Search This Blog

Sunday, 20 February 2022

बफर क्षेत्रातील वाघ शहराकडे येऊ नये यासाठी वनविभागाने उपाययोजना कराव्यात-ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

 






बफर क्षेत्रातील वाघ शहराकडे येऊ नये यासाठी वनविभागाने उपाययोजना कराव्यात

-ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

Ø सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती

चंद्रपूर, दि. 20 फेब्रुवारी :ऊर्जानगर परिसरात मोठ्या प्रमाणात गवत, झुडपे, काटेरी वनस्पती वाढलेली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांना लपण्याची जागा निर्माण झाली आहे. अनेक वन्यप्राण्यांचा वावर या परिसरात आहे. त्यामुळे हे वन्यप्राणी शिकारीकडे वळतात, त्यामुळे या परिसरातील खुरपे, झाडे-झुडपे नष्ट करून परिसराची स्वच्छता राखावी. अशा सूचना राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी  दिल्या.

हिराई विश्रामगृह, ऊर्जानगर येथे सुरक्षा उपाययोजनेच्या दृष्टीने वरिष्ठ वन अधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य अभियंता पंकज सपाटे, महावितरणचे मुख्य अभियंता  सुनील देशपांडे,  मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, संचालक प्रशांत खाडे, महापारेषणचे अधीक्षक अभियंता एन.व्ही किरोलीकर, सुहास जाधव इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोत्रे, वनविभागाचे तसेच ऊर्जानिर्मितीचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलाचा परिसर हा दिवसेंदिवस कमी होत असून नागरिकांचा परिसर वाढत आहे, असे सांगून ऊर्जामंत्री डॉ.राऊत म्हणाले, याठिकाणी इंडस्ट्रीज सुद्धा आहे. त्यामुळे वाघांना या ठिकाणी प्रवेश करणे सोपे जाते. त्यामुळे वन्यप्राणी बफर क्षेत्र ओलांडून या परीसरात येऊ नये याची काळजी घ्यावी. उर्जानगर परिसरात वन्यप्राण्यांना अन्न, पाणी, लपण्याची जागा व त्याच्यांसाठी सुरक्षा दिसून येते, त्यामुळे वन्य प्राणी बफर क्षेत्र क्रॉस करून या परिसरात प्रवेश करतात. त्यामुळे वनविभागाने शक्य होत असल्यास वाघांना कॉलर आयडी लावावा. इतर राज्यातील तसेच बांधवगढ, रणथंबोर, पेंच या व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात काय उपाययोजना केल्या जातात याची माहिती वनविभागाने घ्यावी. उर्जानगर परिसरात गवत तसेच बाभूळ वनस्पतीचे झुडूप बरेच आहे, त्यामुळे वन्यप्राण्यांना त्याठिकाणी लपणे सोयीचे होते. त्यामुळे रिकाम्या जागेवर झुडपे वाढू देऊ नये. त्यावर उपाययोजना कराव्यात. ऊर्जानिर्मितीने वन्य प्राण्यांवर आळा घालण्यासाठी वनविभागावर अवलंबून न राहता वेगळा विभाग तयार करावा, त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी करावी.असे ते म्हणाले. सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती नेमण्यात यावी. दर 3 महीण्यांनी या समितीमार्फत आढावा घेण्यात येईल.

उर्जामंत्री डॉ. राऊत पुढे म्हणाले,जिल्ह्यातील वाघांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वनविभागाने या  वाघांना ट्रॅप करण्यासाठी कॅमेरे लावावेत. रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार करावी. वन्य प्राण्यांचे डॉक्टर नेमावेत. वन्य प्राण्यांवरील औषधी परिपूर्ण असावी. ऊर्जानगर प्लांट वसाहतीतील कचरा उचलण्याची पद्धती कशा प्रकारची आहे याची विचारणा केली. मांस हे वाघाचे महत्त्वाचे खाद्य असल्याने मांसाची वास गेल्यास तो त्याकडे वळतो. त्यामुळे मांसाची योग्यप्रकारे विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. मांस विक्रीची दुकाने परिसराच्या दूर असावी. त्याचे वेस्टेज योग्य ठिकाणी टाकले जातात का ते तपासून घ्यावे. इंडस्ट्रीज परिसरात सिक्युरिटी टावर उभारावेत, जेणेकरून वन्य प्राणी तसेच मानव यांच्या हालचालींवर देखरेख करता येणे शक्य होईल. ऊर्जानिर्मितीने कर्मचाऱ्यांना जाण्या-येण्यासाठी चारचाकी वाहनांची उपलब्धता करून द्यावी. वाहणे उपलब्ध नसल्यास त्याबाबतचा प्रस्ताव पाठवावा त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. असेही ते म्हणाले. वीज केंद्र परिसरात सुरक्षा भिंतींचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करून या भिंतीवर चांगल्या दर्जाचे काटेरी कुंपण घाला, वन विभागाने सुचविल्याप्रमाणे रस्त्यांचे बांधकाम आणि परिसर स्वछता हाती घ्या, अशी सूचना डॉ. राऊत यांनी केली.

यावेळी डॉ. राऊत यांनी इंडस्ट्रीज परिसरात किती ठिकाणी सेक्युरिटी टॉवर उभारण्यात आले आहे याची माहिती घेतली. तसेच ऊर्जानगर परिसरातील घटनास्थळाची पाहणी केली.

0000


No comments:

Post a Comment