Search This Blog

Monday 31 May 2021

पॉझिटीव्हीटी दर 10 पेक्षा कमी झाला तरच निर्बंध होणार शिथील

 

पॉझिटीव्हीटी दर 10 पेक्षा कमी झाला तरच निर्बंध होणार शिथील

Ø नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

Ø निर्बंधाबाबत यापूर्वीच्याच आदेशाला मुदतवाढ

चंद्रपूरदि.31 मे : कोरोनाची मानवी साखळी तोडण्यासाठी तसेच प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्यावतीने काही निर्बंध घालण्यात आले आहे. या निर्बंधास जिल्ह्यात 15 जून 2021 च्या सकाळी 7 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

शासनाच्या 30 मे च्या सुधारीत निर्देशाप्रमाणे जिल्हास्तरावर निर्बंध शिथिल करण्याची मुख्य अट म्हणजे जिल्ह्याचा मागील आठवडयाचा पॉझिटीव्हीटी दर हा 10 किंवा त्यापेक्षा कमी असला पाहिजे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात हा दर 10 पेक्षा जास्त असल्यामुळे मागील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे.

      तसेच निर्बंध शिथिल करण्याची दुसरी अट म्हणजे जिल्ह्यात एकूण ऑक्सीजन बेडच्या 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त  ऑक्सीजन बेड रिक्त असणे आवश्यक आहे. निर्बंधात शिथिलता आणण्यासाठी पॉझिटीव्हीटी दर हा 10 किंवा त्यापेक्षा कमी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे यापूर्वी निर्गमित केलेल्या आदेशास जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी 15 जून 2021 च्या सकाळी 7 वाजेपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

आजपासून (दि.31) येत्या शुक्रवारपर्यंत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10 किंवा त्यापेक्षा खाली आला तर शासनाच्या सुधारीत निर्देशाप्रमाणे जिल्ह्याला दिलासा मिळू शकतो. त्याकरीता नागरिकांचे सहकार्य आवश्यक असून नागरिकांनी कोरोना बाबतच्या नियमांचे पालन करावे. दैनंदिन मास्कचा वापर, वारंवार हात स्वच्छ धुणे, गर्दी टाळणे, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.

            सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुखांनी उपरोक्त आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय दंड संहिता तसेच साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

000000


No comments:

Post a Comment