Search This Blog

Tuesday 7 November 2023

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा अभिलेखे तपासणीबाबत जिल्हास्तरीय विशेष कक्षाची स्थापना

 मराठा-कुणबी, कुणबी-मराठा अभिलेखे तपासणीबाबत जिल्हास्तरीय विशेष कक्षाची स्थापना

चंद्रपूर, दि. 7 : विदर्भातील मराठा समाजास मराठा – कुणबी, कुणबी – मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये अभिलेखे उपलब्ध करून घेऊन त्यांची छाननी करणे, कुणबी जातीच्या नोंदी असलेले अभिलेखे वेगळे करून त्याबाबतचा अहवाल सादर करणे, यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

        मराठा समाजास मराठा - कुणबी, कुणबी – मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक व अनिवार्य ब्रिटीश पुरावे, वंशवाळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, स्वातंत्रपूर्व झालेले करार, ब्रिटीश संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्ताऐवज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती पात्र व्यक्तिंना कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करण्यासाठी शासनाने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. 15 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या बैठकीमध्ये सर्व जिल्ह्यातील विविध प्रकारच्या अभिलेख्यांची तपासणी करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत.

            त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात यासंदर्भात विविध विभागांशी समन्वय साधणे, अभिलेखे उपलब्ध करून घेऊन त्याची छाननी करणे, कुणबी जातीच्या नोंदी असलेले अभिलेखे वेगळे करून त्याबाबत विहित नमुन्यातील अहवाल विभागीय आयुक्त, नागपूर व न्या. शिंदे समितीस कालमर्यादेत सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

            विशेष कक्षाची रचना : निवासी उपजिल्हाधिकारी सदर कक्षाचे अध्यक्ष असून सदस्यांमध्ये जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), पोलिस उपअधिक्षक (गृह), सहाय्यक जिल्हा निबंधक (नोंदणी व मुद्रांक), सर्व तालुक्यातील भुमी अभिलेख उपअधिक्षक, शिक्षणाधिकारी (प्राथ.), शिक्षणाधिकारी (माध्य.), राज्य अबकारी कर विभागाचे अधिक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त, जिल्हा प्रशासन अधिकारी (नगर परिषद प्रशासन), कारागृह उपअधिक्षक, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आणि जिल्हा वक्फ अधिकारी हे सदस्य आहेत.

००००००

No comments:

Post a Comment