Search This Blog

Thursday 17 February 2022

महसूल परिषदेच्या पार्श्वभुमीवर विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

 







महसूल परिषदेच्या पार्श्वभुमीवर विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

Ø चंद्रपूरात पूर्व विदर्भातील जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिका-यांची उपस्थिती

चंद्रपूर, दि. 17 : महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असून सामान्य  नागरिकांचा या विभागासोबत दैनंदिन संपर्क येतो. नागरिकांना अधिक सुलभतेने व गतिमान पध्दतीने सेवा देण्यासाठी येत्या 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी नागपूर विभागाच्या अधिका-यांसाठी महसूल परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे – वर्मा यांनी पूर्व विदर्भातील जिल्हाधिका-यांचा आढावा घेतला.

चंद्रपूर येथील वन अकादमीत झालेल्या बैठकीला चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला, वर्धाच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मिना, भंडाराचे जिल्हाधिकारी डॉ. संदीप कदम, महसूल उपायुक्त मिलिंद साळवे, चंद्रपूरच्या अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, गोंदियाचे अपर जिल्हाधिकारी राजेश खवले आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना विभागीय आयुक्त म्हणाल्या, महसूल अधिका-यांमार्फत सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी व वेळेत काम पूर्ण होण्यासाठी ही महसूल परिषद अतिशय महत्वाची ठरणार आहे. यात महसूलविषयक अनेक बाबींबाबत चर्चा करण्यात येणार असल्याने त्याचा फायदा अधिका-यांना दैनंदिन कामकाजात करता येईल. आपात्कालीन परिस्थितीत आपण सर्वजण काम करतोच, मात्र त्यामुळे महसूल विषयक बाबींकडे दुर्लक्ष होता कामा नये. आपली बदली किंवा सेवानिवृत्त जरी झालो तरी आपला विभाग कायम राहणार आहे. त्यामुळे महसुल विषयक मुलभूत बाबींवर लक्ष केंद्रीत करा. सर्व अधिका-यांना या परिषदेचा फायदा होईल, या दृष्टीने जबाबदारी ठरवून देण्यात आलेल्या जिल्हाधिका-यांनी आपापल्या विषयाबाबत सादरीकरण करावे, अशा सुचना त्यांनी केल्या.

सदर परिषदेमध्ये महसुली कायद्याच्या तरतुदीनुसार प्रकरणे, गौणखनीज सुधारणा व तरतुदी, जमीन विषयक बाबी (भुसंपादन सोडून), अधिकारी अभिलेख संगणीकीकरण, वित्तीय व आस्थापनाविषयक बाबी आणि भुसंपादन व मुल्यांकन या विषयांवर सादरीकणातून चर्चा होणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्हाधिका-यांवर जबाबदारी देण्यात आली आहे.

बैठकीला सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्यासह इतर जिल्ह्यांचे सहाय्यक जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी निवासी उपिल्हाधिकारी विशाल मेश्रामतहसीलदार निलेश गौंड नायब तहसीलदार सचिन खंडाळेजिल्हा खानिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांनी परिश्रम घेतले.

००००००००

No comments:

Post a Comment