निर्ढावलेपणा सोडून कामगारांच्या रास्त मागण्या त्वरीत पूर्ण करा - पालकमंत्री विजय वडेट्टीवार
Ø सिमेंट, एकोना माईन्स आणि केपीसीएलच्या प्रतिनिधींना खडे बोल
Ø जिल्ह्यातील कामगारांचे हित सर्वोच्च
चंद्रपूर दि. 6 एप्रिल : कोणताही उद्योग हा कामागारांच्या भरोश्यावर मोठा होत असतो. मात्र कामगारांच्या मेहनतीवर नफा कमवायचा आणि त्यांच्या मुलभूत मागण्यांकडे दुर्लक्ष करायचे, असे प्रकार जिल्ह्यातील बहुतांश उद्योगात सुरू आहे. स्थानिक कामगारांचे हित आपल्यासाठी सर्वोतोपरी असून उद्योग सुरळीत सुरू ठेवायचा असेल तर कामगारांच्या रास्त मागण्या त्वरीत पूर्ण करा, अशा शब्दात जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी उद्योग प्रतिनिधींना खडसावले.
कामगारांच्या अडीअडचणी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात सिमेंट उद्योग, एकोना माईन आणि केपीसीएलच्या उद्योग प्रतिनिधींची नुकतीच बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, सहाय्यक कामगार आयुक्त देवेंद्र राम, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, शिवानी वडेट्टीवार आदी उपस्थित होते.
उद्योगांमुळे नागरिकांच्या हाताला काम मिळते, त्यामुळे आम्ही उद्योगांच्या विरोधात नाही, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, स्थानिक तसेच प्रकल्पग्रस्तांना डावलून बाहेरच्या लोकांची भरती होत असेल तर खपवून घेणार नाही. उद्योगांच्या प्रदुषणामुळे येथील नागरिक रोज मरत आहे, याची जाणीव ठेवावी. केवळ नफा कमविण्याच्या उद्देशाने उद्योग चालवू नये. उद्योगांमध्ये स्थानिक व इतर कामगार किती घ्यायचे याचे प्रमाण ठरले आहे. मात्र बाहेरच्या लोकांना स्थानिक दाखले देऊन रोजगार देण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. अशा प्रकरणांची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी.
एसीसी सिमेंट उद्योगाने कामगारांसाठी 15 दिवसांत कँटीन सुरू करावी. तसेच त्यांना गणवेश द्यावा. ज्या कंपन्यांमध्ये औषधांचा तुटवडा आहे, त्यांनी औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा. कामागारांचा आरोग्य विमा काढून त्यांना संरक्षण द्यावे. जन्मतारीख चुकीची दाखवून ज्या कामगारांना वेळेपूर्वीच निवृत्त करण्यात आले आहे, त्यांना सेवेत रुजू करून घ्यावे.
एकोना आणि मारडा या दोन गावातील 60 भुमीहिन शेतमजुरांना तसेच 905 प्रकल्पग्रस्तांना महालक्ष्मी कंपनीत रोजगार द्यावा. स्थानिक नागरिकांमध्ये जे प्रशिक्षित आहेत, त्यांना तात्काळ कामावर घ्यावे. तसेच इतरांना प्रशिक्षित करण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करावे. सिन्हाळा, मसाळा आणि नवेगाव मध्ये अंतर्गत रस्त्यांची कामे, तसेच इरई नदीवरून पाईपलाईनचे काम तात्काळ करून पाणी पुरवठा करावा.
केपीसीएल कंपनीत गत गत दीड वर्षांपासून कामगारांचा दहा महिन्याचा पगार थकीत आहे. चालू पगारासोबतच थकित दहा महिन्याचा पगार तीन टप्प्यात कंपनीने द्यावा. तसेच केपीसीएल ने वेतन संदर्भात करार करून करारानुसार वेतन द्यावे. कामगारांनीसुध्दा शुल्लक कारणावरून कंपनी बंद करू नये. बरांज (मोकासा) आणि केक बरांज येथील पुनर्वसनाबाबत उपविभागीय अधिकारी यांची यादी प्रमाण मानून आकडेवारी निश्चित करावी. तसेच पुनर्वसनाची कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
बैठकीला माजरी येथील कोल माईन्सचे मुख्य व्यवस्थापक श्री. गुप्ता, चंद्रपूर येथील व्यवस्थापक शब्बीर शेख यांच्यासह क्षेत्रीय व्यवस्थापक, कंपन्यांचे नियोजन अधिकारी, मनुष्यबळ व्यवस्थापक, एसीसी, अल्ट्राटेक, अंबुजा सिमेंट कंपन्यांचे प्रतिनिधी व संबंधित गावातील गावकरी आदी उपस्थित होते.
०००००००
No comments:
Post a Comment