अंमली पदार्थाच्या वापरावर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समिती गठीत
Ø पोलिस अधिक्षकांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक
चंद्रपूर, दि. 25 एप्रिल : जिल्हा तसेच तालुका पातळीवर होणारे अंमली पदार्थाचे सेवन व वापरावर आळा घालण्यासाठी तसेच अंमली पदार्थाची समस्या प्रभावीपणे हाताळण्यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीचे गठण करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या अध्यक्षतेखाली सदर समिती असून यात एकूण 10 सदस्यांचा समावेश आहे.
या समितीची पहिली बैठक पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे आज (दि.25) घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, अन्न व औषधी प्रशासनाचे उमाकांत वाघमारे, राज्य शुल्क उत्पादन विभागाचे अधिक्षक संजय पाटील, मुख्य डाकघरचे अधिक्षक वी.व्ही. रामिरेड्डी, केंद्रीय वस्तु व सेवाकर विभागाचे श्री. पॉल, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर आदी उपस्थित होते.
असे राहील कार्यकारी समितीचे काम : शासनाच्या दिशानिर्देशाप्रमाणे सदर समितीचे गठण करण्यात आले असून यात जिल्ह्यातील अंमली पदार्थ विरोधी कार्यवाहीचा नियमित आढावा घेणे, जिल्ह्यात खसखस किंवा गांजा पिकाची लागवड होणार नाही, याची दक्षता घेणे. कुरीअरच्या माध्यमातून अंमली पदार्थाची मागणी व पुरवठा होणार नाही याकडे लक्ष ठेवणे, व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दाखल झालेल्या व्यक्तिंची संख्या व त्यांना कोणत्या अंमली पदार्थाचे सेवन आहे काय, याची माहिती प्राप्त करणे, ड्रग्ज डिटेक्शन किट आणि टेस्टिंग केमिकल्स यांची उपलब्धता निश्चित करणे, जिल्हास्तरावर अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती अभियान राबविणे, जिल्हा पोलिस, नार्कोटिक विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती संकलित करून डाटाबेस तयार करणे, एनडीपीएस अंतर्गत गुन्ह्यांच्या तपास अधिका-यांकरीता प्रशिक्षण आयोजित करणे तसेच जिल्ह्यामध्ये अस्तित्वात असलेल्या रासायनिक कारखान्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थाचे उत्पादन होणार नाही, याची दक्षता घेणे आणि बंद असलेल्या कारखान्यांवर विशेष लक्ष देणे आहे.
समितीची रचना : जिल्हा पोलिस अधिक्षक हे अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीचे अध्यक्ष असून इतर सदस्यांमध्ये सीमा शुल्क / केंद्रीय वस्तु व सेवाकर विभागाचे कार्यक्षेत्रीय सहाय्यक आयुक्त, चंद्रपूरचे उपविभागीय दंडाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिक्षक, सहाय्यक आयुक्त (औषधे), राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, टपाल विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी आणि जिल्हा माहिती अधिकारी यांचा समावेश आहे.
000000
No comments:
Post a Comment