Search This Blog

Thursday, 22 October 2026

सेवा संकल्प अभियानांतर्गत 35 बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया


 सेवा संकल्प अभियानांतर्गत 35 बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया

Ø राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा स्तुत्य उपक्रम

चंद्रपूर, दि. 22 : जन्मजात व्यंग, विविध आजार आणि शारीरिक दोषांमुळे अडचणींचा सामना करणाऱ्या बालकांना निरोगी जीवनाची संधी मिळावी, यासाठी आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आलेल्या सेवा संकल्प अभियानात एकूण 35 बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या उपक्रमामुळे गरजू बालकांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत झाली असून त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत अंगणवाडीतील 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालके तसेच शासकीय व निमशासकीय शाळांमधील 6 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते. या तपासणीदरम्यान जन्मजात व्यंग, जीवनसत्त्वांची कमतरता, बालवयातील विविध आजार तसेच विकासात्मक विलंब व अपंगत्व आढळणाऱ्या बालकांना पुढील तपासणी, उपचार आणि आवश्यक शस्त्रक्रियांसाठी संदर्भित केले जाते. सेवा संकल्प अभियानांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात हृदयरोग निदान शिबिर, क्लेफ्ट लिप व पॅलेट (फाटलेले ओठ व टाळू) शिबिर, टंग टाय (जिभेखालील पडदा लहान असणे) शिबिर तसेच इतर आजारांवरील उपचार व शस्त्रक्रियांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आले.

विविध शस्त्रक्रियांद्वारे बालकांना दिलासा : अभियानाच्या कालावधीत 9 बालकांवर हृदयशस्त्रक्रिया, 9 बालकांवर क्लेफ्ट लिप व पॅलेट शस्त्रक्रिया, 5 जणांवर फायमोसिस शस्त्रक्रिया, 3 जणांवर हायपोस्पेडियास शस्त्रक्रिया, 2 बालके- टंग टाय शस्त्रक्रिया, 1 बालक-कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया, 6 बालकांवर इतर आजारांवरील शस्त्रक्रिया अशा प्रकारे विविध आजारांनी ग्रस्त एकूण 35 बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

पात्र बालकांना उपचार मिळवून देण्यासाठी आरोग्य विभागाचे प्रयत्न : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश बालकांमधील आजारांचे वेळेत निदान करून त्यांना आवश्यक उपचार उपलब्ध करून देणे हा आहे. कोणतेही पात्र बालक आर्थिक अडचणींमुळे किंवा योग्य माहितीअभावी उपचारांपासून वंचित राहू नये, यासाठी आरोग्य विभागामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. आवश्यकतेनुसार बालकांना उच्चस्तरीय तपासणी व उपचारांसाठी संदर्भित करून त्यांच्या उपचारांचा पाठपुरावा करण्यात येतो.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत उपलब्ध असलेल्या आरोग्य तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया सेवांचा लाभ पात्र बालकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment