Search This Blog

Wednesday 20 April 2022

दुर्गापूर येथील आरोग्य शिबिरात 668 जणांची तपासणी




 

दुर्गापूर येथील आरोग्य शिबिरात 668 जणांची तपासणी

Ø स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तालुकास्तरीय शिबिराचे आयोजन

चंद्रपूर दि. 20 एप्रिल : जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा, आजारांचे लवकर निदानासाठी स्क्रिनिंग, आजार होणार नाही यासाठी घ्यावयाची काळजी, औषधांसह मुलभूत आरोग्य सेवा तसेच आवश्यकतेनुसार आरोग्य तज्ज्ञांच्या सेवा प्रदान करण्यासाठी जिल्ह्यात 18 ते 27 एप्रिल 2022 या कालावधीत तालुकानिहाय आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार दुर्गापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. दिवसभर चाललेल्या या शिबिरात एकूण 668 जणांची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार करण्यात आले. 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आरोग्य विभागाने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात या शिबिरांचे आयोजन केले आहे. दुर्गापूर येथील शिबिराचे उद्घाटन गावच्या सरपंचा पुजा मानकर यांच्या हस्ते करण्यात आले. उपसरपंच प्रज्योत पुणेकर, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. बंडू रामटेके, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. पराग जिवतोडे आदी उपस्थित होते.

या आरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी 668 रुग्णांची तपासणी करून संबंधितांना मोफत औषधोपचार केले. यात 401 जणांचे डिजीटल हेल्थ आयडी काढणे, 31 जणांचे आयुष्यमान भारत कार्ड काढणे, 106 जणांची टेली कन्सल्टेशन, स्त्रीरोग तपासणी – 67, बालरोग तपासणी – 32, आरटीआय / एसटीडी तपासणी – 62, कुटुंब नियोजन समुपदेशन – 40, हिवताप रक्तनमुने – 15, संशयित क्षयरुग्ण – 2 व इतर आजारांबाबत आरोग्य सेवा देण्यात आली. तसेच सदर शिबिरात जनजागृतीकरीता विविध विभागाच्या आरोग्य प्रदर्शनीचे स्टॉल लावण्यात आले होते. यात क्षयरोग, हिवताप, हत्तीरोग, कुष्ठरोग, राष्ट्रीय असंसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम , महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आहार प्रदर्शनी आदी स्टॉलचा समावेश होता.

शिबिराला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, प्रभारी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता हजारे, गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ आदींनी भेट देऊन मेळाव्याच्या यशस्वितेकरिता मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन एस.एस.नन्नावरे यांनी तर आभार डॉ. आशिष वाकडे यांनी मानले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एन.जे.श्रृंगारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष वाकडे, डॉ. अमित जयस्वाल, डॉ. विवेक बांगडे, डॉ. अंक्षिता कडू, दुर्गापूर ग्रामपंचायतीचे सदस्य, प्राथमिक आरोग्य केंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक / सेविका यांच्यासह गावातील नागरीक उपस्थित होते.

०००००००

No comments:

Post a Comment