Search This Blog

Friday, 14 July 2023

जिल्हाधिकाऱ्यांकडून कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कार्यालय व परिसराची पाहणी

 

जिल्हाधिकाऱ्यांकडून कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कार्यालय व परिसराची पाहणी

चंद्रपूर, दि. 14: प्रकल्प संचालक, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कार्यालयास तसेच कृषी चिकित्सालय, फळरोपवाटिका आणि मृदसर्वेक्षण मृद चाचणी प्रयोगशाळेस जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी भेट देऊन कार्यालय परिसर व कार्यपद्धतीची पाहणी केली.

प्रकल्प संचालक (आत्मा) प्रिती हिरुळकर यांनी आत्मा यंत्रणेची रचना, कार्यपद्धती तसेच आत्मा व स्मार्ट प्रकल्पांतर्गत विविध योजनांच्या कामांची माहिती दिली. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, उपविभागीय कृषी अधिकारी एन. एन. घोडमारे, पुरवठा व मुल्य साखळी तज्ञ (स्मार्ट) गणेश मादेवार, कृषी पर्यवेक्षक मनिषा दुमाने, कापूस मुल्यसाखळी तज्ञ प्रतिक भेंडे, जिल्हा समन्वयक, (आत्मा) विशाल घागी, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक भुषण धानोरकर, लेखापाल मनोज चव्हाण आदीं  उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी भेटीदरम्यान आत्मा कार्यालय, आत्मा प्रशिक्षण हॉल व स्मार्ट प्रकल्पाच्या कक्षाची पाहणी केली. त्यासोबतच तालुका फळरोपवाटिका येथे सुरू असलेल्या ट्रायकोकार्ड निर्मिती युनिटला भेट दिली. यावेळी त्यांनी ट्रायकोकार्ड तयार करण्याची पद्धती जाणून घेतली. तालुका फळरोपवाटिके मध्ये तयार करण्यात येत असलेल्या विविध कलमारोपांची, शिंगाळा लागवड, पेरू लागवड तसेच गांडूळखत निर्मिती युनिटची पाहणी करुन गांडूळखत निर्मितीकरीता लागणारा खर्च, उत्पादन व विक्रीमधून मिळणाऱ्या रक्कमेच्या ताळेबंदाबाबत कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे व उपविभागीय कृषी अधिकारी एन. एन. घोडमारे यांच्याकडून माहिती जाणून घेतली.           कार्यालय परिसरात असलेल्या जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी प्रयोगशाळेत तपासणीकरीता आलेल्या मृद नमुन्यातील मूलद्रव्यांच्या तपासणी पद्धतीबाबत जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी बी. एस. सलामे यांनी जिल्हाधिकारी श्री.गौडा यांना माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी श्री.गौडा यांनी रोपवाटिकेला आणखी बळकट करण्याची तसेच स्वच्छ राखण्याची आवश्यकता असून त्यादृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.

०००००००

No comments:

Post a Comment