पी.एम. किसान सन्मान निधी 27 जुलै रोजी होणार 14 हप्ता बँक खात्यात जमा
चंद्रपूर, दि. 26 : देशातील अल्पभुधारक शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना” 1 डिसेंबर 2018 पासून सुरू केलेली असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक रु. 6 हजार रुपये आर्थिक मदत म्हणून देण्यात येत आहे.
सदर योजनेच्या 14 वा हप्त्याचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते दिनांक 27 जुलै, 2023 रोजी सकाळी 11 वाजता सीकर, राजस्थान येथून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमाचे थेट प्रसारण https://pmevents.ncog.gov.in या लिंकच्या माध्यमातून देशातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना बघता येणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यासाठी कृषी विभागाच्यामार्फत तसेच कृषी विज्ञान केंद्र, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट, फळपीकनिहाय शेतकऱ्यांचे गट, आत्मा अंतर्गत स्थापन करण्यात आलेले गट, कृषी प्रात्यक्षिके व प्रशिक्षण यामध्ये समाविष्ठ होणारे गट, अशा विविध संस्थांमार्फत नियोजन करण्यात आलेले आहे.
या समारंभाच्या माध्यमातून संपूर्ण देशात 8.5 कोटी शेतकऱ्यांना तर महाराष्ट्रातील 85.66 लाख पात्र शेतकऱ्यांना पी. एम. किसान योजनेचा लाभ वितरीत केला जाण्याचा एक ऐतिहासिक क्षण असल्याने या समारंभामध्ये जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाचे वतीने करण्यात आले आहे.
०००००००
No comments:
Post a Comment