राष्ट्रीय लोक अदालतीत न्यायालयीन प्रलंबित 936 तर दाखलपूर्व 434 प्रकरणे निकाली
Ø भूसंपादन प्रकरणात 5 कोटी रक्कम लोक अदालतीत वसूल
चंद्रपूर, दि. 02 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा समृद्धी भीष्म यांच्या मार्गदर्शनात दि. 30 एप्रिल 2023 रोजी चंद्रपूर जिल्हा न्यायालय व सर्व तालुक्यातील न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
या लोक अदालतीमध्ये प्रलंबित न्यायालयीन 6 हजार 917 प्रकरणे, दाखलपूर्व 8 हजार 696 अशी एकूण 15 हजार 613 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांपैकी 936 प्रकरणे तर दाखल पूर्व प्रकरणांपैकी 434 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यानुसार 22 लक्ष 85 हजार 916 इतकी रक्कम वसूल करण्यात आली. न्यायालयातील भूसंपादनाची एकूण 158 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 82 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून मोबदल्याची एकूण रक्कम 5 कोटी 28 लक्ष 87 हजार 805 अदा करण्यात आली. तसेच मोटार वाहन अपघात नुकसान भरपाईच्या प्रलंबित प्रकरणांमध्ये एकूण 13 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून नुकसान भरपाईची 65 लक्ष 35 हजार रक्कम वसूल करण्यात आली.
कौटुंबिक वाद व घटस्फोटाच्या प्रकरणांपैकी 30 प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यापैकी 10 प्रकरणांमध्ये पक्षकांरानी एकत्र राहण्याच्या समजूतीने निर्णय घेतला. धनादेश प्रकरणापैकी 87 प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच औद्योगिक व कामगार न्यायालयातील 6 प्रकरणे निकाली काढण्यात आली.
जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील लोक अदालत यशस्वी होण्यासाठी सर्व न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment