Search This Blog

Friday 7 May 2021

कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या वरोरासह भद्रावती, राजुरा व बल्लारपूरला पालकमंत्र्यांनी दिली भेट





 

कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या वरोरासह भद्रावती, राजुरा व बल्लारपूरला पालकमंत्र्यांनी दिली भेट

Ø कोविड केअर सेंटर येथे केली पाहणी.

Ø रुग्णांना आवश्यक सुविधा पुरविण्याचे  निर्देश.

Ø सुरक्षित अंतर राखत रुग्णांशी साधला संवाद.

Ø बल्लारपूर मध्ये तातडीने 20 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देण्याचे निर्देश.

चंद्रपूर दि. 7 मे : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी आज चंद्रपूर जिल्ह्यात हॉटस्पॉट ठरलेल्या वरोरा तसेच भद्रावती, राजुरा व बल्लारपूर कोविड केअर सेंटर येथे भेट देत पाहणी केली व कोरोना रुग्णांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.

यावेळी पालकमंत्र्यांसमवेत, खासदार सुरेश उपाख्य बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर,आमदार सुभाष धोटे प्रामुख्याने उपस्थित होते.

आयसोलेशन मधील रुग्णांना जेवणात नॉनव्हेज व अंडे देण्यात यावे. रोज दोन वेळेस जेवण, चहा व नाश्ता देण्यात यावे. तसेच ग्रामपंचायतींना आयसोलेशन साठी निधी उपलब्ध करून दिला आहे त्याचा उपयोग करून तातडीने विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात यावे. रुग्णांना योग्य आरोग्य सुविधा पुरवाव्यात अशा सूचना दिल्या.

यावेळी पालकमंत्र्यांनी 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांची तसेच 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरणाबाबत माहिती घेतली. तालुक्यात लस घेणाऱ्यांची संख्या व तालुक्यात किती लस साठा उपलब्ध आहे याबाबत आढावा घेण्यात आला.

खासदार बाळू धानोरकर यांनी लसीकरणासाठी 18 ते 44 वयोगटासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक केल्याने  बाहेर जिल्ह्यातील नागरिक याचा लाभ घेत आहेत, मात्र मोबाईल नसलेले ग्रामीण भागातील स्थानिक नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहे. तरी त्यांच्यासाठी ऑफलाईन पद्धतीने लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली.

तर आ. प्रतिभा धानोरकर यांनी कोविड-19 पेशंट मॅनेजमेंट पोर्टल वर अतिशय गंभीर रूग्णांना अनुक्रम सोडून प्राधान्य देण्याचे केली तसेच पहिली लाट सुरू झाली तेव्हा पॉझिटिव रुग्णांना रुग्णवाहिका घेऊन जायची, रुग्णांच्या कुटुंबीयांना सुद्धा कोविड टेस्ट ला नेण्यात यायचे. त्याप्रमाणे आता देखील पॉझिटिव्ह रुग्णांना वेळीच रुग्णांलयात दाखल करण्यास यंत्रणेला निर्देश देण्याची मागणी केली.

राजुरा येथील कोविड केअर सेंटरला भेट व आढावा :

पालकमंत्री ना. वडेट्टीवार यांनी राजुरा येथील कोविड केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली. व राजुरा उपविभागीय कार्यालयात अधिकाऱ्यांसमवेत  करण्यात  आलेल्या कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला. या बैठकीमध्ये राजुरा, जिवती व कोरपणा या तीन तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

 

राजुराचे आमदार सुभाष धोटे यांनी राजुरा विभागात सध्या 40 ऑक्सिजन बेड उपलब्ध असून लवकरच 200  बेड वाढविण्याचे प्रस्तावित असून येत्या काही दिवसात कार्यान्वित करण्यात येणार आहे.तसेच ऑक्सिजनचा पुरवठा वाढवून देण्यात यावा अशी मागणी यावेळी केली.

शहरात बाधित रुग्ण किती आहेत, नगर परिषदेमार्फत त्यांच्यासाठी काय सुविधा करण्यात आलेल्या आहे, तालुक्यातील पॉझिटिव्ह रेट काय आहे? याबद्दल पालकमंत्र्यांनी माहिती जाणून घेतली. तसेच कोविड-19 पेशंट मॅनेजमेंट पोर्टल वर अतिशय गंभीर रूग्णांना अनुक्रम सोडून प्राधान्य द्यावे.

 पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी राजुरा येथील कोविड केअर सेंटर मध्ये भरती असलेल्या रुग्णांशी सुरक्षित अंतर राखत व कोविंड नियमांचे पालन करून संवाद साधला.

जेवण वेळेवर मिळते का? औषधोपचार व्यवस्थित सुरू आहे का? काही त्रास आहे का? असे प्रश्न पालकमंत्री यांनी रूग्णांना विचारत माहिती घेतली. औषध साठा,ऑक्सीजन सिलेंडर यांच्या उपलब्धतेबाबत माहिती घेऊन कोविड रुग्णांच्या व्यवस्थेकडे लक्ष देण्याच्या सूचना केल्या.

तालुक्‍यात ऑक्सीजन सिलेंडर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतानाही ऑक्सिजन बेडची संख्या कमी असल्याबाबत पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त करून ऑक्सिजन बेडची संख्या तातडीने वाढविण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिलेत.

 

बल्लारपूर येथे कोविड केअर सेंटरची पाहणी व उपाययोजनांबाबत आढावा.

बल्लारपूर तालुक्यात सध्या 250 आयसोलेशन बेड उपलब्ध आहे मात्र गंभीर रुग्णांकरिता ऑक्सीजन बेडची अद्याप योग्य व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यासाठी बल्लारपूरला  20 जम्बो ऑक्सीजन सिलेंडर तातडीने उपलब्ध करण्यात यावे असे पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दूरध्वनीद्वारे जिल्हा शल्य चिकित्सक यांना सांगितले. यात सध्या किमान दहा रुग्णांच्या ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात यावी अशा सूचना त्यांनी स्थानिक प्रशासनाला दिल्या.

लॉकडाउन काळात अत्यावश्यक  कामासाठीच बाहेर निघावे, विनाकारण रस्त्यावर फिरू नये तसे आढळल्यास पोलीस विभागामार्फत कायदेशीर कारवाई करण्यात यावी असेही ते म्हणाले. तसेच बल्लारपूर मध्ये स्थानिक प्रशासनाने कोविड रुग्ण हाताळताना योग्य नियोजन केलेले नाही. याबाबतीत गंभीर दखल घेण्यात यावी. इतर तालुक्याप्रमाणे बल्लारपूर तालुक्यात आरोग्यविषयक सुविधा तातडीने उपलब्ध करुन देण्याची निर्देश आरोग्य विभागाला दिलेत.

वन अकादमी येथे पाहणी:

वन अकादमी मध्ये प्रस्तावित वाढीव ऑक्सिजन बेड निर्मितीची पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर उपस्थित होते.

वरोरा येथील आढावा बैठकीला पंचायत समिती सभापती रवींद्र धोटे, नगर परिषदेचे उपसभापती अनिल झोटे, नगरसेवक छोटूभाई शेख, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजेंद्र चिकटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंकुश राठोड, तालुका वैद्यकीय अधिकारी बाळू मुंजनकर, वरोरा, भद्रावती, बल्लारपूर व राजुरा येथील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तसेच संबंधित वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

0000000

No comments:

Post a Comment