Search This Blog

Tuesday 18 July 2023

‘ते’ बांधकाम पुलाचे नाही तर मोरीचे

 

‘ते’ बांधकाम पुलाचे नाही तर मोरीचे             

Ø पावसाळ्यात पाणी जमा न होण्यासाठी उपाययोजना केल्याचा खुलासा

चंद्रपूरदि. 18 : गोंडपिपरी तालुक्यातील गणपूर – झरण- कन्हाळगाव-वामनपल्ली रस्ता  (इ.जि.मार्ग क्र. 45) हा अतिशय महत्वाचा रस्ता असून तोहोगाव ते पोळसा पर्यंत एकूण 12 गावातील ग्रामस्थांचे या मार्गावरून आवागमन असते. या रस्त्यावर पुलाचे बांधकाम घेण्यात आले नसून पावसाळ्यात रस्त्यावर पाणी जमा होऊ नये म्हणून मोरीच्या (फिल्ड ड्रेन) कामाची तरतुद करण्यात आल्याचे जि.प.बांधकाम विभाग, पोंभुर्णा यांनी म्हटले आहे.

सदर रस्ता हा वरील गावांतील गावक-यांकरीता आवागमन करण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण असून तो पूर्णत: जंगलातून गेलेला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी  सखल भागामध्ये पावसाळ्यात जास्त प्रमाणात पाणी जमा होते.  पूर परिस्थिती अथवा अतिवृष्टीच्या कालावधीत तालुका किंवा जिल्हा स्तरावर आरोग्य व इतर कामांकरीता जायचे असल्यास नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे सखल भागास पावसाच्या पाण्याने कुठलाही धोका होऊ नये, अथवा रस्ता तुटू नये म्हणून पुलाचे नव्हे तर मोरीच्या (फिल्ड ड्रेन) कामाची तरतूद करण्यात आली आहे.

शिवाय सदर मोरीच्या कामाची प्रत्यक्ष मोका चौकशी करण्यात आली असून जिल्हा स्तरावरील वरिष्ठ तांत्रिक अधिकारी यांनी सदर रस्त्याची व मोरीच्या कामाची पाहणी तथा निरीक्षण केले आहे. मोरीच्या बांधकामामुळे सदर रस्त्याचे आयुष्य वाढेल व ग्रामस्थांची आवागमनाची सोय होईल, या उद्देशाने मंजूर अंदाजपत्रकातील तांत्रिक तरतुदीनुसार मोरीचे बांधकाम घेण्यात आले आहे. यात शासनाच्या निधीचा कुठल्याही प्रकारचा दुरुपयोग झाला नाही, असे उपविभागीय अभियंता, जि.प.बांधकाम उपविभाग, पोंभुर्णा यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment