कृषी विभागाकडून सामूहिक जैविक कुंपण कार्यशाळेचे आयोजन
Ø प्रायोगीक स्तरावर 4 गांवाची निवड
चंद्रपूर, दि. 18 : चंद्रपूर वाघांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असून राज्यातील एकुण जंगल क्षेत्रापैकी 27.66 टक्के क्षेत्र चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. जिल्ह्यातील बहुतांशी गावे जंगलाशेजारी असून मानव-वन्यजीव संघर्ष घटना घडत असतात. गावात वन्यप्राणी शिरून शेतपिकाचे नुकसान तसेच मनुष्यहानी सारख्या घटना वारंवार घडतात. त्याबाबत गावपातळीवरील कर्मचारी व पदाधिकारी यांची चर्चा घडवून आणण्याच्या दृष्टीने सामुहिक जैविक कुंपण कार्यशाळा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयात नुकतीच पार पडली.
कार्यशाळेस सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानथम एम., जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, प्र.तंत्र अधिकारी (पाण.) प्रशांत देशमुख, प्र.तंत्र अधिकारी (फलो.) राजू ढोले तसेच जिल्ह्यातील वन्यप्राणी प्रभावित प्रथम 10 गावामधील कृषी सहाय्यक, ग्रामसेवक,वनरक्षक, सरपंच व वनसमितीचे अध्यक्ष आदिंची उपस्थिती होती.
सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानथम एम. यांनी सदर कामे शेतकऱ्यांच्या शेतात न करता वनक्षेत्रात खोलचर खोदून बांबू लागवड केल्यास प्रभावी राहतील हे प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितले. प्रशिक्षणार्थीकडून विविध अडचणी व त्याबद्दलच्या उपाय व सूचना मागविण्यात येऊन सुधारित आराखडा तयार करण्यात येईल असे सांगितले. तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी सादरीकरणाद्वारे सामुहिक जैविक कुंपणाचा उद्देश, महत्त्व, लागणारा खर्च, शेतकर्यांना मिळणारे उत्पादन, जलसंधारण आदी बाबींची माहिती दिली.
सदर कार्यशाळेत प्राथमिक स्वरुपात सामुहिक जैविक कुंपण प्रकल्पासाठी मुल तालुक्यातील मारोडा, सिंदेवाही तालुक्यातील वासेरा, तळोधी (ना.) व चिमूर तालुक्यातील टेकेपार या गावांची निवड करण्यात आली. या गावामध्ये कृषी, वनविभाग, ग्रामविकास, व महसूल विभागाच्या ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यामार्फत ग्रामसभा घेण्यात येईल तसेच ग्रामसभेची मान्यता घेऊन चर खोदाईची कामे मे महिना अखेरीस केल्या जाणार असून वृक्ष लागवड जुन महिन्याच्या अखेरीस करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी दिली.
00000
वृत्त क्र. 404
No comments:
Post a Comment