ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून पंचमुखी हनुमान मंदिराचा होणार कायापालट
विशेष बाब म्हणून 1 कोटी 50 लक्ष रुपये मंजूर
चंद्रपूर, दि. 25 : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नामुळे पांढरकवडा (ता. चंद्रपूर) येथील श्री. पंचमुखी हनुमान मंदिराचा कायापालट होणार आहे. विशेष बाब म्हणून राज्य शासनाने या मंदिराच्या विकासासाठी 1 कोटी 50 लक्ष रुपये मंजूर केले आहे.
पांढरकवडा (ता. चंद्रपूर) येथील श्री. पंचमुखी हनुमान मंदीर हे ‘क’ वर्ग दर्जाचे तीर्थक्षेत्र असून या तीर्थक्षेत्राच्या मुलभूत सोयी-सुविधांसाठी 1 कोटी 50 लक्ष रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाकडे सादर केला. मात्र जिल्हास्तरावरील ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्रांच्या विकास कामासाठी 30 लक्ष रुपयांपर्यंत अर्थसंकल्पीय तरतुद करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना होते. या मर्यादेत आता वाढ करण्यात आली असून सदर निधीची मर्यादा 60 लक्ष रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. मात्र केवळ 60 लक्ष रुपयांत पांढरकवडा येथील पंचमुखी हनुमान मंदिराचा विकास होऊ शकत नाही, त्यासाठी आणखी निधी आवश्यक आहे, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत वारंवार पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले असून विशेष बाब म्हणून पंचमुखी हनुमान मंदिराच्या विकास कामांसाठी शासनाने 1 कोटी 50 लक्ष रुपये मंजूर केले आहेत.
वाढीव मंजूर निधीतून मंदिराचे विकास काम होणार असल्यामुळे याबाबत भाविकांनी ना.सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.
00000000
No comments:
Post a Comment