Search This Blog

Saturday, 22 July 2023

आपत्ती व्यवस्थापनाचा सूक्ष्म आराखडा तयार करा - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

      






       आपत्ती व्यवस्थापनाचा सूक्ष्म आराखडा तयार करा - पालकमंत्री सुधीर                                        मुनगंटीवार

 

Ø घरांचे व शेतीच्या पिकांचे नुकसानाचे पंचनामे करून भरपाई देण्याची कार्यवाही करा

Ø संपर्क तुटण्याची शक्यता असलेल्या गावांची यादी अद्ययावत करा,यंत्रणेने समन्वयातून आरोग्य शिबिरे व औषध साठा उपलब्ध ठेवावा

Ø आढावा बैठकीत नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे दिले निर्देश

 

चंद्रपूर, दि. २२ : अतिवृष्टीमुळे शहरातील वस्त्यांमध्ये तसेच नदीच्या काठावरील गावांमध्ये पाणी शिरते. यामध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. याशिवाय जीवितहानी होऊन सार्वजनिक मालमत्तांचेही मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. अशावेळी परिस्थिती आटोक्यात ठेवण्यासाठी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा सूक्ष्म आराखडा तयार करा, असे निर्देश चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज (शनिवार) दिले.

 

चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी नियोजन भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी ना. मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महानगरचे अध्यक्ष राहुल पावडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे,मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, सहायक जिल्हाधिकारी मुरुगानंथम, मनपा आयुक्त विपीन पालिवाल, ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, वनविभागाचे कुशाग्र पाठक, महानगर महिला मोर्चा अध्यक्ष अंजली घोटेकर आदींची उपस्थिती होती.

 

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापनाचा गेल्या दहा वर्षांचा आढावा घेतला. नैसर्गिक संकट आल्यास आपत्ती व्यवस्थापनाचे पुरेसे साहित्य उपलब्ध आहे की नाही, याची माहिती त्यांनी घेतली. शोध व बचाव कार्यासाठी असलेल्या तिनशे आपदा मित्रांना योग्य प्रशिक्षण देण्यात यावे. त्यासोबतच मच्छीमार संघटना, सर्पमित्र, ट्रॅकींग करणाऱ्यांनाही या बचाव कार्यात समाविष्ट करून घेण्याची सूचना त्यांनी केली.  पोलीस विभागाने ५० पोलिसांना आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रशिक्षण देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

 

नद्यांना येणारे पूर, बाधित होणाऱ्या ८६ गावांची संरक्षण भिंत तसेच डब्ल्यूसीएलमुळे येणारे पाणी याचीही सविस्तर माहिती घ्यावी. पूर परिस्थिती असो वा नसो जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट असल्यास पूरप्रवण गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याबाबतचे नियोजन करावे. जिल्हा परिषद व मनपाच्या शाळांची कामे गुणवत्तापूर्ण असावीत. पूरग्रस्तांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा पूरवाव्या. विशेषतः आरओसह पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, सोलर विजेची व्यवस्था यावर लक्ष केंद्रीत करावे, अशा सूचना ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या.

 

अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाल्याने शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागेल. अशा शेतीच्या नुकसानाचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही तातडीने करावी. घरात पाणी शिरून पडझड झालेली असल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत पोचती करावी, असेही ना. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

 

कुडाची व मातीची घरे पाणी ओसरल्यानंतर पडतात. अशा घरांचा पंचनाम्यात समावेश करून आर्थिक मदत द्यावी. या कामांमध्ये अधिकाऱ्यांनी कामचुकारपणा न करता मानवतेच्या दृष्टीने निःस्वार्थ भावनेने नागरिकांना मदत करावी, याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. पालकमंत्री ना. श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, ‘आरोग्य यंत्रणेने एकमेकांशी समन्वय ठेवून वैद्यकीय मदतीचे नियोजन करावे आणि जिल्हा तसेच तालुकास्तरावर आरोग्य तपासणी शिबिरे राबवावीत. त्यासाठी पुरेसा औषधसाठा तयार ठेवावा.

 

            प्रत्येक गावात औषध फवारणी करावी. उपलब्ध फॉगिंग मशीन सुरू आहेत की नाही, याची माहिती घ्यावी. उपलब्ध ॲम्बुलन्स, त्यावरील वाहन चालक, दुरुस्त व नादुरुस्त ॲम्बुलन्सची संख्या, तसेच निर्लेखित ॲम्बुलन्सची यादी अद्यावत करावी. पूरग्रस्त गावात शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तसेच ज्या गावांमध्ये अशुद्ध पाणीपुरवठा आहे त्या गावांमध्ये आरओ मशीन लावण्याची कार्यवाही करावी. पिडीतांना जलदगतीने आर्थिक मदत करावी.’ तहसीलदारांनी कुटुंबाची माहिती घेऊन निराधार योजना, वृद्धांना श्रावणबाळ योजना, बस पास, आदी योजनांचा लाभ मिळवून द्यावा. तसेच आर्थिक मदत देताना इतरही योजनांची माहिती द्यावी, अशा सूचना ना. मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिल्या. यावेळी काही गावातील नागरिकांनी व माजी नगरसेवकांनी आपले प्रश्न पालकमंत्री श्री.सुधीर मुनगंटीवार यांच्या समोर मांडत पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानाची माहिती दिली.

 

नियंत्रण कक्ष चोवीस तास

 

नियंत्रण कक्ष २४ तास सुरू ठेवावे आणि संपर्कासाठी टोल-फ्री क्रमांक कार्यान्वित करावा. मनपाने सर्व ठिकाणांची नालेसफाई करावी. इरई  व झरपट नदीचे खोलीकरण करण्याकडे लक्ष द्यावे. इरई व झरपट नदी तसेच रामाळा तलावाच्या खोलीकरणासंदर्भातला आराखडा वैज्ञानिकदृष्ट्या तयार करण्याचे आदेशही ना. मुनगंटीवार यांनी दिले.

 

मृतांच्या वारसांना अर्थसहाय्य

 

बल्लारपूर, तहसील कार्यालयातील तालुका व्यवस्थापन नियंत्रण कक्षात कर्तव्य बजावत असताना बंडू नारायण येडमे मृत्युमुखी पडले. ते बल्लारपूर येथील वाहतुक व विपणन विभागात वनमजूर म्हणून कार्यरत होते. स्व. बंडू येडमे यांच्या वारसांना पालकमंत्री ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते ४ लक्ष रुपयांचा धनादेश देण्यात आला.

 

00000

No comments:

Post a Comment