बल्लारपूरमध्ये मैदानी खेळ व बॉक्सिंगसाठी व्हावी क्रीडा प्रबोधिनी
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची क्रीडा मंत्री यांना पत्राद्वारे मागणी
चंद्रपूर, दि. 24 : चंद्रपूर जिल्ह्यात खेळांसाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विविध स्पर्धांच्या आयोजनामुळे जिल्हा सातत्याने चर्चेत राहिला आहे. पुढील महिन्यात राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा देखील होणार आहे. अशात ऑलिम्पिकचे मिशन गाठायचे असेल तर चंद्रपूरचे क्रीडा क्षेत्र अधिक सक्षम करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने बल्लारपूर येथे मैदानी खेळ व बॉक्सिंगसाठी क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्यात यावी, अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांना पत्राद्वारे केली आहे.
क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून जिल्ह्यातील खेळाडूंना आणखी सोयीसुविधा उपलब्ध होऊ शकतात. यासंदर्भात जिल्ह्यातील क्रीडा संघटना, प्रशिक्षक, क्रीडा मार्गदर्शक आणि खेळाडूंनी चंद्रपूर येथे क्रीडा प्रबोधिनी स्थापन व्हावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे बल्लारपूर (जि. चंद्रपूर) क्रीडा संकूल येथे मैदानी व बॉक्सिंग खेळाची निवासी क्रीडा प्रबोधिनी सुरू करावी, असे श्री. मुनगंटीवार यांनी पत्रात म्हटले आहे. ‘चंद्रपूर आणि गडचिरोली हे नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल जिल्हे असून या जिल्ह्यातील खेळाडूंनी राज्य स्तरावरच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर आणि पुढे ऑलिम्पिकमध्येही भरारी घ्यावी, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. बल्लारपूर येथील तालुका क्रीडा संकुलात निवासी क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्याबाबचा प्रस्ताव चंद्रपूर जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आयुक्तांना सादर केला आहे. क्रीडा संकुलातील अद्यावत क्रीडा सुविधांचा विचार करता तसेच खेळाडूंची मागणी लक्षात घेता याठिकाणी मैदानी खेळ व बॉक्सिंग खेळासाठी क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्याबाबतच्या प्रस्तावास तात्काळ मान्यता द्यावी,’ अशी मागणी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
विसापूर (ता. बल्लारपूर) येथील तालुका क्रीडा संकूल हे राज्यातील सर्वोत्कृष्ट तालुका क्रीडा संकूल आहे. अलीकडेच याठिकाणी राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तर आता 27 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन देखील होणार आहे.
०००००००
No comments:
Post a Comment