Search This Blog

Tuesday 24 November 2020

दत्तक सप्ताहाच्या अनुषंगाने आरोग्य शिबिर व जनजागृती मोहीम

 दत्तक सप्ताहाच्या अनुषंगाने आरोग्य शिबिर व जनजागृती मोहीम

जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत दत्तक प्रक्रियेबाबत जनजागृती

चंद्रपूर दि.24 नोव्हेंबर:  जिल्हा बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या मार्गदर्शनात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, चंद्रपूर द्वारा जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चंद्रपूर मार्फत दि. 14 नोव्हेंबर 2020 ते 21 नोव्हेंबर 2020 या कालावधीत जागतिक बालदिनाचे औचित्य साधत किलबिल प्राथमिक बालगृह व दत्तक संस्था, चंद्रपूरच्या प्रांगणात दि. 20 नोव्हेंबर 2020 रोजी आरोग्य शिबिर व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास  जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे,  जिल्हा पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख, महिला व बालविकास अधिकारी रमेश टेटे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा अॅड. वर्षा जामदार व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, संरक्षण अधिकारी राजेश भिवदरे, प्रीती उंदिरवाडे, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा मडावी, क्षेत्र कार्यकर्त्या हर्षा वऱ्हाटे, तेजस्विनी सातपुते, चाईल्ड लाईन संचालक नंदा अल्लुरवार, तसेच किलबिल दत्तक संस्थेचे सामाजिक कार्यकर्ता हेमंत कोठारे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 चे कलम 80 नुसार, अनाथ, परित्याग व सापडलेल्या बालकांचे दत्तक बाल न्याय अधिनियम 2015 व सिएआरए नियमावलीच्या प्रक्रिया पालन न करता बालकांना परस्पर देणे व घेणे कायद्यान्वये गुन्हा आहे. सदर गुन्ह्यांमध्ये तीन वर्षाची शिक्षा असून एक लाख रुपये दंडाची कारवाईसुद्धा होऊ शकते.

 

अधिष्ठाता डॉ.अरुण हुमणे यांनी बालकांची काळजी व संरक्षण, बालकांचे आरोग्य व आहार आणि लसीकरण याद्वारे बालकांचा सर्वांगीण विकास कसा करता येईल यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच दत्तक संस्थेतील बालकांच्या आरोग्याच्या संदर्भात आरोग्यविषयक सुविधा, तसेच योग्य ती मदत पुरविण्यात येईल असे स्पष्ट केले. तर पोलीस विभागाकडून बालकांच्या शोषनासंदर्भात असलेल्या अडचणी व प्रकरणे सोडविण्यास पोलीस विभाग 24 तास तत्पर राहील असे प्रतिपादन पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख यांनी केले.

यावेळी बालकल्याण समिती चंद्रपूरच्या अध्यक्षा अॅड. वर्षा जामदार तसेच महिला व बाल विकास अधिकारी रमेश टेटे यांनी बालकांच्या दत्तक प्रक्रियेबाबत तर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी साखरकर यांनी बालकांचे हक्क याबाबत मार्गदर्शन केले.

याप्रसंगी बालकांच्या दत्तक प्रक्रियेबाबत जनजागृतीपर माहिती फलके, पत्रकांचे प्रकाशन करण्यात आले.  कार्यक्रमाचे संचालन प्रिया पिंपळशेंडे तर आभार श्री. मोरे यांनी व्यक्त केले.

000000

No comments:

Post a Comment