Search This Blog

Friday 1 April 2022

उष्माघात व उष्माघात रुग्णांवर करावयाच्या उपाययोजना

 


उष्माघात व उष्माघात रुग्णांवर करावयाच्या उपाययोजना

चंद्रपूर दि. 1 एप्रिल : सर्वसाधारणपणे प्रामुख्याने प्रत्येकवर्षी एप्रिल, मे व जून या महिन्यांमध्ये उष्माघाताचा प्रादुर्भाव असतो. त्यामुळे मृत्यू होणे संभवनीय असते. या कालावधीमध्ये तापमानात प्रथम हळूहळू अथवा एकदम यापैकी कोणत्याही प्रकारे वाढ होत असते. चंद्रपूर जिल्ह्यात उष्माघात प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळून येतो. उष्माघाताने मृत्यू होऊ नये यासाठी जागरूक राहणे गरजेचे आहे. त्यासाठी तातडीने औषधोपचार मिळविण्यासाठी अगोदरच पूर्वतयारी करून ठेवणे आवश्यक आहे.

 उष्माघात होण्याची कारणे :

उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे. कारखान्यात बॉयलर रूममध्ये काम करणे, काच कारखान्यातील कामे करणे. जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे. घट्ट कपड्यांचा वापर करणे. प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होतो.

 उष्माघाताची लक्षणे :

थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे. भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे व डोके दुखणे. रक्तदाब वाढणे, मानसिक बैचेन व अस्वस्थता,बेशुद्धावस्था इत्यादी उष्माघाताची लक्षणे आहेत.

प्रतिबंधात्मक उपाय :

वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असतांना करावीत. उष्णता शोषून घेणारे कपडे (काळया किंवा भडक रंगाचे कपडे) वापरू नयेत. सैल पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत. जलसंजीवनीचा वापर करावा, पाणी भरपूर प्रमाणात प्यावे. उन्हामध्ये काम करताना मधून-मधून सावलीत विश्रांती घ्यावी. उष्माघाताची लक्षणे दिसू लागल्यास ताबडतोब काम करणे थांबवावे. उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा उपरणेचा वापर करावा.

 उपचार पद्धती :

रुग्णास हवेशीर व वातानुकूलित खोलीत ठेवावे. रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. रुग्णास थंड पाण्याने अंघोळ घालावी. रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, किंवा आइस पॅक लावावेत. आवश्यकतेनुसार सलाईन द्यावी.

आरोग्य कर्मचाऱ्यांनी गृहभेटी देऊन जनतेला उष्माघाताची कारणे, लक्षणे व प्राथमिक उपाययोजना त्याचप्रमाणे उष्माघात होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी, याबाबत पुरेशी माहिती द्यावी. 1 एप्रिल ते 26 मे 2022 हा उष्माघात आठवडी कालावधी असून या कालावधीत जिल्ह्यातील नागरीकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. असे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment