Search This Blog

Friday 1 April 2022

जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने उष्माघात-कृती आराखड्याचे नियोजन



 

जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने उष्माघात-कृती आराखड्याचे नियोजन

चंद्रपूर दि. 1 एप्रिल : चार-पाच दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात अचानक वाढ झाली आहे. उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा परिषद,चंद्रपूरच्या कार्यक्षेत्रात नियमितपणे हिट ॲक्शन प्लॅन (उष्माघात कृती कार्यक्रम) राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे हिट ॲक्शन प्लॅनची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

आरोग्य विभागाकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीमध्ये उष्माघात रुग्णांकरीता कोल्ड वार्ड कार्यान्वित करणे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वाहन माहे एप्रिल ते माहे जूनमध्ये मोबाइल युनिट म्हणून कार्यान्वित ठेवणे, सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना उष्माघात कृती आराखडा, उष्माघात उपाययोजनेबाबत अवगत करणे, मोफत रुग्णवाहिका व आकस्मिक आरोग्य सेवेकरीता 108 या टोल फ्री दूरध्वनी क्रमांकाची नागरिकांना माहिती देणे, ग्रामपंचायत द्वारा दररोज गावातील नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे, उष्माघात प्रतिबंधक उपाययोजनेबाबत नागरिकांना आरोग्य शिक्षण देणे.

तसेच जलजन्य, किटकजन्य रोगासंबंधी प्रतिबंधक उपाययोजना करणे, उष्माघात प्रतिबंधक उपाययोजनेचा संदेश घरोघरी पोहोचविण्याच्या दृष्टीने सर्व शाळेत व महाविद्यालयांमध्ये हॅंडबिलचे वितरण करणे, गावात जास्तीत जास्त ग्रामपंचायत, बचत गट, स्वयंसेवी संस्थेतर्फे प्याऊ प्रस्थापित करणे. ग्रामपंचायत व स्वयंसेवी संस्थेमार्फत छत, शेड नसलेल्या बसस्टॉपच्या ठिकाणी छत व शेड उभारणे, रुग्णांकरीता सार्वजनिक ठिकाणी समाज मंदिर उपलब्ध करून देणे. उष्माघात जनजागृती करण्यास सहकार्य करणे, सर्व अंगणवाडीत उष्माघात जनजागृतीबाबत बॅनर लावणे, शेतमजुरांच्या कामाच्या वेळेत बदल करणे त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व जनजागृती करणे, आदी उपाययोजना जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.

उन्हापासून व उष्माघात पासून नागरिकांनी आपला बचाव करावा. तसेच प्रशासन आणि आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी केले आहे.

0000000000

No comments:

Post a Comment