Search This Blog

Saturday 1 May 2021

चंद्रपूर कोविड-19 पेशंट मॅनेजमेंट पोर्टल कार्यान्वित




 

चंद्रपूर कोविड-19 पेशंट मॅनेजमेंट पोर्टल कार्यान्वित

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते झाले पोर्टलचे उद्घाटन

 

Ø  ऑनलाईन बेड अलॉटमेंट प्रणालीमुळे रुग्णांची गैरसोय टळणार

Ø  गरजू रुग्णांना विहित वेळेत बेड उपलब्ध होण्यास मदत.

Ø  आय.सी.यु., व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड च्या तीन स्वतंत्र प्रतीक्षा याद्या होणार

Ø  प्रतिक्षा यादी डावलून कोवीड हॉस्पिटलला परस्पर रुग्ण भरती करता येणार नाही

Ø  रिक्त बेड असतांना बेड उपलब्ध नसल्याची सबब सांगता येणार नाही

Ø  ऑनलाईन बेड अलॉटमेंट प्रणाली चंद्रपूर जिल्ह्यात सर्वप्रथम कार्यान्वित

 

चंद्रपूर दि. 2 मे :  जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत, बरेचदा गंभीर रुग्णांना अनेक ठिकाणी बेड उपलब्ध असूनही त्याची माहिती उपलब्ध होत नाही व त्यांना हॉस्पिटलसाठी वणवण फिरावे लागूनही उपचारासाठी वेळेवर बेड मिळत नाही, या आशयाच्या तक्रारींची जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेवून रुग्णांना त्यांच्या प्राथमिकतेनुसार आय.सी.यु., व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड मिळावे यासाठी चंद्रपूर कोविड-19 पेशंट मॅनेजमेंट पोर्टल कार्यान्वित केलेले आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या पोर्टलचे उद्घाटन 1 मे रोजी  करण्यात आले. गंभीर रुग्णांना वेळेवर बेड मिळण्यासाठी या प्रणालीचा निश्चितच उपयोग होणार असून रूग्णांची याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

 यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, मनपा आयुक्त राजेश मोहिते, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, प्रामुख्याने उपस्थित होते.

या पोर्टल च्या माध्यमातून कोविड रुग्णांना चंद्रपूर शहरातील सर्व कोवीड रुग्णालयात आय.सी.यु., व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड च्या तीन स्वतंत्र प्रतीक्षा यादी नुसार बेड उपलब्ध होतील. यासाठी सर्वप्रथम रुग्ण जवळच्या कोवीड केअर सेंटर किंवा कोविड रुग्णालयात गेल्यावर तिथे रुग्णांचे ऑक्सिजन लेवल व इतर बाबींची तपासणी करून त्याची नोंदणी सदर पोर्टलवर अपलोड करण्यात येईल. नोंदणीनंतर प्रत्येक रुग्णांना एक टोकन नंबर देण्यात येईल. सदर पोर्टलवर नोंदणी केलेल्या रुग्णांची बेड निहाय प्रतीक्षा यादी तयार होईल.  रुग्णाची गंभीर स्थिती पाहून केंद्रीय प्रवेश पद्धतीनुसार रुग्णाला चंद्रपूर शहरातील आवश्यक सुविधा युक्त हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होईल व त्यांच्यावर वेळीच उपचार सुरू होईल.

सोमवार पासून शहरातील सर्व कोवीड हॉस्पिटल रुग्णांना परस्पर दाखल करून न घेता या प्रणालीवर नोंदणी केलेल्या प्रतिक्षा यादीतीलच रूग्णांना भरती करून घेतील. ऑनलाईन प्रणालीमुळे जुन्या रूग्णाला सुटी मिळाल्यावर हॉस्पीटलमध्ये रिक्त होणाऱ्या बेडची माहिती जिल्हा नियंत्रण कक्ष व कोवीड केअर सेंटरला लगेच उपलब्ध होईल. हा रिक्त झालेला बेड प्रतिक्षायादीतील रूग्णाचे नावे लगेचच उपलब्ध होईल. बेड मिळाल्याची  माहिती  संबंधित रुग्णालय तसेच जिल्हा नियंत्रण कक्षाद्वारे रुग्णाला दूरध्वनीद्वारे देण्यात येईल. या प्रणालीच्या माध्यमातून बेड उपलब्ध करून दिलेल्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण थेट जाऊन उपचार घेतील. यामुळे प्रतीक्षा यादीतील गरजू रुग्णाला तात्काळ बेड उपलब्ध होईल. बेड उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांची इतरत्र बेड शोधण्यासाठी फरपट होणार नाही तसेच हॉस्पिटल प्रशसनालादेखील बेड रिक्त नसल्याची सबब यामुळे आता सांगता येणार नाही.

चंद्रपूर शहराच्या बाहेरील कोविड हॉस्पिटलचा समावेश सध्या या पोर्टलमध्ये करण्यात आलेला नाही. या पोर्टलमध्ये हॉस्पिटलला दिल्या जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनची माहिती, कोविड हॉस्पिटल, डॉक्टर व त्यांचे नोडल अधिकारी यांची माहिती व मोबाईल क्रमांक उपलब्ध असणार आहे.

 या पोर्टलद्वारे प्रत्येक रुग्णाला त्याच्या आवश्यकतेप्रमाणे हॉस्पिटल व बेड उपलब्ध होऊ शकेल. नोंदणी करताना रुग्णाचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, रुग्णाच्या शरीरातील ऑक्सीजन पातळी, आरटीपिसीआर तपासणी अहवाल आवश्यक आहे. तसेच नोंदणी करताना चार रुग्णांच्या नोंदणीसाठी एका मोबाइल क्रमांकाचा वापर करता येऊ शकेल, बेड उपलब्धतेची माहिती मोबाइलवर देण्यात येणार असल्याने नोंदणीच्या वेळी योग्य मोबाईल क्रमांक नोंदवावा. रुग्णांना प्रतिक्षा यादीतील आपले स्थान कंट्रोल रूमच्या 07172-274161 व 07172-274162 या क्रमांकावरून देखील माहिती करून घेता येईल. प्रणलीवर वैद्यकीय तपासणीची वसतुनिष्ठ माहिती भरावयाची असल्याने रूग्णांना वैयक्तिक नोंदणी करता येणार नाही.

कोवीड रूग्णांसाठी वरीलप्रमाणे ऑनलाईन बेड अलॉटमेंट प्रणाली चंद्रपूर जिल्ह्यात सर्वप्रथम कार्यान्वित करण्यात येत आहे. रूग्णांना शासकीय व खाजगी कोविड रूग्णालयात अतिदक्षता, व्हेंटीलेटर व ऑक्सीजन बेड मिळण्यासाठी याचा थेट लाभ होणार असून रूग्णांनी खाली दिलेल्या कोविड केअर सेंटर व हॉस्पीटलमध्ये नोंदणी करून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

*या ठिकाणी होणार नोंदणी-* चंद्रपूर शहर- वन ॲकॅडमी होस्टेल तसेच सर्व कोवीड हॉस्पीटल; ब्रम्हपुरी-  कोविड केअर सेंटर, पॉलीटेक्नीक कॉलेज; चिमूर- मागासवर्गीय मुलींचे वस्तीगृह, कोर्टासमोर; गोंडपिपरी- आदिवासी मुलींचे वस्तीगृह; कोरपना- मुलींचे वस्तीगृह, भाऊराव पाटील चटप आश्रमशाळा, आदिलाबाद रोड; सावली- राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय वस्तीगृह; सिंदेवाही- मागासवर्गीय मुलांचे वस्तीगृह, पथारी रोड; राजुरा- समाजकल्याण मुलांचे वस्तीगृह, इंदिरा नगर; गडचांदूर- होली फॅमेली स्कुल; भद्रावती- जैन मंदिर; मुल- उपजिल्हा रूग्णालय क्वॉर्टर, वरोरा- 1. आदिवासी मुलींचे वस्तीगृह, 2.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वस्तीगृह,3. आदिवासी मुलांचे वस्तीगृह;  बल्लारपूर- 1. सैनिक शाळा बल्लारपूर, 2. समाजकल्याण वस्तीगृह; नागभिड- जी.डब्ल्यु. कॉलेज; पोंभूर्णा- ग्रामीण रूग्णालय; या कोविड केअर सेंटर व कोविड हॉस्पीटलमधून रूग्णांची नोंदणी करण्यात येईल.

सदर पोर्टल कार्यान्वित करण्यासाठी नागपूर येथील लॉज त्रिमूर्ती  या संस्थेचे सहकार्य लाभले आहे.

00000

2 comments:

  1. प्रभावीपणे राबविणे कठीण वाटते

    ReplyDelete
  2. Commendable initiative .It will bring respite to the needy patients.Please see to it that it's implemented and managed properly. Thanks to the district administration.
    Well done 👍👍🙏

    ReplyDelete