18 ते 27 एप्रिल दरम्यान तालुकानिहाय आरोग्य मेळाव्यांचे आयोजन
Ø जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा
चंद्रपूर, दि. 12 एप्रिल : आजारांच्या लवकर निदानासाठी स्क्रिनिंग, औषधांसह मुलभूत आरोग्य सेवा तसेच आवश्यकतेनुसार आरोग्य तज्ज्ञांच्या सेवा प्रदान करण्यासाठी, सोबतच आरोग्य विभागाच्या विविध योजना नागरिकांपर्यत पोहचाव्यात, यासाठी जिल्ह्यात 18 ते 27 एप्रिल 2022 या कालावधीत तालुकानिहाय आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आरोग्य मेळाव्याच्या नियोजनाचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके आदी उपस्थित होते.
एका दिवशी दोन तालुक्यात याप्रमाणे तालुकास्तरीय आरोग्य मेळाव्याचे नियोजन करण्यात आले आहे. याची सुरवात 18 एप्रिल रोजी दुर्गापूर (ता. चंद्रपूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि बल्लारपूर तालुक्यात ग्रामीण रुग्णालय येथे होणार आहे. याप्रमाणे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या तालुक्यात मेळाव्यांचे आयोजन आहे. यात बालकासंदर्भातील आजार, कुटुंब नियोजन, आहाराविषयक माहिती, कुष्ठरोग नियंत्रण, क्षयरोग नियंत्रण, मलेरीया प्रतिबंध, त्वचेची निगा राखणे, डोळ्यांचे आजार, कान – नाक – घसा तपासणी, दातांची काळजी, कॅन्सर स्क्रिनिंग, तंबाखू आणि मद्यपाणामुळे होणारे दुष्परिणाम आदींचा समावेश आहे.
यासोबतच आयुष्यमान भारत हेल्थ ॲन्ड वेलनेस सेंटर्स व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनांबाबत लोकांना माहिती देणे, आयुष्यमान भारत डीजीटल मिशन अंतर्गत युनिक हेल्थ कार्ड तयार करणे, पात्र नागरिकांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत आयुष्यमान भारत कार्ड मिळवून देण्यासाठी मदत करणे, विविध संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे व आरोग्य शिक्षण देणे आदींचा समावेश आहे.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, या मेळाव्यांच्या माध्यमातून कोवीड पश्चात रुग्णांना अजूनही काही त्रास जाणवत असेल तर अशा रुग्णांची माहिती गोळा करून त्यांना आरोग्याबाबत मार्गदर्शन करावे. जास्तीत जास्त नागरिकांना या मेळाव्यांचा लाभ घेता यावा, यासाठी आरोग्य यंत्रणेने सुक्ष्म नियोजन करून लोकांपर्यंत विविध माध्यमातून माहिती पोहचवावी. उर्वरीत लोकांचे लसीकरण करून घेण्यासाठी नियोजन करावे, अशा सुचना त्यांनी दिल्या.
येथे होणार तालुकानिहाय आरोग्य मेळावे :
अ.क्र. | दिनांक | तालुका | मेळाव्याचे स्थळ |
1 | 18.4.22 | चंद्रपूर | प्राथमिक आरोग्य केंद्र, दुर्गापूर |
2 | 18.4.22 | बल्लारपूर | ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर |
3 | 20.4.22 | ब्रम्हपूरी | ग्रामीण रुग्णालय, ब्रम्हपूरी |
4 | 204.22 | नागभीड | ग्रामीण रुग्णालय, नागभीड |
5 | 21.4.22 | वरोरा | उपजिल्हा रुग्णालय, वरोरा |
6 | 21.4.22 | राजुरा | उपजिल्हा रुग्णालय, राजुरा |
7 | 22.4.22 | भद्रावती | ग्रामीण रुग्णालय, भद्रावती |
8 | 22.4.22 | गोंडपिपरी | ग्रामीण रुग्णालय, गोंडपिपरी |
9 | 23.4.22 | मूल | उपजिल्हा रुग्णालय, मूल |
10 | 23.4.22 | सिंदेवाही | ग्रामीण रुग्णालय, सिंदेवाही |
11 | 25.4.22 | चिमूर | उपजिल्हा रुग्णालय, चिमूर |
12 | 25.4.22 | पोंभुर्णा | प्राथमिक आरोग्य केंद्र, पोंभुर्णा |
13 | 26.4.22 | कोरपना | ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर |
14 | 26.4.22 | जिवती | प्राथमिक आरोग्य केंद्र, जीवती |
15 | 27.4.22 | सावली | ग्रामीण रुग्णालय, सावली |
०००००००
No comments:
Post a Comment