Search This Blog

Friday, 7 July 2023

मतदारांनो! मतदान कार्ड अपडेट करण्यासाठी आता ‘ऑनलाईन’ सुविधा

 

मतदारांनो! मतदान कार्ड अपडेट करण्यासाठी आता ‘ऑनलाईन’ सुविधा  

Ø मतदार याद्या अद्यावत करण्याबाबत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

चंद्रपूरदि. 7 : प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी मतदाराला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर झाला आहे. याशिवाय मतदारांसाठी नाव नोंदणी, नाव वगळणे, तपशिलातील दुरुस्त्या या सुविधा आता https://voters.eci.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात 70 – राजुरा, 71 – चंद्रपूर,     72 – बल्लारपूर, 73 – ब्रम्हपूरी, 74 – चिमूर व 75 – वरोरा हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.

पुनरिक्षण पूर्व उपक्रम : मतदार यादी संदर्भातील सर्व कायदे आणि मार्गदर्शक सुचना तसेच नवीनतम आयटी अप्लीकेशन आणि प्रणालीबाबत मतदार नोंदणी अधिकारी / सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी / मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांना प्रशिक्षण 1 जुन ते 20 जुलै 2023 या कालावधीत देण्यात येत आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे घरोघरी भेट देऊन पडताळणी 21 जुलै ते 21 ऑगस्ट 2023 या कालावधीत करण्यात येईल.

मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण, मतदार यादी / मतदार ओळखपत्रातील त्रृटी दूर करणे, आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादी सुधारणा करणे तसेच अस्पष्ट / अंधुक छायाचित्र बदलून त्याऐवजी योग्य दर्जाची छायाचित्र प्राप्त करणे, विभाग / भाग यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करून मतदान केंद्रांच्या सीमांचे पुनर्रचना तयार करणे व मतदान केंद्राच्या यादीस मान्यता घेणे, तुलनात्मक फरक शोधून फरक दूर करण्यासाठी कालबध्द योजना आखणे आणि कंट्रोल टेबल अद्ययावत करणे यासाठी 22 ऑगस्ट ते 29 सप्टेंबर 2023 हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. याशिवाय नमुना 1 ते 8 तयार करणे व 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत पुरवणी व एकत्रित प्रारुप यादी तयार करणे हे 30 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर 2023 या कालावधीत होईल.

पुनरिक्षण उपक्रम : एकत्रित प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 17 ऑक्टोबर 2023 आहे. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी 17 ऑक्टो. ते 30 नोव्हें 2023, दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी (म.रा.) यांनी निश्चित केलेले दोन शनिवार व रविवारी विशेष मोहीम राबविण्यात येईल. दावे हरकती निकालात काढण्याची तारीख 26 डिसेंबर 2023 पर्यंत आहे. अंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी मागणे तसेच डाटाबेस तयार करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई 1 जानेवारी 2024 पर्यंत करण्यात येईल. अंतिम मतदार यादीची प्रसिध्दी 5 जानेवारी 2024 रोजी होईल.

वरील कार्यक्रमानुसार 17 ऑक्टोबर 2023 रोजी संबंधित मतदान केंद्रावर छायाचित्र मतदार याद्या प्रारुपरित्या प्रसिध्द करण्यात येणार आहे. ज्या पात्र व्यक्तिंना 1 जानेवारी 2024 रोजी किंवा त्यापुर्वी 18 वर्षे पूर्ण झालेली आहेत परंतु मतदार यादीत ज्यांचे नाव नाहीत, अशा पात्र मतदारांनी आपले नाव मतदार यादीत येण्यासाठी नजीकच्या मतदान केंद्रावर किंवा संबंधित तहसील कार्यालयात, मतदान केंद्रावर नेमणूक करण्यात आलेल्या पदनिर्देशित अधिका-यांकडून नमुना – 6 विनामुल्य प्राप्त करून घ्यावा. तसेच मतदारांनी छायाचित्र मतदार यादी अद्यावत होण्याच्या दृष्टीने नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांना आवश्यक सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment