वन प्रबोधिनीतर्फे ग्रामीण युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण
चंद्रपूर, दि. 3 : चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी आणि नागपूर येथील सिंबॉयसीस कौशल्य विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील युवकांसाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. 15 दिवस चाललेल्या या प्रशिक्षणात युवकांना मोबाईल, सीसीटीव्ही व लॅपटॉप दुरूस्तीबाबत प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. विशेष म्हणजे चंद्रपूर वन प्रबोधिनीतर्फे ग्रामीण युवकांना कौशल्य सुधारणेचे प्रशिक्षण देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
चंद्रपूर वन प्रबोधिनी येथे सध्या सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या वन विभागातील अधिकारी/कर्मचारी यांना विविध प्रकारचे पायाभूत तसेच उजळणी प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात. कौशल्य विकास प्रशिक्षणाचा उद्देश, पंतप्रधान यांच्या कौशल्य भारत कार्यक्रमाच्या संकल्पनेनुसार दुर्गम आदिवासी भागातील युवक/युवतींना रोजगार आणि कुशल कार्यशक्ती प्रदान करणे हा आहे. कौशल्य विकास प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी स्वयंरोजगाराच्या संधींमध्ये देखील वाढ होईल. सदर प्रशिक्षणाकरीता वनविभागाच्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजने अंतर्गत निधीची उपलब्धता करून देण्यात आली. 15 दिवसांच्या प्रशिक्षणासाठी इच्छुक असलेल्या आदिवासी बेरोजगार तरुणांची यादी संबंधीत वनवृत्तांकडून मागविण्यात आली होती. सदर प्रशिक्षणासाठी नागपूर वनवृत्तातील ग्रामीण भागातून एकूण 10 प्रशिक्षणार्थी व चंद्रपूर वनवृत्तातील एकूण 28 प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला.
प्रशिक्षणादरम्यान संगणकाचा परिचय, संगणकाचे विविध भाग जोडणे, लॅपटॉपच्या विविध भागांची माहिती, सॉफ्टवेअरचा परिचय, संगणक प्रणालीची जोडणी, त्यातील घटकांचा उपयोग व समस्या निवारण, सीसीटीव्ही बसवणे, मोबाईलचा परिचय, मोबाईलचे विविध भाग जोडणे, मोबाईल सॉफ्टवेअरचा परिचय, त्यातील घटकांचा वापर व समस्या निवारण यासारख्या विषयांबद्दल सविस्तर माहिती व प्रात्यक्षिके याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणाकरीता सिंबॉयसीस कौशल्य विकास केंद्र, नागपूर येथील तज्ज्ञ व्याख्यात्यांना पाचारण करण्यात आले होते. प्रशिक्षणादरम्यान मोबाईल, सीसीटीव्ही व लॅपटॉप दुरूस्ती करीता आवश्यक साहित्याचे वाटप देखील करण्यात आले.
प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमाकरीता अध्यक्ष म्हणून वन प्रबोधिनीचे संचालक श्रीनिवास रेड्डी, तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन सेवानिवृत्त वनसंरक्षक एस. एस. दहिवले, सिंबॉयसीस कौशल्य विकास केंद्राचे संचालक जयप्रकाश पालीवाल, सत्र संचालक मनिषा भिंगे, , उपसंचालक (शिक्षण – 1) शितल नांगरे उपस्थित होते.
०००००००
No comments:
Post a Comment