Search This Blog

Sunday 23 July 2023

जिल्हाधिका-यांनी केली बल्लारपूर तालुक्यातील पूरग्रस्त क्षेत्राची पाहणी

 





जिल्हाधिका-यांनी केली बल्लारपूर तालुक्यातील पूरग्रस्त क्षेत्राची पाहणी

 

चंद्रपूर, दि. 23 : गत काही दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील काही तालुके आणि चंद्रपूर शहराला पूराचा तड़ाखा बसला. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दोन दिवसांपूर्वी मूल तालुक्यातील गावांचा दौरा केला होता. तर आज (दि. 23 ) त्यांनी बल्लारपुर तालुक्यातील बामणी, विसापुर या पूरग्रस्त गावांचा दौरा करून झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

तालुकास्तरीय यंत्रणेला सूचना करताना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, पुरामध्ये अडकलेल्या गरजू व्यक्तींना तत्काळ मदत करावी व त्यांना सुरक्षित स्थळी पोहचविण्याची व्यवस्था करावी. शेतपिकाच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे पूर्ण करावेत. पूरग्रस्त गावामध्ये तसेच नगर परिषद क्षेत्रामध्ये आरोग्य व पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय उपलब्ध होईल, याची दक्षता घ्यावी व निर्जंतूकीकरण  करावे. डास व इतर कीटक वाढू नये, यासाठी आवश्यक ती कीटकनाशक फवारणी करावी. पावसाळ्यात साथीचे रोग पसरू नये यासाठी आरोग्य यंत्रणांनी खबरदारी घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी पाटील, तहसीलदार डॉ. कांचन जगताप, मुख्याधिकारी विशाल वाघ, गटविकास अधिकारी अनिरुद्ध वाळके, तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण, शिक्षणाधिकारी श्री. बोरीकर, पोलिस निरीक्षक उमेश पाटील,  मंडळ अधिकारी सुजित चौधरी आणि तलाठी शंकर खरुले उपस्थित होते.

0000000

No comments:

Post a Comment