कुणबी नोंदी सादर करण्यासाठी जिल्हानिहाय समन्वय अधिकारी व विशेष कक्षाची स्थापना
कुणबी नोंदीचे अभिलेख सादर करा- विभागीय आयुक्त
नागपूर,दि.3 : कुणबी नोंदीचे अभिलेख सादर करण्यासाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज विभागीय समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. तसेच जिल्हानिहाय समन्वय अधिकारी व विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. मराठा समाजातील ज्या व्यक्तींकडे कुणबी नोंदीचे अभिलेख अथवा पुरावे असतील त्यांनी संबंधित जिल्हा समन्वय अधिकारी यांचेकडे ते सादर करण्याचे आवाहन, विभागीय आयुक्त यांनी केले आहे.
मराठा समाजातील व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात कार्यपद्धती विहीत करण्यासाठी मा.न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मराठा समाजातील व्यक्तींकडे असलेल्या कुणबी नोंदीचे अभिलेख जमा करण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दृकश्राव्य माध्यमाद्वारे सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेवून निर्देश दिले. त्यानुसार नागपूर विभागासाठी विभागीय समन्वय अधिकारी म्हणून उपायुक्त (सामान्य) प्रदीप कुलकर्णी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
जिल्हा समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूकही करण्यात आली आहे. यानुसार नागपूर जिल्ह्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, भंडारा जिल्ह्यासाठी भूसंपादन अधिकारी आकाश अवतारे, चंद्रपूर जिल्ह्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, गोंदिया जिल्ह्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील, गडचिरोली जिल्ह्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सूर्यवंशी आणि वर्धा जिल्ह्यासाठी जिल्हा पुनर्वसन अधिकारी अंजली मरोड यांची जिल्हा समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
जिल्हानिहाय विशेष कक्षांची स्थापनाही करण्यात आली आहे. ज्या मराठा व्यक्तींकडे कुणबी नोंदी असतील त्यांनी संबंधित जिल्हा समन्वय अधिकारी किंवा विशेष कक्षाकडे कार्यालयीन वेळेत असे अभिलेख सादर करावे, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले आहे.
0000000
No comments:
Post a Comment