Search This Blog

Friday 15 April 2022

वनव्याप्त परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यास प्राधान्य - पालकमंत्री विजय वडेट्टीवार

 









वनव्याप्त परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यास प्राधान्य

- पालकमंत्री विजय वडेट्टीवार

Ø  ड्रायव्हिंग प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या युवकांना प्रमाणपत्र व नियुक्ती पत्राचे वाटप

Ø  सिंदेवाही येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण

चंद्रपूर, दि. 15 एप्रिल : सिंदेवाही तालुक्यातील परिसर वनव्याप्त असल्याने या परिसरातील तरुणांना रोजगार नाही. येथील युवकांच्या हाताला रोजगार मिळावा, यासाठी तरुणांना स्वयंरोजगाराभिमुख वाहन चालक प्रशिक्षण देण्यात येत आहे. वनव्याप्त परिसरातील युवकांना रोजगार उपलब्ध करुन देणे हे आपले ध्येय आहे, असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

वनविभाग सभागृह, सिंदेवाही येथे उपवनसंरक्षक ब्रह्मपुरीच्या वतीने आयोजित डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेअंतर्गत प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सिंदेवाही वनविभागाचे उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा, एक्सलन्स ड्रायव्हिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे संचालक श्री.गोदेवार, वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर, श्रीमती ब्राह्मणे, मध्यवर्ती कास्ट भंडारचे श्री. दुर्गेकर तसेच वनविभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

वनव्याप्त परिसरातील कुटुंबाना सक्षम करण्यासाठी तरुणांच्या हाताला काम मिळणे आवश्यक आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, वनांनी व्यापलेला भाग असल्याने या परिसरातील युवकांना रोजगार नाही. त्यामुळे वन्यजीव संवर्धनासाठी संरक्षित क्षेत्र लगतच्या गावातील संसाधनांची उत्पादकता वाढावी व येथील नागरिकांना पर्यायी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने जनवन विकास योजनेअंतर्गत सदर उपक्रम राबविण्यात आला आहे. ब्रह्मपुरी वनविभाग व एक्सलन्स ड्रायव्हिंग इन्स्टिट्यूट, छिंदवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील 200 तरुण-तरुणींना ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. स्वतःच्या पायावर उभे राहण्याकरीता हे प्रशिक्षण फायदेमंद आहे.

जिल्ह्यात जवळपास 16 कोलमाईन्स असून त्या ठिकाणी हेवी व्हेहिकल चालविणाऱ्या किमान 2 हजार ड्रायव्हरची आवश्यकता आहे. त्यामुळे येत्या कालावधीत आणखी 200 युवकांना जेसीबी ड्रायव्हिंग प्रशिक्षण तसेच ब्रह्मपुरी, सिंदेवाही व सावली तालुक्यातील युवकांना स्किल डेव्हलपमेंट प्रशिक्षण राबवावेत, त्याकरिता लागणारा आवश्यक तो निधी उपलब्ध करून देणार असल्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.

पालकमंत्री पुढे म्हणाले, ड्रायव्हिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून 200 युवकांना वाहन चालकाचे प्रशिक्षण मिळाले आहे. जिल्ह्यात ड्रायव्हरची फार आवश्यकता आहे. सद्यस्थितीत नौकरी मिळवणे फार कठीण झाले आहे. कोरोना लाॅकडाऊन काळात अनेक तरुणांचा रोजगार गेला.आयटी सेक्टरमधील नोकऱ्या संपुष्टात आल्या. मोठ्या उद्योगधंद्यांवर परिणाम झाला, ही परिस्थिती कोरोनामुळे निर्माण झाली. जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने बंद पडलेल्या उद्योगांना सुरू करण्याचे प्रयत्न केले. जिल्ह्यात अनेक कोळशाच्या खाणी आहेत. त्या पूर्ववत सुरू करण्याचे काम झाले, त्यासाठी अत्याधुनिक मशिनरीसाठी मोठ्या प्रमाणात ड्रायव्हरची आवश्यकता आहे. आणि ती आवश्यकता लक्षात घेऊन पुढील प्रशिक्षण हेवी व्हेहिकलचे राबवावे, अशा सूचना त्यांनी वनविभाग व ड्रायव्हिंग इन्स्टिट्यूटला दिल्या.

उपवनसंरक्षक, ब्रह्मपुरीच्या वतीने आयोजित डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेअंतर्गत सिंदेवाही तालुक्यातील ड्रायव्हिंग प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे तसेच नियुक्ती पत्राचे वितरण पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले व युवक युवतींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

फुटपाथ विक्रेत्यांना छत्र्यांचे वितरण : भर उन्हात रस्त्यावर विक्री करणाऱ्या फुटपाथ विक्रेत्यांना उन्हापासून संरक्षण मिळावे, या हेतुने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सिंदेवाही व ब्रम्हपुरी तालुक्यातील फूटपाथ विक्रेत्यांना ग्रीष्मकालीन छत्र्यांचे वितरण पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या कुटुंबाची उपजिविका चालवण्यासाठी अनेक गरीब व्यक्ती, निराधार महिला, दिव्यांग व्यक्ती हे फूटपाथवर आपला व्यवसाय चालवतात. ऊन असो की पाऊस रोज व्यवसाय करून कष्टाने दोन पैसे कमवून कुटुंबाची जबाबदारी सन्मानाने यशस्वीपणे पूर्ण करतात. अशा फूटपाथ विक्रेत्यांच्या समस्यांची जाणीव ठेवून अनेक व्यावसायिकांना छत्री उपलब्ध करून देत सावली देण्याचा प्रयत्न जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला. त्यासोबतच अभिजित वंजारी यांच्या स्थानिक आमदार निधीतून सिंदेवाही रुग्णालय याकरिता एक रुग्णवाहिका देण्यात आली. त्या रुग्णवाहिकेचे लोकार्पणसुद्धा पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

00000

No comments:

Post a Comment