Search This Blog

Thursday 26 November 2020

नागरिकांनी कुष्ठरोग तपासणी अभियानास सहकार्य करावे



नागरिकांनी कुष्ठरोग तपासणी अभियानास सहकार्य करावे

- जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

Ø  21 लाखावर नागरिकांची होणार तपासणी

Ø  1487  वैद्यकीय टिम कार्यरत

Ø  दि. 1 ते 16 डिसेंबर कालावधीत घरोघरी तपासणी करणार

चंद्रपूर, दि. 26 नोव्हेंबर :-  राष्ट्रिय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत दिनांक 1 डिसेंबर ते 16 डिसेंबर 2020 या कालावधीत आरोग्य विभागाचे कर्मचारी  घरोघरी जाऊन नागरिकांची कुष्ठरोग व क्षयरोग तपासणी करणार आहेत.  रोगाचे निदान झाल्यास रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामिण रुग्णालय येथे मोफत औषधोपचार मिळणार आहे तरी नागरिकांनी या कुष्ठरोग व क्षयरोग तपासणी अभियानास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

राष्ट्रिय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत आज दिनांक २६.११.२०२० रोजी मा.जिल्हाअधिकारी , यांच्या अध्यक्षतेखाली विसकलमी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कार्डिले, पोलीस उपअधिक्षक शेखर देशमुख, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, डॉ. सुधीर मेश्राम, डॉ. प्रतिक बोरकर, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. संदिप गेडाम, डॉ. प्रकाश साठे, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ . ए.एस.खंडारे, डॉ.हेमचंद कन्नाके, श्रीनीवास मूळावार, भास्कर सोनारकर व आरोग्य विभागाचे ईतर अधिकारी उपस्थित होते.

 सदर मोहिमेचा उद्देश समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधुन त्यांना बहुविध औषधोपचाराखाली आणणे,  नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधुन बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडित करुन होणारा प्रसार कमी करणे,  समाजात कुष्ठरोगा विषयी जनजागृती करणे असा आहे. तसेच  सदर मोहिमेत क्षयरोगाच्या निदाना अभावी अद्यापही वंचित असणाऱ्या क्षयरुग्णाचा शोध घेऊन त्यांना क्षयरोग औषधोपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 जिल्हयामध्ये सन २०२०-२१ या वर्षात दिनांक ०१/१२/२०२० ते १६/१२/२०२० या कालावधीत जिल्हयातील ग्रामिण व शहरी भागामध्ये आशा स्वयंसेवीका , पुरुष स्वयंसेवक व आरोग्य कर्मचारी यांचे मार्फत सर्व कुटूंबातील प्रत्येक व्यक्तिींची कुष्ठरोग व क्षयरोगाची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे . तद्नंतर संशयीत कुष्ठरुग्णांची व क्षयरुग्णांची तपासणी करून निदान प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी यांचे मार्फत करण्यात  येणार आहे. जिल्हयात सदर मोहिमे करीता शहरी व ग्रामिण भागातील एकुण 21 लाख 13 हजार 276 लोकसंख्येकरिता एकुण 1487  टिम कार्यरत राहणार असल्याची माहिती सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. संदिप गेडाम यांनी यावेळी दिली.

जिल्हाधिकारी यांनी यावेळी जिल्हा अवयवदान समन्वय समिती, लसीकरण मोहिम, बोगस डॉक्टर शोध मोहिम या समित्यांचा देखील आढावा घेतला.

0000

No comments:

Post a Comment