Search This Blog

Tuesday 3 November 2020

कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचे योग्य व्यवस्थापन करावे: कृषी विभागाचे आवाहन

 

कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचे योग्य व्यवस्थापन करावे: कृषी विभागाचे आवाहन

चंद्रपूर दि. 3 नोव्हेंबर : नोव्हेंबर महिण्यातील वातावरण गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी अत्यंत पोषक आहे, त्यामुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्यपरिस्थितीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या एक ते दोन वेचण्या झालेल्या आहे. काही ठिकाणी कापसाच्या झाडाला 10 ते 15 बोंड्या तर कुठे 50 ते 60 बोंड्या आहेत. ज्या ठिकाणी कापसाला कमी बोंडे असून बोंड पक्व होण्याच्या अवस्थेत आहेत, अशा ठिकाणी मिळणारे उत्पन्न लक्षात घेवून फवारणीचा निर्णय घ्यावा. पण ज्या ठिकाणी बोंडाची संख्या जास्त आहे, बोंडे हिरवी आहे, अशा ठिकाणी खालील उपाय योजना कराव्यात.

प्रत्येक आठवड्याला एकरी शेतीचे प्रतिनिधीत्व करतील अशी 20 झाडे निवडून त्या प्रत्येक झाडावरील मध्यम पक्व झालेले बाहेरून किडके नसलेले एक बोंड असे 20 बोंडे तोडावे. ते भुईमुंगाच्या शेंगाप्रमाणे दगडाने टिचवून त्यामधील किडकी बोंडे व बोंड अळयांची संख्या मोजून दोन किडक बोंड किंवा दोन पांढूरक्या रंगाच्या लहान अळया आढळल्यास आर्थिक नुकसान पातळी (5 ते 10 टक्के) समजून पुढे सांगितल्याप्रमाणे रासायनिक किटकनाशकांची फवारणी करावी.

जेथे प्रादुर्भाव 5 ते 10 टक्के दरम्यान आहे. अशा ठिकाणी सायपरमेथ्रीन 10 टक्के इसी 8 मिली किंवा सायपरमेथ्रीन 25 इसी 3.5 मिली किंवा इंडोक्साकार्ब 15.8 टक्के इसी 10 मिली किंवा डेल्टामेथ्रीन 2.8 टक्के 12 मिली प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी.

जेथे प्रादुर्भाव 10 टक्केच्या वर आहे अशा ठिकाणी आवश्यकतेनुसार प्रादुर्भाव पुढे वाढू नये म्हणून कोणत्याही एका मिश्र किटकनाशकाची प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ट्रायझोफॉस 35 टक्के + डेल्टामेथ्रीन 1 टक्के 17 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 50 + सायपरमेथ्रीन 5 टक्के 20 मिली किंवा इंडोक्झाकार्ब 14.5 टक्के + अॅसीटामाप्रिड 7.7 टक्के 10 मिली. किंवा सायपरमेथ्रीन 10 टक्के + इंडोक्झाकार्ब 10 टक्के डब्लु.डब्लु.एस.सी. 12 मि.ली. आवश्यकता भासल्यास 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी.

सद्यपरिस्थितीत बहुतांश ठिकाणी कपाशीचे पिक 4 ते 5 फुट उंचीचे असून त्याच्या फांद्या हि दाटलेल्या आहेत अशा परिस्थितीत किटकनाशकांची फवारणी करतांना विषबाधा होवू शकते म्हणून कपाशीवर फवारणी करतांना कटाक्षाने फवारणी किटचा वापर करूनच फवारणी करावी. तसेच फवारणी करतांना सकाळी व वा-याच्या दिशेने फवारणी करावी.

 सर्वेक्षण करतांना बोंडामध्ये गडद गुलाबी रंगाची तीसऱ्या ते चौथ्या अवस्थेतील अळी दिसून आल्यास ही अळी 3 ते 4 दिवसात कोष अवस्थेत जावून पुढील 10 ते 15 दिवसांनी कोषातील पतंग निघून अंडी टाकण्यास सुरूवात करू शकतात व गुलाबी बोंडअळीच्या दुस-या पीढीच्या प्रादूर्भास सुरूवात होवू शकतो अशा ठिकाणी  किटकनाशकाची फवारणी करून पतंगाच्या व्यवस्थापनासाठी फेरोमन सापळयांचा वापर करावा. यासाठी एकरी 2 किंवा हेक्टरी 5 फेरोमन सापळे लावावे.अशाप्रकारे गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करण्यात यावे. शेतकऱ्यांना काही अडचणी येत असल्यास तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क करावाअसे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

00000

No comments:

Post a Comment