जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी व्हा
Ø 25 नोव्हेंबर पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 19 : युवकांचा सर्वांगीन विकास करणे, संस्कृती व परंपरांचे जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे, यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. राज्यात सन 2023-24 या वर्षातील युवा महोत्सवाचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय तसेच कृषी आयुक्तालय, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात येणार आहे.
चंद्रपूर येथे होणाऱ्या जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, महिला मंडळ यांनी आपल्या अधिनस्त युवक-युवतींना युवा महोत्सवामध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी होण्याकरीता 25 नोव्हेंबर 2023 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे प्रवेश निश्चित करण्याकरिता सुचित करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.
युवा महोत्सवामध्ये (1) सांस्कृतीक, समुह लोकनृत्य, वैयक्तिक सोलो लोकनृत्य, लोकगीत, वैयक्तिक सोलो लोकगीत, (2) कौशल्य विकास, कथा लेखन, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, इंग्रजी व हिंदी फोटोग्राफी, (3) संकल्पना आधारीत स्पर्धा, तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर, सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान, (4) युवा कृती, हस्तकला, वस्त्रोद्योग, ॲग्रो प्रोडक्ट या स्पर्धात्मक बाबींचे आयोजन करण्यात येणार आहे.
युवा महोत्सवासाठी आवश्यक पात्रता : जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील कृषी महाविद्यालये, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, महिला मंडळ, युवा मंडळे तसेच 15 ते 29 वयोगटातील युवांना सदर महोत्सवामध्ये सहभाग घेता येईल. सदर युवक युवती महाराष्ट्राचा रहिवासी असावा. स्पर्धकांनी नाव, पत्ता, जन्म दिनांक, संपर्क क्रमांक, ई-मेल आयडी व वयाबाबतचा सबळ पुरावा सुध्दा सादर करणे आवश्यक आहे. सहभागी युवक, युवतींना सहभाग व प्राविण्य प्रमाणपत्र वितरीत करण्यात येईल. तसेच युवा महोत्सवातील प्राविण्यधारकांसाठी रोख पारितोषिक देण्यात येणार आहेत.
००००००
No comments:
Post a Comment