रब्बी हंगाम 2023-24 करीता प्रधानमंत्री पीक विमा योजना
सहभागी होण्याची अंतिम मुदत ज्वारीकरीता 30 नोव्हेंबर तर गहू व हरभरा पिकांकरीता 15 डिसेंबरपर्यंत
चंद्रपूर, दि.23 : विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणा-या नुकसानीपासून शेतक-यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या उद्देशाने राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. सदर योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतक-यांना ऐच्छिक आहे. रब्बी 2023 हंगामाअंतर्गत योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत ज्वारी (जि.) पिकाकरीता 30 नोव्हेंबर तर गहू (बा.) व हरभरा पिकाकरीता 15 डिसेंबर 2023 आहे.
अधिसूचित क्षेत्रात अधिसुचित पिके घेणारे (कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणा-या शेतक-यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. भाडेपट्टीने शेती करणा-या शेतक-यांना पीक विमा पोर्टल वर नोंदणीकृत भाडे करार अपलोड करणे आवश्यक आहे. सन 2023-24 पासून सर्वसमावेशक पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतक-यांना प्रती अर्ज केवळ 1 रुपया भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे. सर्व पिकांसाठी जोखीमस्तर 70 टक्के आहे.
कार्यान्वयीन यंत्रणा : चंद्रपूर जिल्ह्यात ही योजना ओरिएन्टल इन्शुरन्स कं. लि. या विमा कंपनीकडून राबविण्यात येणार आहे. सदर विमा कंपनीचा टो फ्री क्रमांक 1800118485 हा असून ई-मेल pmfby.१६०००० @orientalinsurance.co.in हा आहे.
असे व्हा सहभागी : बिगर कर्जदार शेतक-याने सातबारा चा उतारा, बँक पासबुक, आधारकार्ड, पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत विमा अर्ज देऊन, हप्ता भरून सहभाग घ्यावा. हप्ता भरलेली पोहोचपावती जपून ठेवावी. कॉमन सर्विस सेंटर (सी.एस.सी), आपले सरकार सेवा केंद्रच्या मदतीने विमा योजनेत सहभाग घेऊ शकता. त्यासाठी www.pmfby.gov.in या पोर्टलचे सहाय्य घेऊ शकता.
विमा संरक्षित रक्कम : रब्बी हंगाम 2023 करीता पीकनिहाय निश्चित करण्यात आलेली विमा संरक्षित रक्कम पुढीलप्रमाणे आहे. गहू (बा.) – 41000 हजार रुपये, ज्वारी (जि) – 30500 रुपये तर हरभरा – 39218 रुपये.
नुकसान भरपाई मिळण्यासाठी : नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे अकस्मात नुकसान झाल्यास तसेच काढणीपश्चात नुकसान झाल्यास घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसान या जोखीमेच्या बाबी अंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतक-यांनी सर्व्हें नंबर नुसार सर्वप्रथम केंद्र शासन पीक विमा योजना ॲप (क्रॉप इन्शुरन्स ॲप) चा वापर करावा. तसेच संबंधित विमा कंपनी, संबंधित बँक, कृषी / महसूल विभाग, किंवा टोल फ्री क्रमांकाद्वारे कळविण्यात यावे. नुकसान कळवितांना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्राचा तपशील कळविणे बंधनकारक असेल.
रब्बी हंगाम 2023-24 करीता एक रुपयात पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतक-यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
०००००००
No comments:
Post a Comment