Search This Blog

Monday 15 July 2024

चंद्रपूर हा उद्योगांसाठी आदर्श जिल्हा – जिल्हाधिकारी विनय गौडा




 

चंद्रपूर हा उद्योगांसाठी आदर्श जिल्हा – जिल्हाधिकारी विनय गौडा

Ø ‘इग्नाईट महाराष्ट्र – 2024’ कार्यशाळेचे उद्घाटन

चंद्रपूरदि. 15 : चंद्रपूर जिल्ह्यात औष्णिक विद्युत प्रकल्प, सिमेंट कंपन्या, लोहखनीज प्रकल्प, लाईमस्टोनवर आधारीत उद्योग कार्यरत आहे. एवढेच नव्हे तर वनउपजांवर आधारीत उद्योगांनाही जिल्ह्यात अतिशय चांगली संधी असल्यामुळे चंद्रपूर हा उद्योगांसाठी आदर्श जिल्हा आहे, असे विचार जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी व्यक्त केले.

नियोजन भवन येथे जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित ‘इग्नाईट महाराष्ट्र – 2024’ या एकदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर उद्योग विभागाचे सहसंचालक गजेंद्र भारती, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ऋतुराज सुर्या, बांबू संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे संचालक अशोक खडसे, विकास आयुक्त (उद्योग) दिपेंद्रसिंह कुशवाह, सहसंचालक स्नेहल ढोक, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या उपमहाव्यवस्थापक उमा अय्यर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राजू नंदनवार आदी उपस्थित होते.

 नवउद्योजकांना संधी, शासनाचे धोरण, उद्योगासाठी लागणा-या सेवा, उत्पादन, मार्केटिंग, आर्थिक व इतर अनुषंगीक बाबींची माहिती होण्यासाठी ‘इग्नाईट महाराष्ट्र – 2024’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास 2 हजार मेगावॅटचा औष्णिक विद्युत प्रकल्प, चार ते पाच नामांकित सिमेंट कंपन्या तसेच लोहखनीज प्रकल्प कार्यरत आहेत. उद्योगांसाठी अतिशय चांगले स्त्रोत येथे उपलब्ध असल्यामुळे लोहखनीज आणि स्टील उद्योगांना एक चांगली संधी आहे. एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील 42 टक्के भुभाग जंगलव्याप्त असून जगप्रसिध्द ताडोबा – अंधारी व्याघ्र संरक्षण प्रकल्प जिल्ह्यात आहेत. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय चांगली संधी असून जंगलावर आधारीत उद्योग, जिल्ह्यासाठी एक मोठी उपलब्धी होऊ शकते. त्यातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

पुढे जिल्हाधिकारी म्हणाले, केवळ मोठे उद्योगच नाही तर कौशल्य विकासाचे एखादे प्रशिक्षण घेऊन छोटे-मोठे दुकान किंवा छोटा उद्योग सुरू केला तरी त्यातून रोजगाराची निर्मिती होऊ शकते. फेब्रुवारी महिन्यात चंद्रपूरमध्ये ‘ॲडव्हाँटेज चंद्रपूर’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. यात जिल्ह्यासाठी 76 हजार कोटींचे गुंतवणूक करार झाले. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. ‘इग्नाईट महाराष्ट्र – 2024’ मध्ये आज येथे उद्योग क्षेत्रातील नामवंत उद्योजक उपस्थित आहेत, या सर्वांच्या अनुभवाचा लाभ नवउद्योजकांनी तसेच इतरांनीसुध्दा घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.

प्रास्ताविकात उद्योग विभागाचे सहसंचालक गजेंद्र भारती म्हणाले, ‘इग्नाईट महाराष्ट्र’ उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. केवळ मुंबई, पुणे, नागपूर या मोठ्या शहरातच नव्हे तर छोट्या जिल्ह्यातसुध्दा उद्योगांना चालना देण्यासाठी असे उपक्रम व्हावे, या उद्देशाने ‘इग्नाईट महाराष्ट्र’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्यानेच उद्योगांची उभारणी शक्य आहे. त्यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले जातात. शासनाने हे एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले.

आयटीआयच्या विद्यार्थ्यांना ॲप्रेंटीशीप पत्राचे वाटप : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उद्योगात रोजगारासाठी ॲप्रेंटीशीप पत्राचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यात जगदिश लसंते, श्रध्दा कुमरे, सौरभ आवळे, वैभव घोडमारे, ऋतीक शेंडे, सुषमा कासवटकर, विष्णु पदमाईकर, रिया पिपरीकर, मंथन दारुनकर, टेकचंद बोम्मई, धनश्री मेश्राम, मोहित निकुरे, सुरज झोडे, पियुष श्रीवस्कर, सुगत खोब्रागडे आदींचा समावेश होता. यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूरचे प्राचार्य राजरत्न वानखेडे तसेच सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार प्रणाली दहाटे उपस्थित होत्या.

०००००

No comments:

Post a Comment