Search This Blog

Monday 24 July 2023

नागरीकांनो ! पूर ओसरल्यावर गावपातळीवर अशी घ्या काळजी

 

नागरीकांनो ! पूर ओसरल्यावर गावपातळीवर अशी घ्या काळजी

चंद्रपूर, दि.24 सध्या पावसाळा सुरू झाला असून पूर परिस्थितीमुळे बरीच गावे बाधीत झाली आहे. वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांचे पथक तयार केले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारासाठी पूरग्रस्त गावांचा दौरा करावा व गावात वैद्यकीय पथक 24 तास उपलब्ध राहील, याची खबरदारी घ्यावी. 

पूर ओसरल्यावर गावपातळीवर घ्यावयाची काळजी ग्रामपंचायत स्तरावर ब्लिचिंग पावडर साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून ठेवावा. प्रत्येक जलस्त्रोतांचे पाणी नमुने नियमित प्रयोगशाळेत तपासणीकरीता पाठविण्यात यावे. पूर ओसरल्यानंतर संपूर्ण गावामध्ये ब्लिचिंग पावडरने डस्टिंग करण्यात यावे. दलदल व कचरा साठलेल्या जागी मॅलेथीऑन 5 टक्केची धुरळणी करावी. माशा व इतर उपद्रवी कीटकांचा नायनाट करता येईल जेणेकरून रोगराई पसरणार नाही. प्रत्येक जलस्त्रोतांचे शुद्धीकरण करण्यात यावे. पूर ओसरल्यानंतर संपूर्ण गावातील व नाल्यातील पाणी वाहते करण्यात यावे. पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताजवळील परिसर स्वच्छता करावी.

गावातील नागरिकांनी पूर ओसरल्यानंतर घ्यावयाची काळजी :

घरात पिण्याचे पाणी घेतांना शक्यतो निर्जंतुकीकरण केलेले पाणी पिण्यासाठी वापरावे. पावसाळ्यातील दिवसात 20 मिनिटे उकळून थंड केलेले पाणी पिण्यासाठी वापरावे. पाणी घेतांना द्विपदरी कपड्याने गाळून पाणी घ्यावे. घरातील पिण्याचे पाणी उंच जागेवर ठेवावे. पाणी घेण्यासाठी ओरघड्याचा वापर करावा. पिण्याच्या पाण्यात मेडिक्लोरचा (क्लोरीन द्रावण) व जीवन ड्रॉपचा वापर करावा. पाणी गढूळ असल्यास तुरटीचा वापर करावा. शेतावर कामाला जातांना पिण्याचे पाणी घरून न्यावे. नदी, नाले किंवा शेतातील दूषित पाणी पिऊ नये. घराभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. घराजवळील डबके बुजवावे. घराशेजारी पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.

आपल्या घराभोवतील नाल्या, गटारात पाणी साचून राहणार नाही यादृष्टीने कार्यवाही करून पाणी वाहते करावे. साचलेल्या पाण्यात रॉकेल, डासअळीनाशक औषधी फवारणी करावी. डासापासून संरक्षण करण्याकरीता झोपतांना मच्छरदाणीचा वापर करावा. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा या दिवशी घरातील सर्व पाणीसाठे रिकामे करून धुवून स्वच्छ कपड्याने पुसून कोरडे करावे. रिकामे न करता येणाऱ्या पाणीसाठ्यात टेमीफासचा वापर करावा. गावात ग्रामपंचायतीमार्फत डास प्रतिबंधक धुर फवारणी करावी. पडित विहिरीत व पाण्याचे साठे यामध्ये गप्पी मासे सोडावे. कोणत्याही प्रकारचा आजार उद्भवल्यास नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये व आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये उपचारार्थ दाखल व्हावे, असे जि.प.आरोग्य विभागाने कळविले आहे.

०००००

No comments:

Post a Comment