मतदारांनी मतदार यादीत नाव समाविष्ट असल्याची खात्री करावी
Ø प्रारूप मतदार यादी प्रत्येक मतदान केंद्रावर प्रसिद्ध
Ø 9 डिसेंबरपर्यंत दावे व हरकती घेण्यास उपलब्ध
चंद्रपूर, दि. 22 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार दि. 21 जुलै 2023 ते 5 जानेवारी 2024 पर्यंत कार्यक्रमात नमूद असल्याप्रमाणे तसेच निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार दि.27 ऑक्टोबर 2023 रोजी प्रारूप मतदार यादी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय बीएलओमार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर मतदार यादी दि. 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2023 पर्यंत मतदारांना पाहण्यास, दावे व हरकती घेण्यास उपलब्ध आहे. तसेच अंतिम मतदार यादी दि. 5 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
मतदारांनी मतदार यादीचे अवलोकन करून मतदार यादीत नाव समाविष्ट असल्याची खात्री करून घ्यावी. यादीत नाव समाविष्ट नसल्यास शनिवार,दि. 25 नोव्हेंबर व रविवार, दि. 26 नोव्हेंबर 2023 या दिवशी 71-चंद्रपूर विधानसभामधील सर्व मतदार केंद्रावर विशेष मतदार नोंदणी शिबिर आयोजित करून नागरिकांकडून मतदार नोंदणी, मतदार यादीतील नोंदीच्या दुरुस्ती, वगळणीचे अर्ज प्राप्त करून घेण्याची कार्यवाही सुरू राहणार आहे. तरी, मतदारांनी मतदार यादीचे अवलोकन करून यादीत नाव समाविष्ट असल्याची खात्री करावी,असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मुरुगानंथम एम. यांनी केले आहे.
०००००
No comments:
Post a Comment