Search This Blog

Tuesday, 8 February 2022

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश

 

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश

Ø अर्ज करण्याची अंतिम मुदत 8 मार्चपर्यंत

 चंद्रपूर, दि. 8 फेब्रुवारी : सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश देण्याकरीता शासनाची योजना आहे. या योजनेंतर्गत इयत्ता 1 ली व 2 रीचे वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. त्याकरिता अनुसूचित जमातीचे (आदिवासी) प्रवेशपात्र विद्यार्थ्यांकडून प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमुर यांचे कार्यालयाकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 8 फेब्रुवारीपासून प्रवेश अर्ज नि:शुल्क वितरीत करण्यात येणार असून संपूर्ण भरलेले अर्ज 8 मार्च 2022 पर्यंत स्विकारले जाणार आहे.

या आहेत प्रवेशाकरीता अटी व शर्ती :

विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. तसेच सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत सादर करावी. विद्यार्थ्याचे पालक दारिद्रय रेषेखालील असेल तर सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले बी.पी.एल प्रमाणपत्र जोडावे. विद्यार्थ्याच्या पालकाची  कुटूंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा 1 लक्ष इतकी असावी. शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या 18 सप्टेंबर 2020 च्या शासन निर्णयाप्रमाणे असावे. विद्यार्थ्यांचा जन्मतारखेचा दाखला जोडावा. तसेच सन 2021-22 चे बोनाफाईड सर्टिफिकेट सोबत जोडावे. अर्जासोबत विद्यार्थ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडावे. विद्यार्थ्यांचे पालक शासकीय, निमशासकीय नोकरदार नसावेत. तसे आढळल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईलखोटी माहिती सादर केल्यास विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्यात येईल.

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेशाबाबत संमतीपत्र जोडावे. विद्यार्थ्यांचे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो जोडावे. विद्यार्थ्यांचे पालक विधवा, घटस्फोटीत, निराधार, परित्यक्त्या असल्यास अर्जासोबत त्याबाबतचा पुरावा जोडावा.  निवड केलेल्या विद्यार्थ्यांला एकदा शाळा निश्चिती झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत पालकांच्या व पाल्यांच्या विनंतीनुसार शाळा बदलता येणार नाही. त्याबाबत पालकांचे हमीपत्र अर्जासोबत जोडण्यात यावे. अर्जासोबत वरील प्रवेशाबाबतचे दाखले जोडून दि.8 मार्च 2022 पर्यंत अर्ज सादर करावे, उशिरा प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.

प्रवेश अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमुर यांचे कार्यालयात नि:शुल्क उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूर यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी के.ई. बावनकर यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment