‘मावज’च्या सोशल मीडिया मोहीमेमुळे महाराष्ट्राच्या चित्ररथास “लोकपसंती” -दीपक कपूर
चंद्रपूर/मुंबई, दि. 4 : -‘जैवविविधता व राज्य मानके’ या विषयावरील महाराष्ट्राच्या चित्ररथास “लोकपसंती” या वर्गवारीत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी झाला होता. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या आक्रमक सोशल मीडिया मोहीमेमुळे जनादेश जिंकण्यात मोलाची मदत झाल्याचे गौरवोद्गार माहिती व जनसंपर्क प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर यांनी काढले आहेत.
जैवविविधतेच्या बाबतीत महाराष्ट्र हे अत्यंत समृद्ध राज्य असून सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत साकारण्यात आलेल्या या चित्ररथाव्दारे महाराष्ट्रातील जैव विविधतेतील समृद्धता दिसून आली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयानेही ऑनलाइन ओपिनियन पोल आक्रमकपणे पुढे नेण्यात मोलाचे योगदान दिले. एकत्रित आणि आक्रमक सोशल मीडिया मोहीम राबविल्यामुळे राज्याला लोकपसंती वर्गवारीत जनादेश जिंकण्यात मोठी मदत झाली. असे गौरवोद्गार काढत माहिती व जनसंपर्क प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.
‘मावज’ची ऑनलाईन मोहीम
महाराष्ट्र राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने देखील या चित्ररथाला ऑनलाईन मतदान करण्यासंदर्भात आवाहन करण्यासाठी व्हॉटस्ॲप, ट्विटर, फेसबुक या व अन्य सर्व समाजमाध्यमांच्याद्वारे विशेष मोहीम राबवली होती. यामध्ये महाराष्ट्राला सर्वांधिक 23 टक्के मते मिळाली होती. ऑनलाईन मतदानात उत्तर प्रदेश व महाराष्ट्रात चुरस होती. सुरुवातीच्या टप्प्यात उत्तर प्रदेश 21 टक्के ऑनलाईन मते मिळवून आघाडीवर होता. महाराष्ट्रास या टप्प्यात 17 टक्के मते प्राप्त झाली होती. मात्र अंतीम टप्प्यात झालेल्या चुरशीच्या स्पर्धेत महाराष्ट्राने 23 टक्के मते मिळवुन प्रथम क्रमांक पटकाविला. दुसरा क्रमांक उत्तर प्रदेश- (22 टक्के) तर, तिसरा क्रमांक हा जम्मु व काश्मीर- ( 13 टक्के ).
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर व सचिव सौरभ विजय यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक बिभीषण चवरे यांच्या देखरेखीखाली या चित्ररथाची निर्मिती करण्यात आली. हा चित्ररथाची संकल्पना रेखाचित्र व त्रिमितीय प्रतिकृती तुषार प्रधान आणि रोशन इंगोले या तरूण मूर्तीकार व कलादिग्दर्शक यांनी केले होते. यावर्षीचा हा चित्ररथ नागपूरच्या ‘शुभ ॲड्स’ ने तयार केला आहे. संचालक नरेश चरडे आणि पंकज इंगळे आणि राहूल धनसरे व त्यांच्या 30 मूर्तीकार व कलाकारांसह भव्य प्रतिकृतीचे काम प्रत्यक्ष दिल्लीतील रंगशाळेत पूर्ण केले होते.
00000
No comments:
Post a Comment