शासन आपल्या दारी अंतर्गत शेतक-यांना मार्गदर्शन
चंद्रपूर, दि. 12 : शासन आपल्या दारी अंतर्गत भद्रावती तालुक्यातील मौजा मानोरा येथे शेतक-यांना कृषी विभागाच्या योजना तसेच आगामी खरीप हंगामाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणी, सोयाबीन व धान पिकाकरिता बीजप्रक्रिया, निंबोळ्या गोळा करणे मोहीम, भाऊसाहेब फंडकर फळबाग लागवड योजना, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम आदींचा समावेश होता. यावेळी सरपंच निरंजना हनवते यांच्यासह गावातील इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करत असताना पिशवीला टॅग असल्याची खात्री करून घ्यावी. बियाण्यांची एक्सपायरीची तारीख तपासून घ्यावी. विक्रेत्यांकडून बियाणे खरेदीची पक्की पावती म्हणजे बिल घ्यावे. दिलावर बियाण्यांचे पीक आणि वाण तसेच लॉट नंबर, बियाणे खरेदीची तारीख लिहिल्याची खात्री करून घ्यावी. विकत घेतलेले बियाणे सदोष आढळल्यास तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरुपात तक्रार करावी. सदोष बियाण्यांची तक्रार करता येण्याच्यादृष्टीने पेरणी करतेवेळी पिशवीतून बियाणे टॅग असलेली बाजू सुरक्षित ठेवून खालील बाजूने फोडावी. बियाण्यांचा थोडा नमुना पिशवीमध्ये किंवा बॉक्समध्ये राखून ठेवावा जेणेकरून, तो तक्रार निवारण अधिकाऱ्यास सादर करता येईल.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत आंबा, काजू, पेरू, डाळिंब, कागदी लिंबू, मोसंबी, संत्रा, नारळ, सीताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, कोकम फणस, अजिंर व चिकू इत्यादी 16 बहुवार्षिक फळपिकांचा समावेश आहे. कमाल क्षेत्र मर्यादेत एकापेक्षा जास्त फळपिक लागवड शक्य आहे. मग्रारोहयो अंतर्गत 2 हेक्टर क्षेत्रापर्यंत लाभ घेतल्यानंतर उर्वरीत क्षेत्रासाठी स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत लाभ घेता येतो. यापूर्वी रोहयो किंवा अन्य योजनेअंतर्गत लाभ घेतला असल्यास लाभ घेतलेले क्षेत्र वगळून उर्वरित कमाल क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभ घेणे शक्य आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
००००००
No comments:
Post a Comment