने चिचगडला अप्पर तहसिल कार्यालय मंजूर  केल्याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले. धारगड, कचारगड, हाजरा फॉलचा विकास शासन करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.द
आ. प्रा. अनिल सोलेअनिल सोले यांनी वृक्ष दिंडीच्या आयोजना मागील भूमिका आपल्या भाषणात विषद केली. वनमंत्री मनापासून ही मोहीम राबवित आहेत, त्यांना आपण साथ देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. आज जर आपण लक्ष दिले नाही तर भविष्यात आपल्यावर पाश्चाताप करण्याची वेळ येईल असे ते म्हणाले. म्हणून आपण सर्वांनी या मोहिमेत सहभागी होऊन वृक्ष लागवड संवर्धन करू असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहन बक्षीस, हरित सेने सदस्य प्रमाणपत्र, घरगुती गॅस कनेक्शनचे वाटप वनमंत्री व पालकमंत्री यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास गावकरी, वृक्षप्रेमी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    देवरी-कोहमारा- सडक अर्जुनी-गोरेगाव-गोंदिया असा प्रवास करून ही वृक्ष दिंडी गोंदियाला मुक्कम करणार आहे. 29 जून रोज शुक्रवार सकाळी 10 वाजता गोंदिया वन विभागातर्फे कार्यक्रम घेऊन तिरोडा-तुमसर-मोहाडी-भंडारा असा प्रवास करीत भंडारा येथे मुक्काम करणार आहे. 30 जून रोज शनिवारला लाखनी-पालांदूर- लाखांदूर-वडसा-आरमोरी-गडचिरोली आणि मुक्काम. 1 जुलै रोज रविवारला गडचिरोली- चामोर्शी- पोंभुर्णा-चंद्रपूर- मुक्काम 2 जुलैला चंद्रपूर ते वर्धा आणि मुक्काम असा प्रवास राहणार आहे. 3 जुलै रोज मंगळवारला वर्धा- पवनार-सेलू- केळझर- खडकी- सिंदी-बुटीबोरी-नागपूर आणि समारोप असा वृक्ष दिंडी दौरा राहणार आहे.
   या संपूर्ण वृक्ष दिंडी दौऱ्यात आ. प्रा. अनिल सोले, अध्यक्ष, ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन प्रामुख्याने उपस्थित राहणार असून वृक्षारोपण करण्याबाबत जनजागृती ते आपल्या मार्गदशनातून करणार आहेत.
या संपूर्ण वृक्षदिंडीत त्यांच्यासोबत त्या त्या भागातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असून यात जास्तीत जास्त वृक्षप्रेमी, नागरिक आणि लोकप्रतीनिधिनी भाग घेण्याचे आवाहन अध्यक्ष, ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन आ. प्रा अनिल सोले यांनी केले आहे.
                                                                  0000

चंद्रपूर जिल्हयातील सर्व पंचायत समितीच्या इमारतीला आधुनिक स्वरूप देणार : ना. मुनगंटीवार



पंचायत समितीच्या नव्या इमारतीचे लोकार्पण
     * फर्निचरसाठी एक कोटी रुपये अतिरिक्त देणार
 चंद्रपूर दि. 28 जून- चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती अत्याधुनिक स्वरूपाच्या व्हाव्यात, यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे. वरोरामध्ये निर्माण झालेल्या नव्या इमारतीच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक असणारे फर्निचर उपलब्ध केले जाईल. मात्र या सुविधा भेटत असताना पंचायत समितीच्या इमारती म्हणजे गरीबांना हात देणाऱ्या यंत्रणा झाल्या पाहिजे, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल येथे केले.
गुरुवारी रात्री उशिरा पंचायत समितीच्या नव्या इमारतीचे लोकार्पण करताना त्यांनी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या नागरिकांची व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. वरोरा पंचायत समितीच्या वास्तुला दिग्गज सभापतींचा वारसा लाभला आहे. अशा जुन्या जाणत्या सर्व सभापतींचा सत्कार देखील यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी केला. वरोरा पंचायत समिती मार्फत लोकशाही व्यवस्थेत गरीबाच्या समस्या सुटण्याची आदर्श वहिवाट निर्माण व्हावी, अशी अपेक्षा यावेळी जुन्याजाणत्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. वरोरा भद्रावती क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली जात आहे. वरोरा नगरपालिकेला 17 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यापुढेही आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध केल्या जाईल, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, माजी मंत्री संजय देवतळे, जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, सभापती ब्रिजभूषण पाझारे, सभापती अर्चना जीवतोडे, वरोरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष एहतेशाम अली, वरोरा पंचायत समितीच्या सभापती रोहिणी देवतळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  चंद्रकांत वाघमारे,  जिल्हा परिषदेचे कार्यकारी  अभियंता  नरेंद्र बुरांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पंचायत समिती वरोरा येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम ‘ 2515 इतर ग्रामीण विकास कार्यक्रम अंतर्गत ’ महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागामार्फत करण्यात आले आहे. 1 कोटी 65 लाख हजार रकमेच्या या इमारतीचे बांधकाम दोन माळयामध्ये करण्यात आले आहे.  या ठिकाणी सभापती, उपसभापती यांचे कक्ष आहेत. याशिवाय सामान्य प्रशासन, पंचायत व शिक्षण विभागाच्या कार्यालयाचा  देखील  समावेश आहे. पहिल्या मजल्यावर बैठकीकरिता एक मोठे सभागृह या इमारतीचे  वैशिष्ट्य  आहे. याशिवाय वेगवेगळ्या 12 खोल्या असून यामध्ये संवर्ग विकास अधिकारी कक्ष, सहाय्यक गट  विकास अधिकारी कक्ष, पशुसंवर्धन, आरोग्यकृषी,  पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयाचा अंतर्भाव आहे. पंचायत समिती अंतर्गत असलेल्या एकूण नऊ विभागाची कार्यालये या इमारतीमध्ये राहणा आहे. या इमारतीमध्ये आवश्यक असणाऱ्या फर्निचरसाठी लागणारा  एक कोटीचा खर्च पालक मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी मंजूर करण्याचे  आश्वासन  यावेळी  दिले. पावसामुळे उशीर झालेल्याया कार्यक्रमात रात्री उशिरा मोठ्या संख्येने जुने पदाधिकारी उपस्थित होते. त्या सर्वांशी  ना.सुधीर मुनगंटीवार  यांनी परस्पर  संवाद साधला.
                                                                           0000

देशात 100% गॅस वापरणारा बल्लारपूर हा पहिला मतदारसंघ व्हावा : ना.सुधीर मुनगंटीवार



487 कुटुंबाला गॅस वाटपविसापूरला ग्रामपंचायत इमारत उभारणार

चंद्रपूर, दि.28 जून- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागातल्या सर्व महिलांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला हात घातला असून यापुढे कोणत्याही महिलेला स्वयंपाक करतांना धुराचा त्रास सहन करावा लागणार नाही.  माझ्या मतदार संघातील महिलांना देखील धुराचा त्रास होऊ नये, अशी लोकप्रतिनिधी म्हणून माझी इच्छा आहे. देशातील शंभर टक्के गॅस वापरणारा बल्लारपूर मतदारसंघ व्हावा, त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचा निर्धार विसापूर येथील कार्यक्रमात राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
27 जून रोजी सायंकाळी विसापूर येथे मध्य चांदा वनविभाग व वनपरिक्षेत्र बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजनेअंतर्गत विसापूर व नांदगाव पोडे येथील लाभार्थ्यांना एलपीजी कनेक्शन वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती असणाऱ्या या कार्यक्रमाला पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबतच व्यासपीठावर चंद्रपूरच्या महापौर अंजलीताई घोटेकर, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा, उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, जिल्हा परिषद सदस्य हरीष गेडाम, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसिलदार विकास अहीर, विभागीय वनअधिकारी श्री.सोनकुसरे, किशोर पंदीलवार, सभापती गोंविंदा पोडे, विद्याताई गेडाम, सरपंच रिता गिल्टे, वैशाली बुद्दलवार, रमेश पिपरे, दिलीप खैरकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. सुधीर मुनगंटीवार यांनी  विसापूर गावासोबत असलेल्या आपल्या जुन्या  ऋणानुबंधांची उकल केली. ते म्हणाले 1995 मध्ये  पहिल्यांदा निवडून आलो तेव्हा एक कोटीचे सिमेंट रस्ते या गावासाठी आपण बनवले होते. संघर्षाची सुरुवात या गावापासून केली आणि संघर्ष कसा करायचा हे देखील  या गावाने शिकवले. त्यामुळे  विसापूर या गावाच्या संपूर्ण विकासाबद्दल आपण बांधील असून  नजीकच्या   काळात देशाच्या नकाशावर या गावाची ओळख बनेल. विसापूर जवळ नव्याने उभे राहत असलेले बॉटनिकल गार्डन, देशातील सर्वात सुंदर बॉटनिकल गार्डन होत आहे. ताडोबा  येथे व्याघ्र दर्शनासाठी येणारे  जंगल पर्यटनाचा लाभ घेणारे पर्यटक काही दिवसांनी बॉटनिकल गार्डन बघायला सुद्धा येतील. या ठिकाणच्या निर्माणाधीन क्रीडा स्टेडियमच्या  बाबतही आपण अत्यंत आशावादी असून या अत्याधुनिक क्रीडा संकुलातून  तुमच्या माझ्यात  वावरणाऱ्या आदिवासी, बहुजन समाजातील एखाद्या मुलाने उद्या भारताचे प्रतिनिधित्व करत ऑलिपिंक पदक मिळवले तर नवल वाटायला नको !  त्या दृष्टीनेच आपण नियोजन करत असून त्यासाठी सर्व सोयी-सुविधांनी उभ्या राहणा-या क्रीडांगणाचा वापर केला जाईल, असे देखील त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी  हा जिल्हा रोजगार मुक्त जिल्हा बनवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नाबाबत उपस्थितांना माहिती दिली.  बल्लारपूर मधील डायमंडकटिंग सेंटर सोबतच बल्लारपूर मध्ये रेडिमेट कपड्याच्या संदर्भात महिलांना मोठा रोजगार उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितलेबचत गटांना गावागावात उभारण्यात येणाऱ्या ऑरो मशीन चालवण्याचे काम दिले जात आहे. त्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध करण्याबाबत आपण पुढाकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले.  विसापूरसह 57 गावांना दिवाबत्तीची व्यवस्था करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी विसापूर गावांमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबा फुले  महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा उभा करण्याच्या संदर्भातआलेल्या प्रस्तावाचे तातडीने स्वागत  केल्याचे  लक्षात  आणून दिले.  तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या  पुतळ्याचे  सौदर्यीकरणही  केले असल्याचे त्यांनी सांगितले.  या परिसरातील गरीब लोकांना धान्य वाटपाच्या संदर्भात लवकरच अभिनव कार्यक्रम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित विसापूरच्या नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी लवकरच विसापूरची  देखणी  ग्रामपंचायत इमारत बांधणार असल्याचे  आश्वासन दिले. यावेळी त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात एलपीजीगॅस  कनेक्शन  वितरणही  त्यांनी  केले.  
                                                         000