Search This Blog

Thursday, 27 July 2023

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतांना सुरक्षितता आणि नियमांचे पालन आवश्यक



 

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतांना सुरक्षितता आणि नियमांचे पालन आवश्यक

Ø जिल्हाधिका-यांनी घेतली स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक

चंद्रपूर,दि.27 : शाळेत आपल्या पाल्यांचे जाणे-येणे अतिशय सुरक्षित असावे, असे प्रत्येकच पालकांना वाटत असते. ॲटो-रिक्षा असो की खाजगी वाहन किंवा स्कूल बस, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतांना सुरक्षितता महत्वाची असून नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.

नियोजन सभागृह येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे आयोजित स्कूल बस सुरक्षितता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त विपीन पालिवाल, शिक्षणाधिकारी (माध्य) कल्पना चव्हाण, उपशिक्षणाधिकारी अनिता ठाकरे, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्यास सर्व शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, स्कूल बस संघटनेचे प्रतिनिधी, वाहतूक संघटनेचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.

मुलं हे देशाचे भविष्य आहे. देशाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी मुलांची सुरक्षितता महत्वाची आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, वाहनांनी विद्यार्थ्यांचे शाळेत येणे-जाणे सुरक्षित असले पाहिजे. नियमांचे पालन केले तर अपघात टाळता येतात. वाहतूक करणारी शाळेची वाहने चांगल्या अवस्थेत असली पाहिजे. तसेच उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नियमानुसारच ती धावली पाहिजे. स्कूल बस चालविणा-या चालकाने जलदगतीने, अतिशय धोकादायक आणि अपघातास कारणीभूत ठरेल, अशी ड्रायव्हिंग करू नये. तसेच त्याने मद्यप्राशन करून वाहन चालवू नये. याबाबत शाळा व्यवस्थापन, बस चालविणारे चालक आणि पालकांमध्ये योग्य समन्वय ठेवावा. या बैठकीत मिळालेल्या सर्व सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.

तर राज्य परिवहन महामंडळाने शाळेच्या मार्गावरील बसेसची व्यवस्था शाळेच्या वेळापत्रकानुसार ठेवली तर विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. याबाबत परिवहन महामंडळ, उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक शाखेने संयुक्त तपासणी करून याबाबत योग्य निर्णय घ्यावा. वाहतुकीसंदर्भात काही तक्रार असल्यास उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या 7172272555 या क्रमांकावर संपर्क करावा, असे जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी सांगितले.

०००००००

No comments:

Post a Comment